औरंगजेबाचं जहाज लुटून हेन्री एव्हरी हा समुद्रातला सगळ्यात मोठा दरोडेखोर बनला ….

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन हा सिनेमा पाहिल्यानंतर कळलं असेल कि समुद्रात कशा प्रकारे लूट चालते. अशीच एक लूट घडवून आणली होती समुद्रातल्या एका सगळ्यात जबरदस्त दरोडेखोराने जी लूट आजवरची जगातली सगळ्यात मोठी लूट मानली जाते. जे जहाज या लूटीला बळी पडलं ते होतं औरंगजेबाचं. जाणून घेऊया या समुद्री लुटीबद्दल आणि त्या दरोडेखोराबद्दल.

तर समुद्रातला सगळ्यात मोठा लुटारू होता हेन्री एव्हरी. कुणाच्याही हाती न लागणारा आणि कुणाच्याही हातून मरण न पावणारा असा हा हेन्री एव्हरी होता.

१६९६ मध्ये मध्य अटलांटिक आणि भारतीय महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात हेन्री एव्हरीने लूट माजवली होती. त्याच्या जहाजाचं नाव सुद्धा एकदम भारी होत, जहाजाला नाव होतं फॅन्सी.

हेन्री एव्हरी हा काय आधीपासूनच समुद्री दरोडेखोर नव्हता तर तो अगोदर रॉयल नेव्हीचा क्रू मेम्बर होता. नंतर त्याने नंतर रॉयल नेव्हीसोबत गद्दारी केली आणि नेव्हीचंच जहाज बळकावलं. हे जहाज ताब्यात आल्याबरोबर हेन्री एव्हरीने स्वतःला सगळ्यात मोठा समुद्री डाकू घोषित केलं. यानंतर त्याने समुद्रात अनेक जहाज लुटली. या जहाजांवर सापडणाऱ्या तरुण पोरांना सोबत घेऊन हेन्रीने एक फौज बनवली होती आणि त्याच पोरांना घेऊन तो समुद्रात लुटपाट करत असायचा. 

याच काळात हेन्री एव्हरीला एक बातमी लागली कि रेड सी [ आशिया ,आफ्रिका ] मधून औरंगजेबाचा सोन्याने भरलेला एक जहाजांचा ताफा भारताकडे जात आहे. हे जहाज काहीही करून लुटायचं या हिशोबाने हेन्री एव्हरीने औरंगजेबाच्या जहाजाच्या ताफ्याच्या दिशेने कूच केलं. जहाजांच्या ताफ्याजवळ पोहचताच हेन्रीने जोरदार हल्लाबोल त्या ताफ्यावर केला. काहीवेळ गोळीबार चालला आणि औरंगजेबाच्या जहाजाच्या कॅप्टनने शरणागती पत्करली.

७ सप्टेंबर १६९५ रोजी हेन्रीने पुन्हा एकदा याच ताफ्यातील मुघलांचं जहाज गंज-ए-सवाई वर हल्ला चढवला. यात डझनभर तोफा आणि ४०० रायफलमॅन होते. तरीही हेन्रीने निकराने लढा दिला आणि जहाज ताब्यात घेतलं. सगळ्यात आधी त्याने गंज ए सवाईला वेढा घातला. मग मुख्य मस्तूल कापून टाकत तोफा खराब केल्या. जहाजावरचे शिपाई काही करू शकतील त्या आधीच हेन्रीने हल्ला केला होता.

या लढाईमध्ये भारतीय सैनिकांनी चांगली लढत दिली मात्र ऐन वेळी त्यांचा कॅप्टन फितूर निघाला आणि तो पळून गेला. यानंतर हेन्रीला जास्त मेहनत करावी लागली नाही त्याने जहाजावर कब्जा केला आणि जहाजातील प्रवाशांना बंदी बनवून टाकलं. इतिहासकार सांगतात कि त्या गंज-ए-सवाईमध्ये ६ करोड रुपयांची संपत्ती होती. हि लूट समुद्रातील सगळ्यात मोठी लूट होती.

पुढे हेन्री एव्हरीने आपली सगळी लूट सहकाऱ्यांमध्ये बरोबर विभागणी केली आणि आपलं जहाज घेऊन तो निघून गेला. कुठे गेला हे अजूनही कुणालाच माहिती नाही. कुणी म्हणतं तो आपलं जहाज घेऊन दुसऱ्या द्विपावर गेला तर कुणी म्हणतं कि तो अमेरिका युरोपमध्ये चांगल्या घरादारांमध्ये राहण्यासाठी निघून गेला. या लुटीमुळे औरंगजेब चिडला आणि त्याने हे जहाज शोधून काढण्याचे आदेश दिले. ब्रिटिश नेव्हीच्या सैनिकांनीसुद्धा हेन्री एव्हरीला शोधण्याची पराकाष्ठा केली. त्याच्यावर बक्षीस ठेवण्यात आलं जिवंत अथवा मृत. 

हेन्री कुणाच्याही हाती लागला नाही, ना त्याला कोणी मारू शकलं नाहीपण तो त्या लुटीनंतर गायब झाला हे हि एक रहस्य बनून गेलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.