ही आहेत महाराष्ट्रातली फेमस १० ढोल ताशा पथकं

 गणेशोत्सवाची चाहूल लागली की ढोल ताशांचे गजर कानावर पडू लागतात. उत्सवाच्या एक-दोन महिने आधीच कित्येक ठिकाणांवर ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होतो. मग गणरायाचं आगमन असो किंवा विसर्जन या ढोल ताशांच्या आवाजानं वातावरण भारावून जातं.

सुरुवातीला नाशिक ढोल आणि शाळेची पथकं इतकंच मर्यादित असलेलं पथकांचं लोण आता सगळ्या राज्यात पसरलंय. वेगवेगळ्या चाली, वेगवेगळी वाद्य आणि कित्येक नवे प्रयोग करुन ही पथकं गणेशोत्सव गाजवतात. विसर्जन मिरवणुकींसाठी ओळखलं जाणारं पुणे, मोठमोठ्या मुर्त्या ही शान असणारी मुंबई आणि नाशिक ढोल म्हणल्यावर डोळ्यांसमोर येणाऱ्या  असलेल्या हे दहा ढोल-ताशा पथकांबद्दल माहीती घेऊयात.

१) शिवगर्जना ढोल ताशा पथक

शिवगर्जना ढोल-ताशा पथकाची स्थापना २००२ मध्ये झाली. या पथकात ३७५ कायमस्वरूपी सदस्य आहेत. या पथकामध्ये एकूण ६३० मुले आणि मुली वादन करतात. २३५ ढोल आणि ६० ताशांचा संच पथकाकडे आहे. या पथकातील अनेक तरुण हे परदेशात स्थायिक झाले आहेत. अशाच स्थायिक होणाऱ्यांपैकी काही जणांनी ऑस्ट्रेलियामध्येही दोन शाखा सुरू केल्या आहेत. 

शंभूसुताय, करळी, लकडी वाद्य, कारमोळी ताल, ठेके, सात हात, गावठी हात असे अनेक पांरपरिक ताल हे पथक वाजवतं. सिडनी, डलेड, टोरांटो, शिकागो या ठिकाणी जाऊन शिवगर्जना पथकाने वादन केले आहे. 

गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच या पथकाकडून सरावाला सुरुवात होते. विशेषतः मुलींसाठी ढोलाची पाने ही फायबरची करून घेतली जातात. 

२) नादब्रह्म ढोल ताशा पथक 

नादब्रम्ह ढोल पथकाची स्थापना ही २०११ मध्ये करण्यात आली. या पथकाचे मुख्य वैशिट्य म्हणजे वेगळे ताल तयार करून ते वाजविले जातात. कुठल्या तरी गाण्याची चाल, जुने ताल न घेता दरवर्षी नादब्रह्म ढोल पथक नवीन ताल तयार करून वाजवत. 

दरवर्षी हे पथक सलमान खान यांच्या घरातील गणपती समोर वादन करतं. तसेच शिर्डी, तिरुपती, अक्कलकोट, उज्जैन सारख्या ठिकाणी जाऊन वादन केले आहे. या पथकात एकूण ७५० जण आहे. यात ढोल, ताशा आणि ध्वजवाहक आहेत. अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील मानाचा गुरुजी तालीम, भाऊ साहेब रंगारी, मार्केट यार्ड येथील गणपती समोर वादन केले जाते.  

२०१९ मध्ये या पथकाने कारागृहातील कैद्यांना ढोल शिकवले होते. या कैद्यांनी पुण्यातील मानाच्या गणपती समोर वादन केले होते.

३) कलावंत ढोल पथक

वर्षभर सिरीयल, सिनेमात करून वेळ मिळाल्यावर आवड जपणारे अनेक कलाकार आपण पाहिले असतील. असाच वेगळी आवड जपणाऱ्या काही मराठी कलाकारांनी २०१४ मध्ये एकत्र येत कलावंत ढोल ताशा पथक या नावाने एका ढोल पथकाची स्थापना केली. हे सर्व मराठी कलाकार एकत्र येत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

श्रुती मराठे, सौरभ गोखले, आस्ताद काळे यांनी एकत्र येऊन या पथकाची सुरुवात केली होती. यंदाच्या वर्षी या पथकाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. गणेशोत्सवाच्या दोन महिन्यांपासून पुण्यातील नूतन मराठी विद्यालय परिसरात कलावंत ढोल पथकातील कलाकार मंडळी एकत्र जमून सराव करतात.

तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, पल्लवी पाटील, अनुजा साठे, अभिज्ञा भावे, शाश्वती पिंपळीकर, अशी बरीचशी नामवंत कलाकार मंडळी तसेच बॅक आर्टिस्टही या पथकात सामील झाली आहेत. यावर्षी पथकाच्या रंगीत तालीममध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव सहभागी झाला होता.

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपती कसबा गणपती समोर हे पथक गेली ८ वर्ष वादन करत आहे.

४) शिवमुद्रा ढोल पथक

पुण्यात २०० पेक्षा जास्त ढोल पथके आहेत. यातील बऱ्याच पथकांना २५ वर्ष सुद्धा पूर्ण झाली आहेत. यातील एक म्हणजे शिवमुद्रा ढोल पथक. तरुणांना पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने या ढोल पथकाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली.

गेली १७ वर्ष शिवमुद्रा ढोल पथक पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि जिलब्या मारुती समोर वादन करत. मुंबईतील सेलेब्रेटींची बाफना सोसायटी आहे. तिथे हे पथक दरवर्षी वादन करत असत. यापूर्वी मुंबई, कराड, सातारा, सांगली येथे शिवमुद्रा ढोल पथकानं वादन केले आहे.    

शिवमुद्रा ढोल पथकाने मल्हारी, गरबा सारख्या पॅटर्न मध्ये ताल बसवले आहेत. त्यानुसार ते वादन करतात. ६५० पेक्षा जास्त जण शिवमुद्रा ढोल पथकात आहेत. गणेशोत्सवासाठी  १२५ जणांचे ४ गट करण्यात येतात. अनेक ढोल पथकात ध्वज नाचविण्यासाठी एक वेगळेच पथक असतं मात्र शिवमुद्रा ढोल पथकात ढोल वाजविणाऱ्या प्रत्येकाला ध्वज घ्यावाच लागतो. गणेशोत्सवाच्या एक महिन्यापूर्वी पासून ढोल वाजविण्याचा सराव करण्यात येतो. 

५) गिरगाव ध्वज पथक 

मुंबईतील पहिलं पथक म्हणून गिरगाव ध्वज पथक ओळखलं जात. २००५ मध्ये गिरगाव मधील १६ जणांनी मिळवून हे पथक सुरु केलं. गणेशोत्सवाबरोबर गिरगाव मध्ये निघणाऱ्या गुढीपाडवा मिरवणुकीत हे पथक मुख्य आकर्षण असतं. 

लालबाग भागातील काळेवाडीचा विघ्नहर्ता, मादुस्कर मूर्तिकार यांच्या गणेशोत्सव मिरवणुकीत हे पथक दरवर्षीं सामील होत असत. या पथकात ढोल बरोबर ताशा, बर्ची, झाँज पथक आहेत. या पथकात एकूण २५० सदस्य असून ते वर्षभर शनिवारी, रविवारी सराव करत असतात.  

लता मंगेशकर यांच्या घरी गणेशोत्सवात गिरगाव ध्वज पथकाने वादन केलं होत.  

६) स्व-रूपवर्धिनी ढोल पथक 

स्व-रूपवर्धिनी ही संस्था आहे. पुढे १९८२ मध्ये ढोल पथकाची स्थापन करण्यात आली आणि त्यावर्षीपासून मिरवणुकीत हे ढोल ताशा पथक सामील होत आहे. या संस्थेच्या १७ शाखा शहरात आहेत. या माध्यमातून ढोल वाजविण्याचा सराव करण्यात येतो. 

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती आणि प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर स्व-रूपवर्धिनी ढोल ताशा पथक वादन करत. पथकात ३५० जण आहेत, ढोल पथकाबरोबर झांज, लेझीम, टाळ पथक सुद्धा आहे. यात ५ वी ते १० वीची ५०० मुलं सहभागी होत असतात.   

रेल्वे ठेका हे या पथकाचे वैशिट्य आहेत. ज्यात पेसेंजर, लोकल, एक्सप्रेस, मेट्रो रेल्वेच्या आवाजाप्रमाणे ताल लावून ढोल वाजविला जातो. 

७) ताल वाद्यपथक

२०११ मध्ये स्थापन झालेलं हे पथक वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं. २०१२ मध्ये पाण्याच्या ड्रम्सपासून बनवलेले ‘झेंबे’ त्यांनी वाजवले होते. सोबतच संबळ, टाळ, पंजाबी ढोल अशा वेगवेगळ्या वाद्यांचं आणि ढोल ताशांचं फ्युजन बसवणारं हे पथक बऱ्याचदा चर्चेचा विषय असतं. 

२०१७ मध्ये त्यांनी संबळच्या ठेक्यावर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली होती. ‘भीमरुपी महारुद्रा’ हा त्यांनी बसवलेला ठेकाही प्रचंड लोकप्रिय आहे.  गणेशोत्सवाला साधारण २५ दिवस बाकी असताना या पथकाचा सराव सुरू होतो, पथकात एकूण १२५ मुलं आहेत .

८) श्रीराम ढोल ताशा पथक 

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या मानाच्या गणपती मिरवणुकीत श्रीराम ढोल ताशा पथक वादन करत. त्यात मानाचा कसबा, केसरीवाडा आणि बाबू गेनू, भाऊ साहेब रंगारी या मंडळासमोर वादन करता .

या ढोल ताशा पथकाची स्थापना १९९६ मध्ये झाली. या मंडळाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवाजी ताल, गावठी ताल लावणी ताल हे पथकातर्फ़े वाजविले जातात. पुण्याबरोबरच भोर, पिंपरी, भोसरी सारखा भागात श्रीराम ढोल पथकाच्या वतीने वादन केले जाते.

या पथकात सामील व्हायचे असेल तर दरवर्षी नव्याने ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. दरवर्षी ७०० जण पथकात सामील होता. १२५ जणाचा एक-ग्रुप तयार करण्यात येतो.

९) सहस्त्रनाद ढोल ताशा पथक (नाशिक)

पुण्याबरोबरच नाशिक येथील ढोल पथक हे राज्यभरात फेमस आहेत. नाशिक शहरात ३० मोठे ढोल पथक आहेत.  यातील सहस्त्रनाद ढोल ताशा पथकाची स्थापना ५ वर्षांपूर्वी झाली. या पथकात एकूण ३५० जण असून यात डॉक्टर, वकील हे सुद्धा सहभागी आहेत.

नाशिकचा मनाचा पहिला गणपती रविवार कारंजा मित्र मंडळच्या गणपती समोर हे पथक वादन करत. हे ढोल ताशा पथक गेली ५ वर्ष गुजरात, मध्यप्रदेश , हैद्राबाद येथे जाऊन वादन करतात. याच बरोबर हे ढोल पथक अनेक ठिकाणी जाऊन ढोल वाजविण्या संदर्भात वर्कशॉप घेत.  

शिवमुद्रा ताल हा ढोल पथकाचे वैशिट्य आहे. नाशिक ढोल, रामलखन सारखे ताल हे वाद्य पथक वाजवत.

१०) तालरूद्र ढोल ताशा पथक (नाशिक) 

नाशिक मधील ढोल ताशा पथकांना इतर राज्यात सुद्धा भरपूर मागणी असते. त्यातील एक ढोल पथक म्हणजे रामनगरी ढोल ताशा पथक. या पथकाची स्थापना २०१३ मध्ये झाली. 

नाशिक मधील इतर ढोल ताशा पथक हे ४ मात्रेचे ताल वाजवतात. रामनगरी ढोल ताशा पथकाचे वैशिट्य म्हणजे साडे नऊ मात्राचा सुनंद ताल वाजवतात. त्याच बरोबर नाशिक ढोल, डोलीबाजा, शिवस्तुती, संबळ सारखे ताल वाजवतात. या पथकात ३०० पेक्षा जास्त वादक आहेत. 

मुंबईतील चिंचपोकळी येथील प्रसिद्ध चिंतामणी गणपतीच्या मिरवणुकीत रामनगरी ढोल ताशा पथक सामील होत असतं. या पथकातील सदस्य गुरुपोर्णिमेपासून सरावाला सुरुवात करतात.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.