टीव्हीवर शेअर मार्केटचे सल्ले देत या भिडूने स्वतःचा पण डाव साधला

हर्षद मेहताची सिरीज येवून गेल्यापासून शेअर मार्केटला चांगलं मार्केट आलं. नवीन – नवीन पोरं तिकडं वळायला लागली. त्यातूनच शेअर मार्केट बद्दल सल्ले ऐकण्यासाठी दिवसभर टीव्हीपुढं बसायला लागली. यात प्रसिद्ध सीएनबीसी चॅनेलचा एक ‘शो’ हमखास बघितला जायचा.

त्यात अगदी शॉर्टकट आणि फुकटमध्ये सल्ला मिळायचा की कोणता शेअर कधी घ्यायचा आणि कधी विकायचा. किती तोटा सहन करू शकतो, किती नफा मिळेल. असा सगळा.

त्या ‘शो’ च नाव म्हणजे स्टॉक 20-20,

आणि हा शो होस्ट करायचे अँकर हेमंत घई. 

मोठा फेमस चेहरा. दिवसाला ‘स्टॉक 20-20’ सोबतच ‘मुनाफ़े की तैयारी’ आणि ‘पहला सौदा’ असे शो करायचे.

आता तुम्ही म्हणाल की मग वरच्या ‘स्टॉक 20-20’च नाव एवढ्या बोल्डमध्ये का सांगितलं? तर या शो मधून ते लोकांना सल्ले द्यायचे पण त्यातूनच हेमंत यांनी करोडोंने पैसा छापलाय. सेबीने आपल्या वेबसाईटवर ३५ पानांचे पीडीएफ टाकून त्यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. सगळे पैसे सरेंडर करायला सांगितले आहेत. यात त्याच्या आई आणि पत्नीवर देखील आरोप ठेवले आहेत. सोबत त्यांना ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे सल्ले देण्यावर पण निर्बंध घातले आहेत.

आणि हे सगळं त्यांनी केलयं ‘BTST’ ट्रेड या शेअर मार्केटच्या एका स्कीमचा फायदा उचलत.

तर गोष्ट अशी सुरु होतीय,

वर सांगितल्या प्रमाणे हेमंत आपल्या शो मधून लोकांना तुम्ही कोणता शेअर घ्यायचा, तो किती दिवस होल्ड करावा, कधी विकायचा, तो किती तोटा किंवा नफा घेऊन विकायचा, हे सगळं रिकमेंड करायचे. हे रेकमंडेशन्स केलेलं कायमच बरोबर असेल असं पण गणित नाही. पण मोठ्या प्रमाणावर लोक हा शो बघून अंदाज बांधायचे आणि व्यवहार करायचे.

म्हणजेच त्यामुळे ‘ट्रेडिंग वॉल्यूम’ या रेकमंडेशन्समुळे वाढायची.

तर तिकडे शेअर मार्केटमध्ये त्यांच्या पत्नी जया आणि आई श्याम मोहिनी यांची ट्रेडिंग अकाऊंट होती.

सेबीने त्यांना हेमंत यांच्यावर संशय कसा आला हे स्पष्ट केलेलं नाही, पण जया आणि श्याम मोहिनी यांच्या ट्रेडिंग अकाउंटमधून १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या दरम्यान NSE आणि BSE मधून काही शेअर्स खरेदी आणि विक्री केले ज्याचे व्यवहार हे हेमंत घई यांच्या रेकमंडेशन्स टायमिंग सोबत मॅच करतात. 

BTST (बाय टुडे सेल टुमारो म्हणजे आज खरेदी करा आणि उद्या विका) या पॅटर्नच्या ट्रेड्सच्या आधारावर SEBI ने प्राथमिक तपास केला.

#BTST ट्रेड

‘बाय टुडे, सेल टुमारो’. याच्या नावातच सगळं आहे. म्हणजे याच्यात शेयर्स आज खरेदी करायचा आणि विकायचा. BTST ट्रेडची ही एक वेगळीच स्पेशल कॅटेगिरी आहे. शेअर मार्केटच्या ‘बाय टुडे, सेल डे आफ़्टर टुमारो’, ‘बाय टुडे, सेल आफ़्टर ५ डेज़’, ‘बाय टुडे, सेल आफ़्टर वन मंथ’ यापेक्षा BTST हीच जरा स्पेशल आहे.

कारण शेअर मार्केटच्या नियमानुसार वेगवेगळ्या कॅटेगिरी जरी असल्या तरी ट्रेड सेटल व्हायला २ दिवस लागतात. या कॅटेगिरीमध्ये पण दोनच दिवस लागतात. पण यासोबतच SEBI तुम्हाला सूट देते की, डिलिव्हरीची वाट न बघता तुम्ही आपले शेयर्स विकू शकता. 

हेमंत यांनी या स्कीमचा वापर कसा केला? 

असं धरून चाला की हेमंत उद्याच्या दिवशी एखाद्या स्टॉक विषयी काही रेकमंडेशन देणार आहेत ते आदल्या दिवशीच आपल्या आईच्या किंवा बायकोच्या अकाउंटवरून शेयर्स खरेदी करायचे. आणि दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना त्याच शेअर्सला खरेदी करण्याचं रेकमंडेशन द्यायचे.

शेअर्स किंमत पण इतर गोष्टींसारखीच ‘डिमांड अँड सप्लाय’ वर अवलंबून असतीय. जर कोणत्या शेअर्सची डिमांड वाढली तर त्याची किंमत पण वाढते, डिमांड घटली तर किंमत पण घाटती.

तर व्हायचं कसं, घेई यांनी आदल्या दिवशी खरेदी करून दुसऱ्या दिवशी ते शेअर्स रिकामेंड केल्यामुळे त्या शेअर्सचा वॉल्यूम वाढायचा, खरेदी करणाऱ्यांची लाईन लागायची. आणि त्यातून त्या शेअर्सच्या किमती वाढायला चालू व्हायच्या. आणि ते परत दुसऱ्या दिवशी ज्या अकाउंट वरून खरेदी केलायं त्यावरूनच ते विकून टाकायचे.

SEBI ने आपल्या रिपोर्टमध्ये एक उदाहरण पण दिलयं. 

९ जानेवारी २०२० रोजी हेमंत घई यांनी ‘एप्टेक लिमिटेड’चे शेअर्स खरेदी करण्याचं रिकमेंड केलं होत, याच्या १ दिवस आधी म्हणजे ८ जानेवारी २०२० त्यांनी जया घई यांच्या अकाउंटवरून ‘एप्टेक लिमिटेड’चे ५२ हजार शेअर्स खरेदी केले. आणि सगळे ५२ हजार शेअर्स ९ जानेवारी २०२० रोजी ९:१५ ते ९:२२ या टायमिंग दरम्यान विकले.

जर या शेअरच्या ‘वॉल्यूम’चा नीट अभ्यास केला तर ८ जानेवारी २०२० च्या १० दिवस आधी ऍव्हरेज वॉल्यूम २.६६ लाखच्या आसपास होती. ९ जानेवारी या एका दिवसाचा अपवाद वगळता पुढच्या १० दिवसांच ऍव्हरेज वॉल्यूम ३.३३ लाखच्या आसपास होती. 

पण ९ जानेवारी २०२० रोजी म्हणजे ज्या दिवशी स्टॉक रिकमेंड झाला त्या दिवशी वॉल्यूम शूट होऊन जवळपास ४.४४ लाख च्या जवळ गेला होता. 

हे असं प्रत्येक शेअर्सला व्हायचं. पण काही दिवसांसाठीच किंमत झटक्यात वाढायची. पुन्हा नॉर्मल लेव्हला. म्हणजे सीएनबीसी या आपल्या सुप्रसिद्ध प्लॅटफॉर्मचा उपयोग करून त्या शेअर्स वाढलेल्या छोट्याश्या वेळेत हेमंत लाखो रुपये कमवायचे.

टायमिंग तर बघा, ९ वाजता मार्केट सुरु झाल्यानंतर ९:१५ पर्यंत ट्रेडिंग सुरु होत. आणि ‘एप्टेक’ मधील उदाहरणच टायमिंग बघितलं तर ऑल्मोस्ट ट्रेडिंग सुरु झालं की, काल घेतलेलं शेअर्स विकून मोकळं व्हायचं.

यावर सेबीने सांगितलं की, हेमंत यांनी अशा प्रकारे जवळपास थोडे-थोडके नाही तर २.९५ कोटी रुपये कमावले. ते पण अधिकृत ब्रोकरच्या हातातुन.

SEBI ने ब्रोकर आणि घई यांच्या दरम्यान झालेलं कॉल डिटेल्स पण तपासले, ज्यावरून हे स्पष्ट झालं की, आई आणि बायकोच्या अकाउंटवरून हेमंतच स्वतः व्यवहार करायचे.

यानंतर SEBI हेमंत, जया आणि श्याममोहन यांना शेअर्सवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात खरेदी-विक्री किंवा इव्हेस्टमेंटच्या संबंधित सल्ले देण्यावर निर्बंध घातले आहेत. तिघांचे बँक अकाउंट फ्रीझ केले असून सगळे पैसे जप्त केले आहेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.