शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आपल्यापुढे आणण्याचं काम केलं ते हेन्री ओक्झेंडनने

शिवराज्याभिषेक सोहळा.

अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे आला नाही.

पण या सोहळ्याची भव्यता, आपल्यासमोर लिखाणातून का होईना, उभी करण्याचे फार मोठे काम केले आहे एका परकीय व्यक्तीने..

त्या इंग्रज अधिकाऱ्याचे नाव होते ‘हेन्री ओक्झेंडन’.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र असलेल्या कितीतरी फ्रेम आज महाराष्ट्रात घरोघरी पहायला मिळतात. त्या चित्रात शिवाजी महाराजांना मुजरा करणारा इंग्रज अधिकारी दुसरा तिसरा कुणी नसून हेन्री ओक्झेंडन होय.

हेन्री इंग्लंड मधल्या सरदार घराण्यातील. हेन्रीचे सख्खे भाऊ आणि चुलते सगळेच कंपनी सरकारमध्ये नोकरी करत होते. हेन्रीच्या दोन्ही सख्ख्या भावांचे, जॉर्ज आणि क्रिस्तोफर यांचे थडगे आजही सुरतला पहायला मिळते. सुरतेचा प्रेसिडेंट असलेला जॉर्ज ओक्झेंडन हा हेन्रीचा जवळचा नातलग. अगदी तरुणपणापासून भारतात असल्यामुळे हेन्रीला इथल्या राजकीय परिस्थितीची पुरेपूर कल्पना होती.

शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आणि बदलत्या काळाची समीकरणे त्याला पूर्णपणे ठाऊक होती. म्हणूनच, इंग्रजांच्या काही मागण्या घेऊन शिवाजी महाराजांकडे तहाची बोलणी करण्यासाठी हेन्रीला पाठवण्याचे जॉर्जने ठरवले. सोबत नारायण शेणवी या दुभाषास धाडले. ही जोडगोळी एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनण्यासाठी मुंबईवरून निघाली.

१३ मे च्या रात्री एका गलबतातून हेन्री चौल बंदरावर येऊन पोहोचला. रात्री त्याला चौलमध्ये वेगळेच दृश्य दिसले. संपूर्ण वेशी रात्री आठ वाजताच बंद झालेल्या होत्या. थोडी चौकशी केल्यास त्याला असे समजले, की शिवाजी महाराजांच्या भीतीनेच या वेशी सूर्यास्ताच्या समयी बंद केल्या जात.

महाराजांच्या पराक्रमाची दहशत हेन्रीला एव्हाना कळून चुकली होती. दुसऱ्या दिवशी रायगडाकडे हेन्रीचा प्रवास सुरु झाला. छत्री निजामपूर, गांगवली या मार्गाने अखेर तो १९ मे रोजी पाचाडला पोहोचला. पण शिवाजी महाराज रायगडावर नाहीत, ते प्रतापगडाच्या भवानीदेवीच्या दर्शनास गेले असल्याची माहिती हेन्रीस मिळाली. २ दिवस त्याला पाचाडला मुक्काम करावा लागला.

२२ मे रोजी हेन्रीला गडावर बोलावणे आले. तो रायगड चढू लागला. पण गड चढत असताना त्याची नजर इतरत्र फिरत होती. रायगडाच्या प्रथम दर्शनाविषयी हेन्री लिहीतो,

‘फितुरीखेरीज हा गड अभेद्य आहे. कोणाच्याही ताब्यात तो जाण्याचा संबंध नाही. गडावरील राजमहाल, दरबार, घरे मिळून सुमारे तीनशे इमारती आहेत.’

२६ मे रोजी शिवाजी महाराज आणि हेन्रीची पहिली भेट झाली.

शिवाजी महाराजांना १ हिरेजडित शिरपेच, १ हिरेजडित सलकडी आणि २ मोती अशी १,६५० रु किमतीचा नजराणा हेन्रीने नजर केला. तर संभाजी महाराजांना २ सलकडी आणि ८ हिऱ्यांची एक कंठी नजर केली. शिवाजी महाराज आणि हेन्रीमध्ये तहाची बोलणी झाली. दोघांच्याही मनाप्रमाणे सर्व गोष्टी जुळून आल्या.

आता हेन्रीला महाराजांनी गडावर राहण्याची आज्ञा दिली. राज्याभिषेक सोहळा झाल्यावर गडाखाली उतरावे असे मंत्र्यांकडून सुचवण्यात आले.

६ जून १६७४

त्या इतिहासप्रसिद्ध दिवशी हेन्री सकाळी सातच्या सुमारास दरबारात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हेन्री झुकला. महाराजांना त्याने लवून मुजरा केला. सोबत असलेल्या दुभाषी नारायण शेणवीने आपल्या हातातील हिऱ्यांची अंगठी वर धरली. त्याच्यावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित झाल्यामुळे छत्रपतींचे हेन्रीकडे लक्ष वेधले.

महाराजांनी त्याला सिंहासनाच्या पायरीवर बोलावून घेतले. हेन्रीने ती अंगठी शिवाजी महाराजांना नजर केली. हेन्री फार थोडा वेळ सिंहसनाजवळ होता. त्यावेळेस हेन्रीने जे काही पाहिले, त्याचे वर्णन करताना हेन्री लिहीतो,

‘सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निदर्शक व राजसत्तेचा द्योतक चिन्हे मी पहिली. उजव्या हाताला मोठ्या दातांच्या मत्स्याची दोन मोठी सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातात अनके अश्वपुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.

राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो, तिथे दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूस झुलत होते. दोन देखणे पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट, कि हे प्राणी कुठून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हाला करवेना.

या प्रसंगी हेन्रीने एक महत्वाची नोंद केली आहे.

‘ भगवा ध्वज ‘ हे सार्वभौम राज्याचे निशाण म्हणून, जर ‘जरीकिनार असलेला ध्वज’ राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी वापरण्याचे ठरवण्यात आले..

हेन्रीने पुढे शिवाजी महाराजांना बद्दल लिहिले आहे, जी सर्वात महत्वपूर्ण नोंद आहे.

‘शिवाजी ४७ वर्षाचा देखणा होता. त्याच्या चेहर्यावरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्याचा वर्ण इतर मराठ्यापेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्याच्या दाढीस निमूळतेपणा असून बारीक मिशी (म्हणजे विरळ) होती. त्याचे भाषण निश्चयपूर्ण, स्पष्ट पण जलद होते.’

या हेन्रीच्या लेखणीतून आजही हा सोहळा महाराष्ट्र अक्षरशः जगतो आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या या महत्वपूर्ण प्रसंगाचे लिखाण करून हेन्रीने फार मोठा ठेवा आपल्या समोर उपलब्ध करून दिला आहे.

  •  भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.