हेमा मालिनीने आजही ‘मीरा’ सिनेमासाठी मिळालेलं मानधन जपुन ठेवलंय

बाॅलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी. तिच्या अदांनी आजही कित्येक जण घायाळ होत असतील. हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘शोले’ मधली ‘बसंती’ म्हणजे पाहताक्षणी प्रेमात पाडणारी. बडबडी तरीही भोळी अशी. हेमा मालिनींच्या अनेक भुमिका गाजल्या.
अगदी वयाच्या ५५ व्या वर्षी अमिताभ बच्चन सोबत ‘बागबान’ मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाला सुद्धा पसंती मिळाली.
आज हेमा मालिनी यांनी सिनेमात काम करणं बंद केलं असलं तरी नृत्याच्या माध्यमातुन त्या स्वतःची अदाकारी पेश करतात. हेमा मालिनी ‘भरतनाट्यम’, ‘कुचीपुडी’ यांसारख्या शास्त्रीय नृत्याचं सुंदर सादरीकरण करतात.
मुली इशा, अहाना सोबत आजही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या विविध डान्स फेस्टिव्हल मध्ये हेमा मालिनी स्वतःच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.
हेमा मालिनींच्या व्यक्तिमत्वातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाजु म्हणजे त्या कृष्णभक्त आहेत.
श्रीकृष्णाविषयी त्यांच्या मनात अपार भक्तीभाव आहे. आज भिडूंनो तुम्हाला हेमा मालिनी यांच्या आयुष्यातला श्रीकृष्णभक्तीविषयीचा असाच एक किस्सा सांगणार आहे.
हेमा मालिनींनी ‘शोले’च्या माध्यमातुन सुपरहिट यश मिळवलं. अमिताभ, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘बसंती’ सुद्धा तितकीच लक्षात राहिली.
हि गोष्ट ‘शोले’ नंतरची.
‘शोले’ नंतर हेमा मालिनींकडे अनेक निर्माते त्यांच्या सिनेमांसाठी खेटे घालत होते. पण उगाच भरमसाठ सिनेमे करण्यावर भर न देता, आधीपासुन निवडक तरीही चांगले सिनेमे करण्याकडे हेमा मालिनींचा कल असायचा.
याच काळात प्रेमजी हे निर्माते हेमा मालिनींना भेटायला यायचे. प्रेमजी आणि हेमा मालिनींचा तसा परियच होता. प्रेमजी दोन-तीन वेळा हेमा मालिनींना कथा ऐकवण्यासाठी आले होते. परंतु कथा पसंत नसल्याने प्रेमजींचे सिनेमे करायला हेमा मालिनी यांनी नकार दिला. एकदा असेच प्रेमजी हेमा मालिनी यांना भेटायला आले.
तेव्हा गप्पा मारताना कृष्णभक्त मीराचा विषय हेमा मालिनी यांनी प्रेमजींना सांगीतला.
खुद्द हेमा मालिनींनी विषय सुचवल्यामुळे प्रेमजींनी या विषयावर सिनेमा बनवण्यासाठी गांभीर्याने विचार केला. प्रेमजी लगोलग गुलजार साबना भेटायला गेले.
गुलजारजींनी सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली.
सिनेमाचं नाव ठरलं ‘मीरा’. हेमा मालिनी आणि विनोद खन्ना प्रमुख भुमिकेत. सिनेमाचं शुटींग सुरु झालं. ‘मीरा’ चा विषय पौराणिक होता. त्यामुळे बघता बघता सिनेमाचं बजेट वाढत गेलं.
निर्माता म्हणुन अधिक खर्च करणं प्रेमजींच्या आवाक्याबाहेर जात होतं, आणि नाईलाजास्तव ‘मीरा’ चं शुटींग थांबलं. यावेळी हेमा मालिनी यांनी प्रेमजींची अडचण जाणली. त्या प्रेमजींजवळ येऊन म्हणाल्या,
”तुम्ही माझ्या मानधनाची चिंता करु नका. तुम्ही सिनेमा पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करा. हा सिनेमा कृष्णवेड्या मीरेचा आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही मानधन मला द्याल, त्याचा मी स्वीकार करेन.”
हेमा मालिनी असं बोलल्यामुळे प्रेमजींना धीर आला.
संपूर्ण मानधन एका दमात देणं शक्य नसल्याने ज्या दिवशी हेमा शुटींगसाठी येतील त्या त्या दिवसाचं मानधन त्यांना प्रेमजींकडून देण्यात आलं. हेमा मालिनी यांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता मानधनाचं जे पाकीट मिळालं त्याचा स्वीकार केला.
१९७९ साली ‘मीरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. हेमा मालिनींची हि भुमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडली. ‘मीरा’ सिनेमाचा श्रीकृष्णभक्तीचा विषय हेमा मालिनींच्या खुप जवळचा.
यामुळे निर्माते प्रेमजींनी जे काही मानधन त्यांना दिलं ते त्यांनी खर्च न करता आजही स्वतःजवळ जपुन ठेवलं आहे.
‘शोले’ मध्ये गाव की छोरी झालेल्या हेमा मालिनी यांनी ‘मीरा’ मधला भक्तीभाव सुद्धा तितकाच तन्मयेने साकारला.
- देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू.
- शोले मध्ये त्याला एकच डायलॉग होता पण गब्बरच्या हाकेमूळं त्याला स्टार बनवलं.
- लग्नात जावून, राडा करून शेवटी धर्मेंद्रनं हेमाला पटवलीचं..!
- या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !