जगभरातल्या सेलिब्रिटींनी हिरो आलोमचा आदर्श घ्यावा

हिरो आलोम लक्षात आहे काय? हा तोच तो बांगलादेशी हिरो ज्याचे काही दिवसांपूर्वी आपण मिम बनवून शेअर करत होतो. सावळी मूर्ती, लांब केस, लुकडं शरीर, रंगीत ड्रेस सेन्स आणि सोबतीला एखादी मस्त फटकडी हिरॉईन अस रूप असलेल्या,

आपल्या डान्सने इंटरनेट बंद पाडणाऱ्या हिरो आलोम ला कोणीच विसरू शकणार नाही.

तो मूळचा बांगलादेशच्या बोगरा जिल्ह्याच्या इकलिया या गावाचा. खरं नाव अश्रफुल आलोम सईद. घरची परिस्थिती गरिबीची. वडील चणेफुटाणे विकायचे. तो त्यांचा पिढीजात धंदा होता.

अशातच बापाने दुसरं लग्न केलं आणि आलोम त्याची आई रस्त्यावर आले. हा दहाबारा वर्षाचा मुलगा आपल्या आईचा सहारा बनला.

सातवीत नापास झाल्यावर त्याची शाळा सुटली होती. दिवसभर वडिलांप्रमाणे चणे विकायचे आणि संध्याकाळी घरासमोरच्या एका व्हिडीओ पार्लर मध्ये हेल्परच काम करायचं अस त्याच शेड्युल होतं.

त्याच्या रखरखीत आयुष्यात त्या व्हिडिओ पार्लर मधले सिनेमे म्हणजे वरदान ठरले. सिनेमाच्या विश्वात तो रमून जायचा.

स्वतःला हिरोच्या जागी ठेवून स्वप्न बघायचा. त्याचे मित्र त्याच्या या वेडेपणाला हसायचे.

व्हीसीआरचा जमाना होता. लोक व्हीसीआर कॅसेट आणि प्लेअर भाडयाने न्यायचे. धंद्यात विशेष असा फायदा नव्हता. दुकानाच्या मालकाने दुकान विकायचं ठरवलं.

अलोमसाठी ते दुकान बंद होणे म्हणजे डोक्यावर आभाळ कोसळल्या प्रमाणे होतं.

त्याला सिनेमाच्या दुनियेतून बाहेर यायचं नव्हतं. खिशात पैसे नव्हते पण हे व्हीसीआरचं दुकान आपण चालवायचं अस आलोमने ठरवलं.

बरच दादापुता केल्यावर दुकानाचा मालक आलोम ला हे दुकान हप्त्यावर द्यायला तयार झाला. हिरो आलोमच वय तेव्हा फक्त 15 वर्षांच होतं. अजूनही दिवस भर चणे विकणे थांबवलं नाही. कष्ट सुरूच होते.

आलोमच्या मेहनती मुळे धंदा तेजीत सुरू झाला.

अशातच एकदा त्याच्या दुकानात नेहमी येणारा एक रेग्युलर कस्टमर अब्दुल रझ्झाक अलोमच्या कष्टाळू वृत्तीवर प्रचंड खुश झाला. त्याने त्याला थेट दत्तक घेतले.

त्यानंतर बिचाऱ्या आलोमच आयुष्य स्थिरावल. दुकानाचे सगळे हफ्ते फेडून दुकान आपल्या नावे केलं होता.

याच काळात बांगलादेशात केबल टीव्हीची लाट आली होती.

आलोमने अब्दूलच्या मदतीने आपल्या गावात केबल नेटवर्क सुरू केलं. त्यात चांगला पैसा मिळू लागला. आलोम ने एक लोकल बातम्या देणारं चॅनल देखील सुरू केलं होतं. त्याचं नाव होतं,

“सोकल-सोंधा केबल नेटवर्क”

या सोकल सोंधा केबल वर बातम्या बरोबर काही तरी चटकमटक एंटरटेनमेंट द्यायचा आलोमचा विचार होता.

अशातच त्याला कल्पना सुचली की म्युजिक व्हिडीओ बनवायचा आणि आपण हिरो बनायचं.

साहजिक त्याच रुपडं हिरोच नव्हतं, ना त्याला अभिनयाचा नृत्याचा गंध होता. पण जिद्दीने तो कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. रंग रूपाच्या कमतरतेवर त्याने आपल्या आत्मविश्वासाने मात केली.

आलोमचा पहिला व्हिडीओ 2008 साली तयार झाला होता ज्यात त्यानं आपल्या गावातील काही सुंदर मुलींना देखील घेतलं होतं. बघता बघता काहीच दिवसात अख्ख्या बांगलादेशमध्ये तो व्हिडीओ फेमस झाला आणि आलोमच रूपांतर हिरो आलोम मध्ये झालं.

बऱ्याच जनांनी त्याला वेड्यात काढलं, पण हिरो आलोमच्या चिकाटी पुढे कोणी टिकले नाहीत.

म्युजिक व्हिडीओमध्ये मॉडेलिंग करता करता पाठोपाठ शॉर्ट सिनेमे सुद्धा त्याने बनवले. तो त्याचा हिरो, दिग्दर्शक, म्युजिक डिरेक्टर, कोरिओग्राफर सगळंच होता.

हे सिनेमे बनवण्यासाठी पैसे देखील स्वतःच्या खिशातले घातले.

बांगलादेशात तो फेमस होताच पण युट्युबमुळे सगळ्या जगात त्याला ओळख मिळाली. चेष्टेचेष्टेत त्याने प्रचंड पब्लिसिटी मिळवली. भारत पाकिस्तान बांगलादेशच नाही तर युरोप अमेरिकेतही त्याचे बरेच फॅन्स असतील.

बांगलादेश फिल्मइंडस्ट्रीमध्ये सिनेमे ऑफर झाले. तिथे त्याला सुपरस्टारचा दर्जा मिळाला. अनेक सुंदर हिरॉईन त्याच्याबरोबर काम करण्यासाठी तडफडत असतात.

2009 मध्येच अलोमच लग्न झालंय. त्याला दोन मुलं देखील आहेत. बक्कळ पैसे आहेत. त्याने तिथली खासदारकीची निवडणूक देखील लढवली आहे.

एकेकाळी गल्लीतलं कुत्रं सुद्धा ज्याच्या सावलीत थांबायला लाजायचं असा आलोम हिरो बनलाय.

तो म्हणतो,

हे यश मला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी मी प्रचंड मेहनत केली आहे. वडिलांनी मला घराबाहेर काढलं तेव्हा सहज व्यसनाच्या आणि गुन्हेगारीच्या वाटेवर गेलो असतो. पण त्या ऐवजी मी माझ्या छंदाच्या जीवावर स्वतःच अस्तित्व बनवलं.

लोक मला टोमणे मारतात पण मला फरक पडत नाही. माझ्यावर प्रेम करणारं पब्लिक मला नवा उत्साह देते.

आज कोरोनाने जगभरात उच्छाद मांडलाय. अनेक इटली अमेरिका सारखे देश उन्मळून पडले आहेत. अशातच बांगलादेश सारख्या गरीब देशात कोणी मदतीला नाही पण हिरो आलोम आपल्या पब्लिक साठी धावून आलाय.

घरातून बाहेर न पडू शकत असलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या गरीब लोकांना तो स्वतः त्यांच्या दारात जाऊन जीवनावश्यक वस्तूच वाटप करतोय.

ज्यांनी त्याला चिडवलं त्यांना आलोम ने सिद्ध केलंय तो नुसता हिरो नाही तर बांगलादेशी जनतेसाठी सुपरहिरो आहे. त्याचा आदर्श भारतातील सेलिब्रिटी आणि नेतेमंडळीनी नक्की घ्यावा.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.