कलेची जाण असणाऱ्या सावंतवाडीच्या राजमाता सत्वशीलादेवी. 

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले. त्या सावंतवाडी संस्थानाच्या राजमाता होत्या. अस संस्थान ज्याचा उल्लेख खुद्द म. गांधींनी रामराज्य असा केला होता. 

सत्वशीलादेवींचे सासरे म्हणजे पंचम खेमराज अर्थात बापुसाहेब महाराज यांच्या काळात महात्मा गांधी सावंतवाडीच्या राजवाड्यात महिनाभर वास्तव्यास होते. याच बापुसाहेबांचा उल्लेख खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायप्रिय राजा असा केला.

सयाजीराव गायकवाड यांच्या पणती व प्रतापसिंग गायकवाड यांच्या तिसऱ्या कन्या सरलाराजे. सरलाराजेंचा विवाह झाला सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत शिवरामराजे खेमसावंत भोसले यांच्याशी. 

सन १९५१ चा तो काळ. या साली सावंतवाडीला संस्थानाला त्यांच्या राजमाता मिळाल्या. 

हर हायनेस राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले.

लोकांची आणि लोककलेची जाण असणाऱ्या राजमाता म्हणून त्यांची ओळख. श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले यांच्या बद्दल सांगायच म्हणजे सावंतवाडीच्या गंजिफा आणि लाखकाम कलेला प्रोत्साहन देण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलं.

चित्रकला, भरतकाम, विणकाम यांची आवड जोपासणाऱ्या राजमातांनी स्वत: गंजिफा आणि लाखकाम बनवण्याच काम शिकून घेतलं. सावंतवाडीतील चितारी वर्गाकडे असणारी हि कला त्यांनी पांडुरंग चितारी या वृद्धकलाकारांकडून शिकून घेतली.

नुसतं शिकणं आणि कलाकारांना प्रोत्साहन देण इतक्यावरच राजमाता थांबल्या नाहित तर त्यांनी स्वत: मिनिअचर गंजिफा विकसित केला. कलेच्या विकासासाठी सावंतवाडी लॅकरवेअर्स नावाची संस्था स्थापन केली.

स्वत:च्या राजवाड्यातील एका इमारतीत स्थानिक कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तू, स्वत: तयार केलेल्या वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या. शे दोनशे पासून काही हजारांमध्ये विकल्या जाणाऱ्या या वस्तुमुळे सावंतवाडी खऱ्या अर्थाने कलाकारांच गाव बनु शकलं.

लोककलेसाठी खरा राजाश्रय निर्माण करणाऱ्या राजमाता सत्वशीलादेवी लोकांच्यासाठी नेहमीच उपस्थित असत. त्यांना एकदा एका पत्रकाराने विचारलं होतं. इंदिरा गांधींनी भत्ते बंद केल्यानंतर, राजेशाही गेल्यानंतर तुम्ही परस्थितीला कस जुळवून घेतलं ? तेव्हा राजमाता म्हणाल्या,”राजेशाही ओझ गेलं त्याचा आनंद वाटतो. आत्ता लोकांच्यात मनमोकळेपणाने मिसळता येत”.

अशा राजमाता सत्वशीलादेवी. बडोद्याच्या संस्थानाकडून मिळालेली, सासरे बापुसाहेबांनी संभाळलेली “लोकांचा राजा” होण्याची जाणिव त्यांनी देखील संभाळली. भल्या पहाटे मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महाराणी सावंतवाडीकरांना आठवत राहतील. 

Leave A Reply

Your email address will not be published.