१२ वी नापास असल्याचा गवगवा कशाला, हे आहेत अधिक शिकलेले ८ क्रिकेटर… 

शिकून कोण मोठ्ठं झालय, तेंडुलकर तर १२ वी नापास आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात अभ्यास न करणाऱ्या पोरांसाठी हे वाक्य पेटंट वाक्य आहे. परिक्षेत कमी मार्क पडले किंवा नापास झाल्यास सचिन तेंडुलकरचं उदाहरण देवून वेळ मारून नेली जाते. 

पण भिडूंनो नेहमीच चुकीच्या गोष्टींच समर्थन कशाला करायचं. म्हणजे सचिन एखादाच होतो. तुमच्यात देखील सचिन होण्याची क्षमता असल्यास १२ वी पास होवून तेंडुलकर व्हायची स्वप्न बघायला काय हरकत आहे. असो सल्ला देणं आमचं काम नसल्याने इथेच थांबावं. 

आजचा मुद्दा आहे तो चांगले शिक्षित असणारे ८ क्रिकेटर,  हे शिकले पण सोबत खेळात देखील पुढे राहिले. 

१)अमय खुरासिया  (UPSC) 

अमय सुखारिया भारतासाठी १२ वन डे मॅच खेळले आहेत.  १९९९ साली श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यात त्यांनी पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याचं मॅचमध्ये त्यांनी ४५ बॉल्समध्ये ५७ धावा ठोकल्या होत्या.  पण या सर्व घडमोडींच्या पूर्वी या खेळाडूंने UPSC ची परिक्षा देवून पास होण्याची कर्तबगारी देखील केलेली होती. सध्या अमय खुरासिया इंडियन कस्टम ॲण्ड सेंट्रल एक्साईज खात्यात काम करतात. 

२)राहूल द्रविड 

राहूल द्रविड कोणाला माहित नाही. पण राहूल द्रविड हा उच्चशिक्षित आहे हे खूप कमी जणांना माहिती असेल.  शालेय जीवनात हुशार असणारा राहूल बंगलोरच्या जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मधून MBA पासआऊट आहे. 

३)अनिल कुंबळे ( मॅकेनिकल इंजिनियर ) 

कुंबळे आणि RHTDM चा मॅडी हे दोघे मॅकेनिकल इंजिनियर असल्याचा गर्वच नाही तर माज मॅकेनिकल इंजिनियर करणाऱ्या पोरांना असतो.  वर्गात मुलीच कमी असल्याने दूसरा कोणताही माज करता येत नसल्याने त्यांना अनिक कुंबळे शिवाय पर्याय नसतो हे देखील खरय.  अनिल कुंबळे कोणत्याही खाजगी कॉलेजातून डोनेशन भरून पास झालेला नाही तर तो बंगलोरच्या राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून पासआऊट विद्यार्थी आहे. 

४)जवागल श्रीनाथ 

भारताचा जलदगती गोलंदाज म्हणून श्रीनाथने आपला स्वत:चा असा फॅनबेस निर्माण केला होता. श्रीनाथ देखील इंजिनियर आहे. म्हैसूरच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून तो इन्स्ट्र्यूमेशन इंजिनियर म्हणून पासआऊट झालेला व्यक्ती आहे.  या काळात इंस्ट्र्यूमेंटेशन सारख्या फिल्डला विद्यार्थी जात नव्हते अशा काळात तो पास झालेला आहे. 

५)आर. अश्विन 

आर आश्विन आज क्रिकेट खेळत नसता तर चांदणी चौकाच्या ट्रॅफिकमध्ये तो रोज अडकला असता.  हिंजवडीत काम करत असता आणि बावधनला रुम शोधत फिरत असता.  पण एक गोष्ट नक्की तो काहीतरी करत तर असता.  आर.अश्विन चेन्नईच्या SSN कॉलेजमधून बीटेक झाला आहे. आयटी फिल्डमधून तो पास झाला. 

६)अविष्कार साळवी 

माजी गोलंदाज अविष्कार साळवींना भारतासाठी चार वन डे मॅच खेळल्या आहे. त्या काळात त्यांना भारताचा ग्लेन मॅग्रा म्हणायचे, पण जखमी झाल्यानंतर त्यांच करियर जास्त चालल नाही. त्यांनी एस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. 

७)मुरली विजय 

६१ कसोटी आणि १७ वन डे खेळणारा मुरली विजय इकोनॉमिक्स ॲण्ड फिलॉसॉफीत पदवीधर आहे. 

८) इरापल्ली प्रसन्ना 

जगप्रसिद्ध स्पिनर बॉलर प्रसन्ना यांच्या तर वडिलांनी अट घातली होती की शिक्षण पूर्ण करायचं. त्यांच्याच आग्रहामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेला प्रसन्नाने त्या दौऱ्यानंतर क्रिकेट बंद करून इंजिनियरिंगचं शिकायला गेला. वडिलांची इच्छा पूर्ण केली शिवाय इंजिनियरिंग झाल्यावर परत क्रिकेटमध्ये आले आणि फिरकीच्या जोरावर जगाला नाचवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.