जगात सोयाबीनची गाडी सुद्धा बनवून झालीय..ती ही फोर्डची

आज जगात भले ही लोकांनी नवनवे प्रयोग करू दे पण एका भिडून सोयाबीन पासून कार तयार करुन जगाला अचंब्यात टाकलं होतं.

हेनरी फोर्ड असं या भिडूच नाव.

आता या फोर्ड साहेबांना कोण नाही ओळखत सांगा. आज जी फोर्ड नावाची गाडी रस्त्यावर पळते तिचे जनक हे हेनरी फोर्ड साहेब. जगात ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या उत्पादनाची क्रांती करणारे हे फोर्ड साहेब.

यांच्या डोक्यात एकदा आलं की बायोप्लॅस्टिक कार बनवूया. आणि काय लागले गडी कामाला.

फोर्ड यांचं पर्यावरणावर अतिशय प्रेम. त्यांना अशी एखादी गाडी बनवण्याचं योगदान द्यायचं होत जे पर्यावरणा साठी संतुलित असेल. १९३० मध्ये त्यांनी फोर्ड बायोप्लास्टिकच उत्पादन आणि वापर सुरू केला.

आता जर तुम्हाला बायोप्लास्टिक माहीत नसेल तर ते सांगावं लागेल.

बायोप्लास्टिक हे एक प्रकारचं प्लॅस्टिकच असत. पण हे झाडांची पान आणि हायड्रोकार्बन पासून तयार केलं जातं. आता हे नॉर्मल प्लॅस्टिक सारख नसतं. म्हणजे साधं प्लॅस्टिक नष्ट व्हायला बरीच वर्ष लागतात. तर हे बायोप्लॅस्टिक अपल्यामनाने लवकर नष्ट होत.

हेनरी फोर्ड यांनी १९४१ मध्ये पहिली बायोप्लॅस्टिक कार तयार केली. आणि ते बायोप्लॅस्टिक चक्क सोयाबीन पासून तयार करण्यात आलं होतं. अशाप्रकारे आटोमोबाईल क्षेत्रात काहीतरी वेगळं तयार करणारे हेनरी फोर्ड हे इतिहासातील पहिले व्यक्ती होते.

त्यांनी त्या गाडीला सुद्धा नाव दिलेलं, ‘सोयाबीन ऑटो’

आता तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकची गाडी लगेच फुटेल की ?

नाही..याची काळजी सुद्धा फोर्ड यांनी घेतली होती. त्यांनी स्टील पासून बनवलेली आणि बायोप्लॅस्टिक पासून बनवलेली अशा दोन गाड्या आजूबाजूला उभ्या केल्या. त्या दोन्ही गाड्यांच्या पॅनल वर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. पण चेपली ती स्टीलची कार.

बायोप्लॅस्टिक पासून बनवलेल्या गाडीचे पार्ट एकदमच सुरक्षित होते.

फोर्ड मोटारने अशी गाडी बनवायला एक कारण पण होत. ते म्हणजे अख्या जगात स्टीलचा तुटवडा भासत होता.

१९३९ मध्ये जेव्हा फोर्ड ही बायोप्लास्टिक कार बनवत होते तेव्हा युरोपमध्ये दुसर महायुद्ध सुरू झालं होतं. अशा स्थितीत जगासह अमेरिकेलाही स्टीलची कमतरता भासत होती. अशा परिस्थितीत बायोप्लास्टिक्स कार उत्पादनात स्टीलची जागा घेईल आणि त्यामुळे स्टीलची बचत होईल, अशी आशा फोर्ड यांना होती.

१९४१ मध्ये फोर्ड यांनी न्यूयॉर्क टाइम्सला या कारबाबत मुलाखत दिली होती त्यावेळी ते म्हंटले,

या प्लास्टिकपासून बनवलेल्या कारमुळे अमेरिकेतील स्टीलचा वापर दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यात आणि हे प्लास्टिक सहज उपलब्ध आहे. सोया फायबर, फेनोलिक रेझिन आणि फॉर्मलडीहाइड या तीन गोष्टींपासून बनलेल आहे. त्यामुळे काहीच अवघड नाही.

या सोयाबीन कारचे वजन त्या काळातील इतर कारच्या तुलनेत ४५० किलो कमी होते. त्याचे एकूण वजन फक्त ९०७ किलो होत.

मग आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल तो म्हणजे गाडी है किधर ?

तर कार बाजारात येण्याच्या तयारीतच होती. फोर्ड देखील या कारबद्दल खूप उत्सुक होते पण ही कार बाजारात येऊ न शकल्याने त्यांचा उत्साह थंडावला. या कारचं फक्त एकच मॉडेल बनवण्यात आलं होतं जे नष्ट करण्यात आलं आणि दुसरी कार बनवण्याची योजना सुद्धा रद्द करण्यात आल्याच सांगण्यात येत.

आता ह्या गाडीचा प्रोजेक्ट डब्यात गेला कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अमेरिका सहभागी होणार होती. यानंतर अमेरिकेत कारच्या निर्मितीवरही बंदी घालण्यात आली. युद्धानंतर अमेरिका स्वतःचा पुनर्विकास करण्यात गुंतली, त्यामुळे या सोयाबीनच्या गाडीची चर्चाच संपली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.