सगळ्यात गाजलेल्या हार्ट स्पेशालिस्टला पण बाळासाहेबांच्या ऑपरेशनवेळी भीती वाटलेली…

१९९६ चं वर्ष. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार सत्तेत होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई यांचं निधन होऊन महिन्या दोन महिन्याचा कालावधी झाला होता.

बाळासाहेबांनी आपलं मन वळवण्यासाठी या निवडणुकांच्या तयारीत लक्ष घातलं होतं. ते दिवसाला ६-७ बैठका तरी घेत होते. आणि अचानक एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यानं तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

तिथं तपासणीनंतर डॉक्टरांना हृदयाच्या डाव्या बाजूला काही ब्लॉक आढळले होते, त्यामुळे बाळासाहेबांची बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यावेळी बाळासाहेबांचं बायपास सारखं मोठं ऑपरेशन करण्यासाठी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव पहिल्यांदा आले ते म्हणजे,

सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. नितु मांडके. अर्थात डॉ. नित्यानंद मांडके

डॉ. नितु मांडके त्यावेळी अहमदाबादमध्ये होते. पण ते तातडीने मुंबईत दाखल झाले. बाळासाहेबांची बायपास सर्जरी होणार ही बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली.

पण जशी हि बातमी बाहेर पसरली तसे शिवसैनिक अस्वस्थ होऊ लागले. असं म्हणतात कि याच अस्वस्थतेमधून त्यावेळी काही शिवसैनिकांनी डॉ. नितु मांडके यांना बाळासाहेबांचं ऑपरेशन व्यवस्थित करण्यासाठीची धमकी दिली होती. शिवसैनिकांच्या धमक्यांमुळे डॉ. मांडके यांच्यावर देखील मोठा दबाव होता. त्यामुळे ते काहीसे घाबरले देखील होते.

पण सगळ्यात गाजलेल्या हार्ट स्पेशालिस्टने ऑपरेशन यशस्वी पूर्ण केलं. त्यामुळे डॉ. मांडके यांच्या जादुई बोटांची देशभरात चर्चा चालू झाली.

डॉ. नित्यानंद मांडके यांचा जन्म ३१ जानेवारी १९४८ रोजी झाला होता. बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. याच महाविद्यालयात त्यांना त्यांची आयुष्य भराची सहचारिणी देखील मिळाली. मांडके यांना अभ्यास एके अभ्यास हि गोष्ट मान्य नसल्यामुळे फुटबॉल, बॉक्सिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.

पुढे एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर ते केईएम हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. तिथं त्यांनी हृदयविकार आणि शस्त्रक्रियांसंबंधीच विशेष पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हृदयविकारासंबंधी पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. 

असं म्हणतात कि इंग्लंडमध्ये असताना त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली वगैरे नव्हती. पण त्यांनी जिद्द न सोडता स्थानिक हॉस्पिटलमध्ये रुजू झाले होते. तिथं देखील त्यांची मासिक कमाई अगदी नगण्य अशीच होती. राहण्याचा आणि शिकण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांना कधी कधी पैसे उधार पण घ्यावे लागायचे.

थोड्या वर्षांनंतर त्यांनी पत्नी अलका मांडके व आपल्या लहान मुलीला इंग्लंडमध्ये बोलावले. तिथं काही वर्षे राहिल्यानंतर नितू मांडके अमेरिकेला गेले. तिथे त्यांना जगद्विख्यात डॉक्टर पिकासिओ यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या हाताखाली काही दिवस काम केल्यानंतर नितू मांडके भारतात परतले.

भारतात त्यांना सहजपणे कुठलीच नोकरी न मिळाल्यामुळे ते सुरुवातीला ते वैद्यकीय सल्लागार म्हणून जे. जे. रुग्णालयात काम करू लागले. त्यावेळी बाकीचे सर्जन त्यांच्या कामाचा वेग, चपळाई व सफाई बघून अवाक व्हायचे. त्यांची काम करण्याची उरक व अचूकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले होते.

त्यानंतर जसलोक हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी डॉ. मांडके यांनी आपली सेवा दिली. अनेक जणांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. काही महिन्यांच्या कोवळ्या बाळांपासून ते अनेक वृद्धांवरसुद्धा त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. शिवाय बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडूंच्या व सिनेतारकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केल्या. 

कोणत्याही माणसांने पहिल्याच भेटीत डॉक्टरांच्या प्रेमात पडावं, मैत्री व्हावी असे नितु मांडके यांचं जिंदादिल व्यक्तिमत्व होतं. पिळदार मिशितला हा दिलदार माणूस बोलायला लागला की बिनधास्त बोलायचा. आपुलकीने, घरच्या मायेने, कौटुंबिक प्रेमाने काही विशेषण, अगदी ठेवणीतले शब्द लावून बोलायचे. त्यामुळे समोरच्याला वाचवणं कितीही अवघड असलं, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता व सदैव त्यांच्या मुखातून निघणारा आशावाद पाहूनच रुग्ण अर्धे बरे व्हायचे.

नितू मांडके यांना केवळ हृदयविकारांशी व हृदयशस्त्रक्रियांशी संबंधित आधुनिक व अद्ययावत सोयीसुविधांनी व आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधायचे होते. त्याचे कामही निम्म्याहून अधिक पूर्ण झाले होते; पण २२ मे २००३ रोजी त्यांचं हृद्यविकारानेच निधन झालं.

मात्र डॉ. मांडके यांचं हे स्वप्न साधारण २००५ च्या दरम्यान स्वतः बाळासाहेबांनी मनावर घेतले. त्यांनी त्यावेळी उद्योग जगतात आघाडीवर असलेल्या अनिल अंबानी यांना हे हॉस्पिटल बांधून पुर्ण करण्याचे आदेश दिले. अंबानींनी या हॉस्पिटल संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रकल्प आपल्या रिलायन्स एडीए समूहाच्या अखत्यारीत आणला, आणि अवघ्या ४ वर्षात तो पूर्णत्वास नेला. २००९ साली कोकिलाबेन अंबानी या सुसज्ज हॉस्पिटलच उदघाटन देखील झालं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.