दारू, सिग्रेट, विमल, गायछाप, मावा खातो हे नव्या नवरीला अस सांगायचं असतय.

आत्ता कुठं तुळशीची लग्न झाली आहेत. अजून वेळ आहे. भिडू लोकांनो तस काही नसतय. बायोडेटा आला ना मार्केटमध्ये तर जमलं तर उद्या पण जमतय नाहीतर पाच वर्षांनी पण जमतय. ते स्वर्गात गाठी ठरवल्या जातात ना हे वाक्य प्युअर नास्तिकाला पण पटावं अशी आपल्या इथली लग्नसंस्कृती आहे.

बघु या वर्षी ठरलं अस एका कोपऱ्यात वाटतं आणि अचानक घरातले म्हणतात हा बघ फोटो वाटसअप ला आलाय. पसंत आहे अस वाटतच, तोच दुसऱ्या दिवशी स्पेंडरवरुन पाव्हणं दारात. तेव्हा कसं आपले दात स्वच्छ, सकाळचा टाईम असल्याने पुर्ण शुद्ध, माव्याचा दूसरा लॉट मारायला अजून तासभर आणि विमल तर खिश्यात. 

पाहूणं बेरकी असलं तर कोथळा बघून अंदाज लावतात, पण कसय घरातल्यांकडे नजर टाकून पोरगं सुधरलं या आशेवर जमवू म्हणतात. तुमची वेळ आली की, तुम्ही झटक्यात पाघळता. तसही कोणी आपल्याकडं बघावं अस आपल्याकडे काहीच नसतं. आत्तापर्यन्तच सगळं आयुष्य सिंगल गादीवर गेलेलं असत. त्यात रिलायन्सच जिओ आल्यानं लग्नाच फस्ट्रेशन तसही येत नाही. पण काय होत. ती बघते आणि हसते. मग आपल्या बत्यागुल. एका रात्रीत राममंदीर बांधून झाल्यासारखं तुम्ही खूष होवून जल्लोषाला लागता. 

पण पण पण रात्रीच्या विमलसोबत एक आवढां गिळला जातो तो टेन्शनचा.. 

एकतर घरात माहित नाही, त्यात आत्ता होणाऱ्या हिला सांगितलं आणि तीनं दंगा केला, लग्न मोडल तर काय. आणि सांगायचं झालं तर कस सांगायचं ? 

भिडूंनो, टेन्शन नाय. कठिण समय येता भिडू कामासी येतो… 

आत्ता ऐका कस सांगायचं ते…

आम्ही हा प्रश्न घेवून पहिला मॅरिड व्यसनी लोकांकडे गेलो. पाच, दहा, वीस वर्ष व्यसनी असून जे सुखाचा संसार करतायत त्यांना हे प्रश्न विचारले. त्यांच्याकडून जी उत्तरे मिळाली ती पहिल्या भागात.  

१)

एकाजणाचा संसार वीस वर्षाचा. तो तसा सिनियर. आम्ही टेबलावरच विचारलं, “वहिनींना भिता का”. 

पहिला हुर्रर्र केलं पण चौथ्या पॅकला म्हणलेच, “लय”. 

नंतर विचारलं मग मॅनेज कस करता, तेव्हा त्यांच उत्तर आलं आत्ता झाली सवय. 

पण दंगा होत नाही का ? 

हे बघ भिडू दंगा कधी होतो तर तू दंगा केल्यावर, आपण काय करतो शांततेत जातो आणि शांततेत झोपतो. दारूचा आपल्याकडचा मुख्य प्रोब्लेम गावातल्या एखाद्याच टार्गट माणसानं केलाय. तो काय करतो संत्रा मारतो आणि गावाच्या पारावरुन घरात जाईपर्यन्त सगळ्या गावाला शिव्या देत जातो. 

बायकांना दारूतलं काय कळतं? त्या म्हणतात दारू वाईट. पण आपण शांत रहायचं आणि त्या टार्गट माणसाकडं बोट दाखवायचं. हे बघ तस तर नाही न करत. बायको समजूतदार असली तर होतं हळुहळु क्लियर. 

पण पहिल्यांदा कधी सांगितलं. 

लगेच लग्नाच्या चौथ्या दिवशीच बोल्लो. 

काय म्हणला, 

हे बघ अस अस आहे. पण कधीतरी आठ दहा महिन्यातून. 

पुढं काय दोन एक महिने प्यायची नाय. 

नंतर जरा प्यायची. 

बारीक वास आला पाहीजे. पहिल्या टप्यात घरदार घाणलं ना तर मग तुमची सुट्टीनसते. 

म्हणजे कस डोस वाढवत न्यायचा, समोरच्या व्यक्तीला जशी सवय होईल तसा तसा.. 

तात्पर्य –  हळुहळु सांगा, विश्वासात घ्या. लग्नानंतर सांगा. मॅटेर सक्सेस. 

२) 

लग्नाचा चार पाच वर्ष झालेली. रिस्पेक्टेड माणूस. गावात सर आणि तालुक्याला विचारवंत अशी गणना. दारू पिणार पण मापात. समाजकार्य असो का टेबल. ते मापात पाप कधीच करत नाही. 

त्यांनी विचारण्यात आलं तेव्हा त्यांच उत्तर. 

मला चालून आलेल्या स्थळांपैकी मी प्रत्येक घरात सांगितलं होतं की, मला मुलीसोबत बोलायचं आहे. 

आत्ता लोक शहाणे झालेत. बोलून देतात. 

नंतर मी त्यांना सांगायचो, हे पहा मला असं,असं व्यसन आहे. मी या गोष्टी करतो. मी काही बंद करणार नाही ट्रेस साठी चांगल असतं ते, शिवाय बाहेरचं वातावरण भयावह आहेच. त्यामुळे कधीकधी घेतो. 

मग.. मग… 

मग काय सगळीकडून नकार यायचा पण एकजण भेटलीच. ती म्हणाली ठिक आहे, तुम्ही सुरवातीलाच हे सगळं सांगितलं आहे त्यामुळे विश्वास वाटतो. होकार आला. माझं मत आहे, वेळ लागेल लग्न ठरायला पण फसवणं चुकचं. तुम्ही आधी सांगितले मग केले या धर्तीवरच काम करायला हवं. 

तात्पर्य – पहिल्याच भेटीत सांगून मोकळे व्हा. वेळ लागेल पण समजून घेणारी सहकारी मिळेल. 

३) 

नुकतच लग्न झालेलं. त्याला विचारलं? कस जमलं? काय टेन्शन? 

त्याचं उत्तर आलं अजून सांगितलं नाही. गेल्या वर्षभरात पाच वेळाच पिलो असेल. ते पण ती गावाला गेली की, कधी एकदा गावाला जातेय अस होतय बघ… 

तात्पर्य –  अजून त्यालाच कळलं नाही, काय करायचं आपल्याला काय मिळणार

तर हि तीन उदाहरणं, 

लग्न झाल्यावर विश्वासात घेवून सांगाव, लग्नाच्या अगोदरच व्यसन मान्य करणाऱ्या मुलीसोबतच लग्न करावं नाहीतर शांतपणे व्यसन सोडून द्याव. 

आत्ता तुम्ही म्हणालं यात सिगरेट, मावा, विमल, गायछाप कुठायत. 

तर भावांनो…. 

सिगरेटचा वास घालवण्यासाठी मुलं परफ्युम मारतात. दारूपेक्षा मुली सिगरेटवाल्यांना चटकन नकार देतात हे ऑब्झर्वेशन दूसरी गोष्ट मावा तर ती स्टाईल आहे अस बऱ्याच जणांच मत. विमल, गायछाप लपवता येते किमान वर्षभर तरी… 

टिप – हे वाचून भावनेच्या भरात बायकोला सांगायला जावू नये. तुमच्या संसाराची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. ज्या हिमत्तीनं लग्न केलं किंवा करायचा विचार करताय त्याचं हिम्मतीनं जरा विचार करुन तुमचा निर्णय तुम्ही घ्या, कारण एकच,  “तुम्हीच तुमच्या बायकोला व्यवस्थित ओळखता.”

बाकी आम्ही व्यसनांच्या विरोधातच आहोत.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Vaibhav says

    युवा नेते , भावी आमदार , भावी सरपंच, उभरते नेतृत्व, लाखो दिलो की धडकन, आमचे श्रद्धास्थान, या विषयावर काहीतरी लिहा

Leave A Reply

Your email address will not be published.