गरिबीत संघटना चालवली पण गांधीजींनी काँग्रेसकडून देऊ केलेली मदत स्वीकारली नाही

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात अनेक संघटना, चळवळी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक नेते, समाजसेवक आपल्याला मिळाले, त्यातले काही प्रकाशझोतात आले, पण काहींचं काम त्या काळापुरतीच मर्यादित राहील. यातलचं एक नाव म्हणजे असीम बिहारी. ज्यांनी स्वतंत्रलढ्यात महत्वाची भूमिका बजावली, पण कायम मागच्या गर्दीतचं हरवून गेले.

अश्या असीम बिहारी यांचा जन्म बिहारमधल्या खासगंज भागातील नालंदा विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या एका देशभक्त कुटुंबातला. त्यांचे आजोबा मौलाना अब्दुर रहमान यांनी १८५७ च्या क्रांतीचा झेंडा फडकावला होता. त्यांचाच वारसा चालवला त्यांच्या नातवानं म्हणजे असीम बिहारी यांनी. त्यांचे खरे नाव अली हुसैन.

तेव्हाच्या बिहारची परिस्थिती आत्तासारखीचं इतर राज्यांपेक्षा आर्थिक दृष्ट्या कमकुवत. त्यामुळे तिथली मंडळी आधीपासूनच आपल्या उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांचा मार्ग पकडतात. त्यात असिम बिहारी यांचा सुद्धा सामावेश होता. बिहारींना उदरनिर्वाहाच्या शोधात कोलकात्याला जावे लागले आणि तेथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला.

त्यांनी आपल्या विडी कामगारांच्या सहकाऱ्यांची एक टीम तयार केली आणि ‘दारुल मुजाकरी’ नावाचे एक अभ्यास केंद्र सुरू केलं. जिथे राष्ट्र आणि समाजाच्या प्रश्नावर लेख लिहून, ते ऐकून  त्यावर चर्चा करणे हे रोजचे काम होते.

असीम बिहारी यांनी वयाच्या २२ व्या वर्षी प्रौढ शिक्षणासाठी १९१२ ते १९१७ अशी पाच वर्षांची योजना सुरू केली. १९१४ मध्ये, वयाच्या २४ व्या वर्षी, त्यांनी त्यांच्या जन्मभूमी नालंदा येथे बझम-ए-अदब नावाची संस्था म्हणजे एका साहित्यिक सभेची स्थापन केली, ज्या अंतर्गत एक वाचनालय देखील चालवले जात होते.

१९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लाला लजपत राय, मौलाना आझाद इत्यादी नेत्यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्या नेत्यांच्या सुटकेसाठी बिहारींनी देशव्यापी पत्रव्यवहार आंदोलन सुरू केले, त्यात प्रत्येक जिल्हा, शहर, परिसर, खेडेगावातून, पार ग्रामीण भागातून सुमारे दीड लाख पत्रे आणि टेलीग्राम भारताचे व्हाईसरॉय आणि राणी व्हिक्टोरिया यांना पाठवले जात होते. अखेर मोहीम यशस्वी झाली आणि सर्व स्वातंत्र्यसैनिक तुरुंगातून बाहेर आले.

बिहारी यांनी १९२० मध्ये त्यांनी कोलकाता येथील तंतीबाग येथे ‘जमियातुल मोमिनीन’ अर्थात मोमीन कॉन्फरन्स नावाची संघटना स्थापन केली, ज्याचे पहिले अधिवेशन १० मार्च १९२० रोजी झाले. एप्रिल १९२१ मध्ये ‘अलामोमीन’ या भित्तीवरील वृत्तपत्राची परंपरा सुरू केली, ज्यामध्ये ते मोठ्या कागदावर लिहून भिंतीवर चिकटवले जात होते. पुढे ‘अलामोमीन’ मासिक म्हणून प्रकाशित होऊ लागले.

 संघटनेत असीम बिहारी यांनी नेहमी स्वतःला मागे ठेवले आणि इतरांना पुढे नेले. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधीही स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष केले नाही, केवळ सरचिटणीसपदापर्यंतच मर्यादित ठेवले.

पुढे १० डिसेंबर १९२१ रोजी कोलकाता तंतीबाग येथे संघटनेचं एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते, ज्यात महात्मा गांधी देखील सहभागी झाले होते. गांधींनी काँग्रेस पक्षाच्या काही अटींसह संस्थेला एक लाख रुपयांची मोठी रक्कम देण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु चळवळीच्या अगदी सुरुवातीस संघटनेला कोणत्याही प्रकारच्या राजकीय बळजबरी आणि समर्पणापासून दूर ठेवणे असिम बिहारी यांना अधिक योग्य वाटले. एक लाखाची मोठी आर्थिक मदत, ज्याची संस्थेला नितांत गरज होती, ती स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

देशभक्तीसाठी स्वतःला जणू वाहूनच घेतलं होत. याची प्रचिती एका घटनेवरून समजते. ९ जुलै १९२३ नालंदा जिल्ह्यातचं जमियातुल मोमिनेन संघटनेची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याच दिवशी असीम बिहारी यांचा मुलगा कमरुद्दीन, जो फक्त ६ महिने आणि १९ दिवसांचा होता, त्याचा मृत्यू झाला. पण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची तळमळ अशी होती की, आपल्या लाडक्या मुलाचे पार्थिव सोडून सभेला वेळेवर पोहोचून त्यांनी सुमारे तासभर समाजाची स्थिती आणि दिशा यावर अतिशय प्रभावी भाषण केले.

बिहारी यांनी विणकरांचे कार्य संघटित आणि बळकट करण्यासाठी, भारत सरकारच्या सहकारी संस्थेची संपूर्ण मदत घेण्यासाठी २६ जुलै १९२७ रोजी ‘बिहार विणकर असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली, ज्याची शाखा कोलकाता आणि इतर शहरांमध्येही उघडण्यात आली.

विणकरांशिवाय इतर पसमंडा जातींनाही जागृत, सक्रिय आणि संघटित केले पाहिजे, असा बिहारींचा सुरुवातीपासूनच प्रयत्न राहिला आहे. १६  नोव्हेंबर १९३० रोजी त्यांनी ‘मुस्लिम लेबर फेडरेशन’ नावाच्या सर्व पसमंडा जातींचा एक संयुक्त राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला, या अटीवर की मूळ संघटनेच्या सामाजिक चळवळीवर परिणाम होऊ नये.

१७ ऑक्टोबर १९३१ रोजी, त्यावेळच्या सर्व पसमंडा जातींच्या संघटनांवर आधारित ‘बोर्ड ऑफ मुस्लिम व्होकेशनल अँड इंडस्ट्री क्लासेस’ ही संयुक्त संस्था स्थापन करण्यात आली आणि सर्वानुमते तिचे संरक्षक बनवले गेले.

त्यांनी निवडणुकीचे राजकारण हा झटपट यश मिळवण्याचा शॉर्टकट मानला आणि सामाजिक जाणिवेला प्राधान्य देणे अधिक योग्य मानले. असे असले तरी १९३६-३७  च्या निवडणुकीत कामगारांनीही अनेक जागा जिंकल्या.

निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. एका भाषणात ते म्हणाले होते, ‘आमच्या दूखण्यावरचं औषध ना लीग आहे ना काँग्रेस… सत्य हे आहे की आमच्या दूखण्यावरचं औषध आमच्याचं हातात आहे, हा उपाय आपली ‘कॉन्फरन्स म्हणजेच संस्था आहे.

साधारणपणे मौलानांचं भाषण दोन ते तीन तासाचं असायचं, पण १३ सप्टेंबर १९३८ रोजी कन्नौजमध्ये दिलेलं पाच तासाचं भाषण आणि २५ ऑक्टोबर १९३४ रोजी कोलकात्यात दिलेलं पूर्ण रात्रीचं भाषण हा मानवी इतिहासातील अभूतपूर्व विक्रम आहे.

असीम बिहारी यांच्या संघर्षाचा आणि कार्यकर्तृत्वाचा अंदाज यावरून लावता येतो की, त्यांचा जन्म बिहारमधील नालंदा इथला, कोलकाता येथून चळवळीची सुरुवात झाली आणि उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथं त्यांचे निधन झाले.

अश्या प्रकारे बॅकफूट राहून कित्येक संघटनांचे नेतृत्व करणारे असीम बिहारी त्यांचं कर्तृत्व फारच कमी लोकांपर्यंत पोहोचलंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.