एका सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून ‘हिरो’ चा प्रवास सुरु झाला होता.

हिरो सायकल. आपल्या पैकी अनेकांनी वेगाच्या लाटेवरचं पहिलं पडल याच हिरो सायकलवरून मारल. प्रत्येकाच्या घरात सायकली असायच्या. त्यात आजोबाच्या काळापासून असलेली २४ इंची सायकलसुद्धा असायची. अनेक उन्हाळे पावसाळे या सायकलीनी बघितले. तिच्यावरच्या पुढच्या नळीवर बसून शाळेत पहिली एंट्री मारली होती.

पुढे याच नळीच्या मधून पाय टाकून सायकल शिकलो. मात्र शाळेत जाण्यासाठी हट्टाने हिरो रेंजर सायकल घेतली. त्यावरून जाताना उगाचच हिरो झाल्यासारखं वाटायचं. मग हळूहळू दहावीत गेल्यावर वडिलांची नजर चुकवून स्प्लेंडर पळवली, असच काही वर्षांनी स्वतःची बाईक घेतली तीही हिरोचीच.

आज खरोखर हिरो आपल्या टॅगलाईनप्रमाणे ‘देश की धडकन’ हे नाव सार्थ करत आहे.

एक काळ असा होता की सायकलीशिवाय निम्म्या भारताच पान हलत नव्हतं. आता सायकली कमी झाल्या आहेत, त्यातही महागड्या  परदेशी सायकली आल्या आहेत मात्र अजूनही हिरो सायकल आपला आब आणि आपला दर्जा राखून आहे.

मध्यंतरी जगातील सगळ्यात जास्त खपणारी सायकल म्हणून गिनीजबुकात तिची नोंद झाली होती. फक्त सायकलनिर्मिती नाही तर जगातील विक्रमी मोटरसायकल विक्री करणारी कंपनी सुद्धा हिरोचं आहे.

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की अशा या हिरोची सूरवात एका सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून झाली होती.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमध्ये एक जिल्हा आहे टोबा टेकसिंग नावाचा. तिथे एक छोटसं गाव आहे कमलिया. सुपीक जमीन, उत्तम शेती. खादी कापड बनण्यासाठी सुद्धा हे गाव फेमस आहे.  तिथे एक भाजी विकणार कुटुंब होतं. नाव बहादूरचंद मुंजाल.

या बहादूरचंद यांना चार मूले होती. मोठा दयानंद, ब्रिजमोहनलाल , सत्यानंद आणि सर्वात धाकटा ओमप्रकाश. ही चारही मुले लहानपणापासून खटपटी होती. काही ना काही प्रयोग करून बघणे. वस्तूंची तोडफोड नेहमीचीच होती. सगळ्यात थोरल्या  दयानंदने लाहोरमध्ये सायकल दुरूस्तीच दुकान सुरु केलं.

युरोपातून आलेल्या साध्या सरळ सोप्या सायकलीनी तोपर्यंत भारतात जम बसवला होता. या दुकानात काम करत असताना मुंजाळ बंधूना जाणवलं की सायकलीचे स्पेअरपार्टस भारतात मिळत नाहीत. युरोपातून मागवलेले पार्टस खूप महाग असतात. मग त्यांनी हे स्पेअर पार्टस बनवायचं ठरवलं. पंजाब मध्ये लाहोर, अमृतसर, लुधियाना येथे काही लोहार कारागीर होते जे हे स्पेअरपार्टस बनवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते फिनिशिंग जमत नव्हतं.

अशातच मुंजाल बंधूमधला ब्रिजमोहनलाल या बिझनेस मध्ये आला. तो ब्रिटीश रॉयल ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये काम करत होता. तिथे त्याने कास्टिंगचं वगैरे ज्ञान शिकून घेतलं होतं. तो आल्यावर मुंजाल बंधूंच्या बिझनेसने पुढचा गियर टाकला. त्यांनी बनवलेल्या स्पेअरपार्टसना देशभरून मागणी येऊ लागली.

सगळ सुरळीत चालू होत तेवढ्यात देशाला बदलून टाकणारी घटना घडली. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य.या स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबर फाळणीच्या जखमा देखील सोबतच आल्या. लाखो कुटुंबे बेघर झाली होती. यात मुंजाल देखील होते. पण त्यांनी हार मानली नाही. आपला उद्योग लुधियानाला शिफ्ट केला.

असं म्हणतात ना की ज्यांना संकटातही संधी दिसते तेच पुढे जाऊन इतिहास घडवतात.

हेच मुंजाल बंधूनी केलं. लुधियाना मध्ये रामग्रही म्हणून एक समाज आहे. त्यांचा  लोहारकामात कोणी हात धरू शकत नाही असं म्हणतात. मुंजाल बंधूना धंदा करायचं माहित होतं. त्यांनी या समाजातल्या काही जाणत्या कारागिरांना घेतलं आणि स्पेअर पार्टसचा बिझनेस मोठा केला.

याच काळात भारतात नवीन उद्योग सुरु होत होते. इंजिनियरिंग कॉलेज बनत होते, सरकार उपग्रह बनवण्याच्या तर टाटा, बजाज ही मंडळी गाड्या बनवायच्या मागे लागली होती. मुंजालनी ठरवलं की देश स्वतःच्या पायावर उभा राहतोय तर त्यात आपणही काही तरी वाटा उचली.

याच मधून सुरु झाली हिरो सायकल.

साल होतं १९५६. मार्केटमध्ये हर्क्युलससारख्या परदेशी सायकली तर होत्याच पण शिवाय अटलास वगैरे भारतीय बनावटीच्या सायकली देखील आल्या होत्या. हिरोने स्वस्त आणि टिकाऊ सायकली मार्केटमध्ये आणल्या आणि अल्पावधीतचं त्या फेमस देखील झाल्या.

बाकीचे तिन्ही भाऊ धंदा मोठा कसा करावा यासाठी झटत होते तेव्हा ब्रिजमोहनलाल यांना जर्मनीला सायकली बनवण्याचं अॅडव्हांस शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं. सगळ्यात धाकटा ओमप्रकाश हा देशभर सायकलींच प्रमोशन करण्यासाठी फिरत होता. त्याकाळचे उद्योग मंत्री मनसुखलाल शहा यांच्या मदतीने हिरोने आपल्या पुढच्या प्रवासातले गियर चेंज केले.

हिरोची सायकल आता भरधाव धावू लागली. पण याच दरम्यान या सायकलीचा आधारस्तंभ सगळ्यात मोठे बंधू दयानंद मुंजाल यांचं निधन झालं. पण बाकीच्या तिन्ही भावांनी न डगमगता आपली सायकल राईड सुरूच ठेवली. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी कंपनीचा धुरा आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्याच प्रयत्नातून सत्तरच्या दशकात हिरो सायकल भारतातली सर्वात मोठी सायकल कंपनी बनली. त्यांनी बाहेरच्या देशात सायकलींची निर्यात देखील सुरु केली.

एवढ्यावर हिरो वाल्यांची भूक शांत झाली नव्हती. त्यांना आता दुचाकी बनवण्याच्या बिझनेस मध्ये उतरायचं होतं.

दयानंद मुंजाल यांचं हिरोची स्वतःची स्कूटर असावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेजस्टिक ऑटो नावाची कंपनी स्थापन केली. इटालियन पेप्याजिओ कंपनीशी त्यांच बोलण चाललेलं. पण ती बोलणी यशस्वी झाली नाही. त्याकाळात बजाजची स्कूटर भारतात खूप फेमस होती. वर्षानुवर्षे लोक स्कूटर साठी बुकिंग करून वाट पहात होते. हिरोने ठरवलं की स्कूटरच्या ऐवजी मोटरबाईक बनवायची. तिथे स्पर्धाच नाही. आपल्या सायकलप्रमाणे हलक्या वजनाची सुटसुटीत मोटरसायकल बनवली तर ती सुपरहिट होणार हे त्यांच गणित होतं.

अखेर जपानच्या होंडाशी त्यांचा करार झाला. ऐंशीच्या दशकात जेव्हा शीख दंगलीमुळे पंजाब धगधगत होता तेव्हा पहिली हिरो होंडा सीडी १०० बाईक कारखान्यातून बाहेर पडली. हा काळ मुंजाल बंधूसाठी टॉप गियरचा होता. त्यांची सीडी १०० तर गाजलीच पण याच काळात त्यांच्या सायकल विक्रीने गिनीज बुकात नोंद झाली.

येत्या काळाप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये बदल करणे थांबवल नाही. कालांतराने हिरो आणि होंडा दोन्ही वेगळे झाले. मुंजाल खानदानाची तिसरी चौथी पिढी या उद्योगात आहे. सगळ्या कुटुंबात सामंजस्याने हिरो सायकल, हिरो मोटर अशी वेगवेगळी जबाबदारी वाटली गेली आहे. पण आजही हे मुंजाल कुटुंब लुधियाना मध्ये आपल्या पारंपरिक घरात राहते. सायकली तर फेमस आहेतच पण या शिवाय स्प्लेंडर, एक्सट्रीम पर्यंत अनेक गाड्या आजही भारतीय रस्ते गाजवत आहेत.

जवळपास सत्तर वर्षे झाली. हिरो सायकलचा फाळणीच्या खाचखळग्यातून सुरु झालेला प्रवास आज हजारो कोटीच्या उद्योगसमुहामध्ये झालाय. भारतातल्या कित्येक पिढ्या याचे साक्षीदार आहेत कारण हिरो जेट, सीडी १००, स्प्लेंडर, पॅशन असे दमदार साथीदार अजूनही आपल्या सोबत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.