हेमाने टीव्ही सिरीयल मधल्या हिरोला लाँच केलं आणि तो सुपरस्टार बनला..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. ड्रिमगर्ल हेमामालिनीचं  वय वाढत होतं खरं ; पण जीवनाच्या वळणावर हेमा डोळे दिपवणारा ग्लॅमरचं जग मागं टाकून परिवर्तनाचं स्वागत करू लागली होती. ग्लॅमर, सुपरस्टार, बॉक्स ऑफिसवरच्या बड्या दुनियेतून तिने काहीतरी वेगळं करायला घेतलं.

खूप विचार करून तिने चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. 

आजवर हिंदी सिनेमातील सुपरस्टार हिरोईन निवृत्तीनंतर दिग्दर्शनाकडे वळत आहे असं फार वेळा घडलं नव्हतं. हेमाने एक निवन ट्रेंड सेट करायच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. हे पाऊल यशस्वी ठरावे म्हणून तिने मेहनत मात्र जोरदार घेतली होती.

पहिलाच सिनेमा यात काही चूक राहू नये म्हणून तिने  व्यवस्थित आखणी केली होती. सगळी तयारी झाली मात्र जेंव्हा चित्रपटाचं काम सुरू करण्याची वेळ आली तरी एक प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नव्हता. हेमामालिनीला आपल्या सिनेमासाठी हिरो मिळाला नव्हता. वेळ निघून जात होती आणि हेमाला मात्र त्या अज्ञात हिरो बद्दल खात्री वाटत नव्हती.

रोज ठरल्याप्रमाणे ती तिचे दिवसभराचे कार्यक्रम आटपून घरी आली. सवयीनुसार तिने त्या दिवशी टीव्ही लावला. चॅनल बदलत बदलत अचानक फौजी मालिकेपाशी हेमाचा रिमोट स्थिरावला. तिथे तिला एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्या तरुणाचा चेहरा फारसा देखणा नव्हता पण त्यावर वेगळाच उत्साह दिसत होता. आत्मविश्वास दिसत होता.

हेमाने आपल्या ऑफिस मधल्या माणसांना ताबडतोब त्या नटाचं नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं.

हेमाच्या स्टाफने झटपट काम केलं आणि त्यांना माहिती मिळाली.

नाव होतं- शाहरुख खान. वास्तव्य दिल्ली. त्याचा फोन नंबरही मिळाला होता. हेमाच्या बहिणीने ताबडतोब शाहरुखला फोन लावला. सिनेमातल्या एखाद्या सीन सारखा प्रसंग येथे घडत होता. स्वतः शाहरुखने प्रभाचा फोन घेतला. पण हा फोन हेमामालिनी कडून, हेमा मालिनीच्या ऑफिस कडून आला, यावर त्याचा विश्वासच बसेना! कुणीतरी आपली चेष्टा करत आहे असे समजून त्याने प्रभाला सरळ उडवून लावलं. त्याला वस्तुस्थिती पटवून देता देता प्रभा वैतागून म्हणाली की,

“थांब तुला मी हेमाचा डायरेक्ट नंबर देते, तू स्वतः फोन कर आणि खात्री करून घे.” आणि शाहरुखने लगेच त्या नंबर वर हेमाला फोन केला.

त्यानंतर दोनच दिवसांनी शाहरुख खान मुंबईच्या हेमाच्या घरी ऑडिशन साठी दाखल झाला.

हेमाला त्याची ‘फौजी’मुळे अभिनयशैली माहीत झाली होती आणि आवडलीही होती. छोट्या पडद्यावर दिसणारा हा नट मोठ्या पडद्यावर कसा दिसेल याचा अंदाज तिला आता घ्यायचा होता. प्रत्यक्ष भेटीत शाहरुखचं व्यक्तिमत्त्वही हेमाला आवडलं.

शाहरुखची फक्त एकच गोष्ट तिला खटकत होती. ती म्हणजे वारंवार कपाळावर शाहरूखचे येणारे केस त्याचा चेहरा झाकत होते. थोडसं संकोचून हेमाने शाहरुखला विचारलं, “तू जरा केस एका जागी ठेवशील का?”

असं म्हटल्याबरोबर शाहरुखने केसातून हात फिरवला आणि केस नीट बसवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

आता तो पहिल्यापेक्षा नेटका दिसत होता. पण हेमाचं समाधान काही होईना. शेवटचा उपाय म्हणून तिने आपल्या मेकअपमन ला बोलवलं. शाहरुखच्या केसाला जेल लावून ते नीट बसविण्याची जबाबदारी हेमाने त्याच्यावर टाकली. जेल लावल्यानंतर केस अगदी व्यवस्थित बसले आणि शाहरूख रुबाबदार दिसू लागला.

घरी हा प्रयोग चालू असतानाच धर्मेंद्र ची एन्ट्री झाली. हेमाने त्याला शाहरुख खान शी ओळख करून दिली, “हा माझ्या नव्या सिनेमाचा हिरो – शाहरुख खान!”. धर्मेंद्रने ताबडतोब हेमाला तिच्या चॉईसची दाद दिली आणि शाहरुखच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं!

हेमा म्हणते, ” ‘फौजी’ बघणाऱ्यांना शहरुख चांगला नट आहे हे लगेच कळत होतं. पण तो एक दिवस देशाचा सर्वात मोठा स्टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसेल!”

मुंबईच्या एका बड्या हॉटेलमध्ये हेमाच्या चित्रपटाचा थाटामाटात मुहूर्त झाला. हेमाच्या गुरुमांच्या सांगण्यानुसार हेमाने चित्रपटाचं नाव ठेवलं – ‘दिल आशना हैं’.

या फिल्मची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्या ‘लेस’ या गाजलेल्या कादंबरीवरून बेतलेली होती. तीन स्त्रियांमध्ये विशिष्ट परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावबंधनांची ही कथा आहे. डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया आणि त्या काळात बराच गाजावाजा झालेली दिव्या भारती या चार अभिनेत्रींची हेमाने निवड केली.

चित्रपट अर्थातच स्त्रीप्रधान होता आणि त्या काळात ही काहीशी दुर्मिळ गोष्ट होती, आणि याची संपूर्ण जाणीव ‘दिल आशना हैं’ च्या नायकांना म्हणजेच शाहरुख खान, कबीर बेदी, जितेंद्र आणि आसिफ यांना होती.

हेमाने पहिली संधी दिलेले शाहरुख खान आणि दिव्या भारती हे दोघेही कलाकार पुढे जाऊन मोठे स्टार बनले होते.

रोज प्रगतीची नवी पायरी चढत होते. याचं श्रेय लोक हेमाला देत होते. तिने दोन अननुभवी तरुण कलाकारांना संधी देऊन त्यांच्या गुणांचे चीज केलं होतं.

हेमा सांगते, “कोणीही नाराज नव्हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे कलाकार सेटवर आले की वातावरण एकदम बदलून जायचं. मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते आणि त्याचं निरीक्षण करायची आणि या नात्यानेसुद्धा कॅमेरा समोर उभा राहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळण्याऐवजी कॅमेरा मागून ते वाचनं वेधक वाटत होतं”.

‘दिल आशना हैं’ 1991 मध्ये प्रदर्शित झाला. त्याच दरम्यान देशामध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. त्याचा या चित्रपटाच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला. एरवी तो बरा चालेल अशी चिन्हे दिसत होती.

मुंबईमध्ये दंगल चालू होती त्यावेळी बांद्र्याच्या ‘रंगशारदा’ मध्ये हेमामालिनीची ‘दुर्गा’ नृत्यनाटिका चालू होती.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रम संपताच त्यांनी हेमाला म्हटलं,

“आता इथून सरळ घरी जा. वाटेत कुठेही थांबवू नकोस वातावरण ठीक नाहीये” ते नुसते बोलून थांबले नाहीत. त्यांनी तिच्या बरोबर सिक्युरिटी गार्डस ही दिले.

दुसर्‍या दिवशी मुंबईत अक्षरशः आगडोंब उसळला होता. वितरकांनी हेमाला सल्ला दिला. “तुम्ही प्रदर्शकांशी बोलणी करा आणि प्रिंट्स परत घ्या. दंगली थांबून सगळं सुरळीत झालं की सिनेमा पुन्हा प्रदर्शित करा. “

पण एव्हाना फार उशीर झाला होता. चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे आता अशक्य होतं. दिल आशना हे ठरल्याप्रमाणे ठरलेल्या थिएटरमध्ये लागला. पण दंगलीमुळे लोकांनी घराबाहेर पडून थिएटरपर्यंत जाण्याचा धोका पत्करला नाही. या घटनेपासून हेमाने नवा धडा शिकला. नुसता चित्रपट चांगला बनवून भागत नाही, तर त्याचं प्रकाशन योग्य वेळी करावं लागतं, तरच तो चालतो.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.