आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुपरस्टार रमेश देव यांच्या हातून आपलं उपोषण सोडलं

काही माणसांचं व्यक्तिमत्त्व इतकं सदाबहार असतं, की त्यांना पाहताक्षणी क्षणोक्षणी त्यांच्या दिलखुलास स्वभावाचा अनुभव मिळतो. असाच एक व्यक्ती म्हणजे रमेश देव.

रमेश देव माहीत नाही, असा कोणीही मराठी प्रेक्षक सापडणार नाही. एकेठिकाणी बॉलिवुडमध्ये राजेश खन्ना सारखे कलाकार सुपरस्टार झाले. पण दुसरीकडे मराठी सिनेमांमधील मोठा स्टार असून सुद्धा रमेश देव हे कायम जवळचे वाटतात.

याला कारण म्हणजे त्यांचं सतत हसतमुख, प्रेमळ असं व्यक्तिमत्व. त्या जमान्यात बहुतेक स्त्रियांना रमेश देव यांच्याकडे पाहिल्यावर ‘पती असावा तर असा’ अशी भावना निर्माण होत असावी.

रमेश देव यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाजू कोणती असावी,

तर इतका मोठा स्टार असूनही त्यांनी कधी हे स्टारपद मिरवलं नाही.

त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. ज्या सहज रित्या त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं ठळक अस्तित्व निर्माण केलं, त्याच पद्धतीने बॉलिवुडमध्ये सुध्दा रमेश देव यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

हाडाचा कलाकार समोर कोणताही अभिनेता असला तरी न डगमगता स्वतःची भूमिका उत्तमरित्या साकारतो. ‘आनंद’ सिनेमात त्यांनी रंगवलेली डॉ. प्रकाश कुलकर्णी ही भूमिका काहीशी अशीच.

समोर राजेश खन्ना सारखा हिंदी मधला मातब्बर कलाकार , तर दुसऱ्या बाजूला अमिताभ बच्चन सारखा नवखा कलाकार. या दोन्ही कलाकारांबरोबर अभिनय करताना रमेश देव यांनी अभिनयाचा उत्तम समतोल साधला.

यामुळे आनंद सिनेमात असलेले रमेश देव सिनेमा संपल्यानंतर सुद्धा लक्षात राहतात.

रमेश देव यांचे मराठी सिनेसृष्टीत सुद्धा अनेक सिनेमे गाजले. या सर्व सिनेमांमध्ये रमेश देव यांच्या अभिनयाचा कळस गाठणारा सिनेमा म्हणजे ‘मोलकरीण’. आई आपल्याच मुलाच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला असते. परंतु मुलाला याची कल्पना नसते. जेव्हा घरी असणारी मोलकरीण ही आपली आई आहे हे मुलाला कळतं, तेव्हा आई ss आई ss अशी आर्त हाक मारून रमेश देव टाहो फोडतात. हा प्रसंग पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणून आपले डोळे नकळत पाणावतात.

कलाकाराचा स्वभाव जितका दिलखुलास असेल, तितकाच त्याचा अभिनय अधिक खुलून येतो. रमेश देव यांच्या बाबतीत काहीसं असंच म्हणावं लागेल.

रमेश देव यांच्या दिलदार स्वभावाचं एक उदाहरण.

रमेश देव त्यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकाच्या दौऱ्यासाठी नागपूरला गेले होते. नागपुरातील धनवटे रंगमंदिरात त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग सुरू होण्याआधी त्यांना कळालं की धनवटे रंगमंदिर समोर काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

मागण्या मान्य होण्यासाठी चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपोषणाला बसले होते. हे कळताच प्रयोग सुरू होण्यापूर्वी रमेश देव यांनी त्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट दिली.

आपुलकीने त्या सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आणि नंतर ते प्रयोगाला निघून गेले.

योगायोग म्हणजे, त्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.

सर्व विद्यार्थांना वाटलं की, रमेश देव यांच्या पायगुणामुळे हे झालं. आपल्या विजयाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांनी रमेश देव यांना विनंती केली. रमेश देव यांनी स्वतःचं स्टारपण बाजूला ठेवून त्या विद्यार्थ्यांचा आग्रह मोडला नाही.

विद्यार्थ्यांच्या विजयोत्सवात रमेश देव मनमोकळेपणाने सहभागी झाले. विद्यार्थी उपोषणाला बसले असल्याने त्यांनी काही खाल्लं नव्हतं, हे ते जाणून होते. त्यांनी तिथेच विद्यार्थ्यांच्या नेत्याला काही पैसे देऊन सर्वांसाठी सफरचंद आणायला सांगितले.

कलाकार म्हणून स्वतःभोवती असलेलं वलय काही क्षण बाजूला ठेवून इतक्या मुक्तपणे सामान्य माणसाच्या आनंदात सहभागी होणारे कलाकार सध्या सहसा पाहायला मिळत नाहीत.

रमेश देव यांनी वयाची ९० वर्ष ओलांडली आहेत. परंतु आजही त्यांच्या चेहऱ्यावरचं टवटवीत हास्य, आणि चिरतरुण उत्साह तसाच टिकून आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.