पुरग्रस्त लोकांसाठी मदत घेवून जाताय..? थांबा, वाचा आणि मग जा..

रात्री बारा वाजता फोन आला. इंदापूरच्या आसपासच्या एका गावातून तरुण एक टॅम्पो भरून सामान घेवून आले होते. नेमका भाग माहिती नसल्यामुळे नदीच्या काठच्या एका गावात थांबले. एकामागोमाग एक अशी मदतीच्या टॅम्पोची रांग होती. किमान पंधरा वीस टॅम्पो. पुरग्रस्त गावातील लोकांची गावातून बाहेर असणाऱ्या शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. त्याचा ताबा सामाजिक कार्यकर्त्यांकडे.

पण दुर्देवाने यात काही पुढारपण करणारी लोकं. गावची लोकसंख्या हजारात पण कॅम्पमध्ये फक्त शंभर एक लोकं. एकामागून एक असं सामान रचलेलं पाहून मदत घेवून आलेल्या तरुणांनी दूसऱ्या गावात जायचा निर्णय घेतला. पण आम्ही पाठवतो म्हणून त्यांना सांगण्यात आलं. तो टॅम्पो तिथेच खाली झाला.

बारा वाजता त्याचा फोन आला कारण की,

त्या कॅम्पवर जितकी माणसं आहेत त्याहून अधिक सामान गोडावून करुन ठेवलं होतं. इतकं की पुढचे पंधरा महिने पुरू शकतं. दूसरी गोष्ट म्हणजे गावची लोकसंख्या हजार असली तरी ते सामान खूपच होतं. त्या तरुणांना लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसांच्या हातात सामान दिलं. म्हणून त्यातील एकाने बोलभिडू सोबत संपर्क साधला आणि ग्राऊंडवर नक्की कोणाकडे सामान द्यायचं, कस द्यायचं हे विचारलं. 

सर्व गोष्टी वाचण्यापुर्वी तुम्हाला आज दिनांक ११ ऑगस्ट रात्री साडेअकराची परिस्थिती सांगतो.

पुण्यावरुन आलात तर तुम्ही कराड-पलुस-आमनापुर-भिलवडी-वसगडे-नांद्रे-ब्रह्मनाळ या कृष्णा नदिच्या पुर्व बाजूला असणाऱ्या गावांमध्ये पोहचता. कृष्णा नदीवर पुर्व बाजूस असणार मोठ्ठ गाव म्हणजे सांगली. या ठिकाणी व्यवस्थित मदत पोहचत आहे. कराड पासून आतील मार्ग निवडून लोक येतात. गावांमध्ये न जाता सांगली शहरात जातात आणि आपण आणलेला एखाद्या कॅम्पवर रिकामा करुन निघून जातात. आज रोजी या गावांमध्ये कॅम्पमध्ये असणाऱ्या लोकांना पुरेल इतके साहित्य उपलब्ध झाले आहे.

इथेच दुसरी गोष्ट सांगू वाटते ती म्हणजे गावची लोकसंख्या हजारात असताना कॅम्पमध्ये फक्त १००-२०० लोकं कशामुळे. तर इथे पैपाहुणे खूप असतात. बरीचशी लोक आपल्या पै पाहूण्याच्या घरी राहिलेली आहेत. तुम्हाला योग्य प्रकारे मदत करायची असेल तर अजून दोन दिवस थांबा. पाणी ओसरल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या घरी जाईल. घरी गेल्यानंतर फिनाईल पासून ते अंर्तवस्त्रांपर्यन्त प्रत्येक गोष्टीची गरज असेल. एखादी गल्ली पाहून तुम्ही तुमच्या हाताने योग्य घरापर्यन्त हे साहित्य पोहच करु शकता. आत्ता कॅम्पवर गाडी रिकामी करण्याचा फंदात पडू नका.

दूसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढचे दोन चार महिने कठिण असणार आहेत. अशा वेळी आपण इतक्या कष्टाने मदत गोळा करतो तर एका कुटूंबाचा महिन्याचा “किराणा माल” अशा प्रकारे साहित्याचा पिशव्या करा. जेणेकरुन चार जणांसाठी एक महिन्याच साहित्य अस साहित्याच सॉर्टिंग होवू शकेल. त्यानुसार पाणी ओसरल्यानंतर ज्या घरात साहित्य पोहचलं नाही अशा घराघरात, गावागावत जावू तुम्ही ती मदत देवू शकाल.  हि परिस्थिती झाली कृष्णा नदिच्या पुर्वेकडे असणाऱ्या गावांची.

आत्ता कृष्णा नदिच्या पश्चिम दिशेस असणारी गावे. 

कराड सोडून इस्लामपूरकडे गेला की तुम्ही कृष्णा नदिच्या डाव्या बाजूस असता. या भागात बहे, खरातवाडी, फार्णेवाडी, बहेबोरगाव, मसुचिवाडी, जुनेखेड-नवेखेड, वाळवा, नागठाणे, सुर्यगाव, खोलेवाडी, औंदुबर, अंकलखोप, कसबेडिग्रज, सांगलीवाडी ही कृष्णा नदिच्या पश्चिम दिशेला असणारी गावे. पुर्व दिशेच्या तुलनेत पश्चिम दिशेला असणाऱ्या गावांमध्ये कमी मदत पोहचली आहे. या भागात गेल्यानंतर तुम्हाला वारणा नदिच्या उत्तर पुर्व दिशेला असणाऱ्या गावांमध्ये देखील जाता येते. समडोळी, सावळवाडी, दुधगाव, शिगाव, ऐतवडे खुर्द अशी गावे या टप्यात आहेत. पैकी नदिच्या वरच्या टप्यात असणाऱ्या गावातील पाणी पात्रात शिरण्यास सुरवात झाली आहे. जनजीवन सुरळीत झाले आहे. कराडच्या आसपासच्या गावात गेल्यानंतर आपणास याठिकाणी पुर आला होता हे देखील पटणार नाही. मात्र पुरामुळे झालेले नुकसान मोठ्ठे आहे.

कृष्णा आणि वारणेच्या दरम्यान असणाऱ्या या गावांमध्ये तुलनेत कमी मदत मिळाली असून खऱ्या अर्थाने अशा गावांमध्ये मदतीची गरज अधिक आहे.

कृष्णा नदीच्या दक्षिणेला आणि पंचगंगेच्या उत्तरेला असणारी गावे. 

या गावांमध्ये देखील मदत पोहचत आहे. मात्र सांगली जिल्ह्यात पोहचणाऱ्या मदतीपेक्षा ती मदत कमी असल्याचं सांगितल जातय. उदगाव, अर्जुनवाड, घालवाड, कुतवाड, कनवाड, हसुर, नरसोबावाडी, धरणगुत्ती, नांदणी, टाकवडे  शिरोळ परिसरातील गावांमध्ये मोठ्ठी गरज असल्याच सांगण्यात येत आहे. तिथल्या लोकांसोबत संपर्क साधून बोलल्यानंतर लक्षात आलं की इथे मदतीची गरज आहे. शेतकरी आणि सधन पट्ट्यामध्ये शेती सोबत घरांच मोठ्ठ नुकसान झालं आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी तूम्ही कराड-इस्लामपूर-किणीटोल-नाका करुन MH4 वरुन डाव्या बाजून पेठवडगाव-हातकणंगले असे जावू शकता. त्यानंतर आतल्या टप्यातील गावे लागतात. या ठिकाणी जाणं गरजेचं आहे अस आम्ही व्यक्तिरित्या सुचवतो.

त्यानंतरचा भाग कोल्हापूरचा. 

कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या पंचगंगा नदिस मोठ्ठा पूर आहे. कोल्हापूरात प्रवेश करता येत नाही. पण पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. आणि कोल्हापूरात आज प्रवेश करता येवू शकले. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर पंचगंगा नदिच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या गावांची नावे.

कोल्हापूर शहर- गांधीनगर-वसगडे-इंगळी-रांगोळी-इचलकरंजी- चंदुर- रुई-मानकापुर-रुकडी -बोरगाव-शिवणाकवाडी-अब्दुललाट-हेरवाड-तेरवाड-कुरूंदवाड-राजापूर-बस्तवड अशी गावे लागतात. पुण्या मुंबईवरुन रस्तेमार्गावरुन या भागात अजून संपर्क झालेला नाही. आपण या ठिकाणी जावू शकता. कारण इथे देखील मोठ्ठ नुकसान झालं आहे आणि मदत पोहचली नाही.

आपणाला वरती जी माहिती दिली आहे त्यासाठी पुरक म्हणून नद्यांचा हा नकाशा आपण पाहू शकता. पूर आहे त्यामुळे एक सहज गोष्ट लक्षात घ्या आपणाला सध्याच्या स्थितीत नदी पार करता येत नाही.त्यामुळे NH 4 नॅशनल हायवे हा प्रमाण मानून आपण नदिच्या पुर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर भागात जावू शकतात.

त्यासाठी तुम्ही खालील नकाशा पाहूण ठरवू शकता.

map

पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी जाणाऱ्यांना बोलभिडू च्या विशेष सुचना.

  • पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. माणसं आत्ता आपआपल्या गावात जाण्यास सुरवात करतील. आत्ता घर धुणे, साफसफाई करणं आणि संपुर्ण संसार उभा करण महत्वाचं ठरणार आहे. आपण मदत पाठवण्यास गडबड करु नका. जी मदत असेल ती आपल्याकडे ठेवा. पूर ओसरल्यानंतर गावांची माहिती घ्या आणि प्रत्यक्ष गावात जा.
  • बिस्किट, कोरडे पदार्थ इत्यादी गोष्टी अजिबातच पाठवू नका.

9 Comments
  1. NITIN BHISE says

    बरं झालं भिडूंनो मोठ्या फसवेगिरीतून वाचवलं आणि मदतीचा योग्य मार्ग दाखवला

  2. सुभाष जैन (छाजेड) says

    मिळणारी मदत न नाकारता ती साठवून ठेवून योग्य वेळी पोचवणे हा खरोखरंच योग्य निर्णय आहे. परंतु लोकांना आताच मदत जावी याची घाई असते. तरी आपण लोकांचा मदतीचा मूड न घालवता ती स्विकारून सांभाळावी. शिवाय ज्या साहित्याची गरज पडणार आहे, ते देण्यासाठी आवाहन करावे.

  3. Chandrakant Darandale says

    खुप चांगले मार्गदर्शन…

  4. Amit P Gadkari says

    Awesome information.thanks for this valuable information.

  5. बोलभिडू चा काँन्टेक्ट नंबर काय आहे ?

  6. Rushi kale says

    Thanks Bol Bhidu Team ????
    You are Really Doing a Great Job????
    ®

  7. अरुण रघुनाथ कोळी says

    पूरग्रस्तांना आताची आवश्यक मदत करणे गरजेचे आहे लोक मदत करत आहेतच पण त्याचा गैर वापर होत आहे खरे पूरग्रस्त बाजूलाच राहतात.प्रत्येक बाबतीत राजकारण आणलं जातंय.जे पूरग्रस्त आहेत ते मदती पासून वंचित राहत आहेत.सेवाभावी संस्था लोकप्रतिनिधी मदत करतायत काही लोक प्रसिद्धी मिळावी तर काही न नाव घेता ही भरपूर मदत करत आहेत.माझे ही तेच म्हणणे आहे की आवश्यक मदत आता करवी जसे जेवण पाणी साबण,ब्लॅंकेट इत्यादी पण पूर ओसरल्या नंतर खरी मदतीची गरज आहे तिथे कोणताही भेदभाव न करता मदतीची आवश्यकता आहे

  8. अभयकुमार बरगाले says

    लोक घरात गेल्यानंतर सुध्दा, पक्क्या माहितिअभावि, एकाच घरात दोनदोन तीनतीन वेळा मदत पोचू शकते आणि अनेक घरे मदतीपासून वंचित राहू शकतात. आजतागायत सधन अवस्थेत मानाने जीवन जगणारे लोक होते, त्यांच्याही घरात पाणी घुसल्यामुळे त्यांना अन्य ठिकाणी आश्रय घ्यायला लागलेला आहे. ते लोक कदाचित स्वतःहून मदत घ्यायला येणार सुद्धा नाहीत. कदाचित त्यांच्याकडे जाऊन प्रेमाने विचारपूस करून मदत पोहोचवावी लागेल.

  9. Yogita patil says

    Khup chan mahiti dili. Dhanyavad

Leave A Reply

Your email address will not be published.