पेट्रोल महाग झालंय? हा पठ्ठ्या बनवायचा पाण्यापासून हर्बल पेट्रोल !!

१६ सप्टेंबर १९९६. सगळ जग भारतातल्या तमिळनाडू कडे डोळे लावून बसल होतं. काही तरी अचाट प्रयोग घडणार होते आणि संपूर्ण जगाचा नकाशा बदलेल अशी घटना घडणार होती. पाण्यापासून तयार होणाऱ्या हर्बल पेट्रोलचे प्रयोग स्वतः तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यासमोर होणार होते.

नव्वदच दशक म्हणजे तेलाच्या युद्धाचा सर्वात सुवर्णकाळ. तेल हे सोने आहे हे सर्वमान्य सिद्ध झालेली थिएरी होती. पेट्रोलच्या वासावर सगळ जग होतं. महासत्ता असलेल्या अमेरिकेन तर निम्या अरब देशात युद्ध पुकारून बसली होती आणि उरलेल्या निम्म्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या राज्य करत होती.

पेट्रोलच्या किंमती चढ्या होत्या. पेट्रोल डीझेलशिवाय पानही हलणार नाही हे सत्य सगळ्यांना समजलेल होतं.

अस असेल तर फक्त पाण्यापासून जर पेट्रोल तयार होणार असेल तर या पेक्षा भारी काय असणार होतं?

जगात समुद्राचं एवढ पाणी आहे त्यापासून स्वस्तात इंधन बनवण्याची स्वप्न अनेक कंपन्यानी मांडली देखील होती. या सगळ्यांच लक्ष रमर पिल्लईवर होतं.

सेंट जॉर्ज किल्ल्यामधल्या आपल्या ऑफिसमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी तो प्रयोग करून पाहिला. रमरने मुख्यमंत्र्यानां दिलेले हर्बल त्यांनी दोन लिटर पाण्यात टाकले. जास्त नाही फक्त सहा थेंब. रमरने त्यात थोडस मीठ टाकल, थोडासा लिंबू पिळला आणि पंधरा मिनिटांनी ते द्रावण गाळून घेतलं.

हेच ते रमर हर्बल पेट्रोल

मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या साक्षीने उर्जा मंत्री विरास्वामीनी एक कापड घेतला त्यावर ते द्रावण चमचाभर एका टाकलं आणि काडेपेटी पेटवली. आश्चर्य म्हणजे अगदी पेट्रोल टाकलेल्या कापडाप्रमाणे ते हर्बल पाणीवाल कापड पेटू लागल. जमलेल्या सगळ्या मंत्र्यांनी, त्यांच्या सचिवानी टाळ्या वाजवल्या.संपूर्ण ऑफिस मध्ये पेट्रोल जळाल्याप्रमाणे वास सुटला होता. मुख्यमन्त्र्यानां म्हणजे अश्रू अनावर झाले.

“एवढा मोठा संशोधक आपल्या राज्यात जन्माला आलाय आणि आपल्याला ठाऊकच नाही. “

त्यांनी केंद्र सरकारकडे रमरला हर्बल पेट्रोलसाठी पेटंट मंजूर करावा म्हणून शिफारस केली, त्यासोबतच रमर पिल्लईला त्याच्या गावी एक रिसर्च लब उघडून देण्याच आश्वासन दिल. त्यासाठी  १० एकर जागा अलोटदेखील करून टाकली. तिथे त्याला कमांडोची सुरक्षा वगैरे देण्यात आली. दररोज ५० लिटर पेट्रोलची निर्मिती होणार होती.

तामिळनाडूच्या राजापालायम या छोट्याशा खेडेगावात रोज मोठमोठ्या गाड्या येऊ लागल्या. अगदी शाळा देखील पूर्ण न केलेल्या या वैज्ञानिकाच्या घराबाहेर पेट्रोल साठी रांग लागलेली असायची. भारतात तेव्हा साधे पेट्रोल ३५ रुपये होते तर रमरचे हर्बल पेट्रोल १० रुपये लिटर होते,.

त्याचे पेट्रोल टाकलेल्या गाड्या गावात धुरळा उडवत धावत होत्या. रमरचे प्रयोग बघायला गर्दी होत होती. 

यात जगभरातले पत्रकार होतेच शिवाय मोठे मोठे बिझनेसमन, तगडे राजकारणी यांचा समावेश होता. प्रत्येकाला रमर पिल्लईच्या पेट्रोलउद्योगात पार्टनरशिप हवी होती. यापूर्वी त्याला उलट टांगून त्याच्या कडून फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न देखील झाला होता. पण आता पोलीस संरक्षण असल्या मुळे ते शक्य नव्हते.

अगदी पर्यावरणपूरक शून्य प्रदूषण करणारे स्वस्त पेट्रोल अशी त्याची जाहिरात करण्यात आली. संपूर्ण देशाची उर्जेची गरज भागवता येईल आणि आपला देश अमेरिकेला मागे टाकून महासत्ता बनेल अशी स्वप्ने देखील रमर पिल्लई दाखवत होता.

पुढच्या २-३ वर्षात त्याने जवळपास साडे पंधरा लाख लिटर पेट्रोल विकले. कोट्यावधी पैसे कमवले.

संपूर्ण तामिळनाडूभर त्याच्या पेट्रोलचे पम्प सुरु होत होते. त्याने तुफान पैसा छापला. पण सोबतच त्याच्या पेट्रोलबद्दल काही तक्रारी येऊ लागल्या. अखेर आयआयटीमध्ये या द्रावणाची चाचणी घेण्यात आली आणि रमरचा दावा खोटा आहे हे सिद्ध झाले.

आयआयटी च्या दाव्यानंतर रमर पिल्लईला सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटासारखं बोलू लागला. पाण्यापासून पेट्रोल ही थाप आपण पैसे व नाव कमवण्यासाठी वापरली होती हे त्याने मान्य केले. त्याला कोर्टाने तुरुंगात टाकले.

काही वर्षांपूर्वी तो सुटला. आता तो ते पेट्रोल विकत नाही मात्र आजही आपण पाण्यापासून पेट्रोल बनवू शकतो हा दावा मात्र तो पुढे रेटतो.

त्याच्या म्हणण्यानुसार जगातल्या मोठ्या पेट्रोल कंपन्यानी त्याच्या विरुद्ध एक चाल खेळली आहे. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचही तो सांगत होता. मोदी सरकार आपल्याला वाचवू शकतात पण त्यांच्यापर्यंत मला पोहचू देत नाहीत असंही अजब तर्कशास्त्र त्याने मांडलं आहे.

आजही अनेकजण असे लोक आहेत ज्यांना वाटत की रमर चे हर्बल पेट्रोल ही खरी गोष्ट आहे.

तसही कोणत्याही गोष्टीला हर्बल नाव लावले तर भारतात लोक डोळे झाकून त्याची खरेदी करतात याचं उदाहरण आजही आपण घेतो. WHATSUP विद्यापीठाचे विद्यार्थी यांच मत आहे की भारताला पुढे जाऊ देऊ नये म्हणून अमेरिकन सरकार पाण्यापासून पेट्रोल अस्तित्वात येऊ देत नाही आहे.

आज सुद्धा तामिळनाडूच्या ग्रामीण भागात त्याची भाषणे होतात, देशभक्त लोक ती मनापासून ऐकतात आणि ५ रुपये पेट्रोलमध्ये अस्सल भारतीय हर्बल पेट्रोल टाकून देशाला महासत्ता बनवण्याची स्वने रंगवतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.