लवकरच कंपल्सरी होणार असलेली ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ काय आहे?

गाड्यांवरची नंबर प्लेट कशासाठी असते? प्रत्येक गाडीची एक सेपरेट ओळख असावी, गाडीची नोंद आणि गाडीच्या मालकाबाबतही माहिती प्रशासनाकडे असावी म्हणून गाडीवर नंबर प्लेट असते. पण, बऱ्याचदा नेमकं याच उद्दिष्टापासून लपण्यासाठी आपल्याकडचे हुशार लोक नंबर प्लेट बदलतात. म्हणजे आपल्या गाडीची ओळख लपावी यासाठी नंबर प्लेट बदलणं अगदी सहज शक्य आहे.

त्यामुळे होतं असं की, एखाद्या गुन्ह्यात सहभागी झालेली गाडी शोधून काढणं पोलिसांना फार कठीण जातं.

नेमकं हेच थांबावं आणि सहज कोणतीही गाडी ट्रॅक करता यावी यासाठीच या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर उच्च सुरक्षा नंबर प्लेट अनिवार्य करण्यात येणार आहे.

ही नंबर प्लेट खरंतर २०१९ पासून नव्याने उत्पादित होणाऱ्या गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलीये. पण, आता जुन्या गाड्यांवरही ही नंबर प्लेट केंद्राने अनिवार्य केलीये आणि लवकरच महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्या गाड्यांवर या नंबर प्लेट्स नसतील त्यांच्यासाठी दंडाचीही तरतूद करण्यात आलीये.

या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स नक्की काय असतात ते बघुया…

ही नंबर प्लेट म्हणजे थ्रीडी हॉलोग्राम स्टीकर असतं.

या प्लेट्स अ‍ॅल्युमिनीयम मिश्र धातुपासून बनवलेल्या असतात. केंद्राने १ एप्रिल २०१९ साली प्रत्येक नव्याने उत्पादित होणाऱ्या गाडीवर अनिवार्य केलेल्या या नंबर प्लेटवर गाडीचा इंजिन नंबर, चेसी नंबर हे डीटेल्स असतात. याशिवाय या प्लेट्सवर एक बारकोडही असतो. हा बारकोड प्रत्येक गाडीला वेगवेगळा असतो. हा बारकोड स्कॅन केल्यावर पोलिसांना गाडीबद्दलची सगळी माहिती मिळते.

येवढंच नाही तर, या प्लेटवर एक चीप आणि सिक्रेट नंबरही असतो.

ही प्लेट गाडीवर बसवली की, लगेच हा नंबर दोन्ही बाजूने लॉक होतो. मग, कुणीही ते लॉक उघडू शकत नाही. ही धातुपासून बनवलेली प्लेट एकदा गाडीशी जोडली गेली की, पुन्हा काढता येत नाही. गाड्यांची सुरक्षा आणि गाड्यांची माहिती व्यवस्थितपणे सांभाळता आणि हाताळता यावी यासाठी या नंबर प्लेट्स अनिवार्य करण्याचा निर्णय २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला होता.

या प्लेटमुळे वाहनांना हाय सिक्युरिटी मिळते.

आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे कशी मिळते असा प्रश्न मनात आला असेल. त्याचं उत्तर या नंबर प्लेटच्या फीचर्समध्ये आहे. आता या नंबर प्लेटवर युनिक बारकोड असणार आहे, चीप असणार आहे, त्यामुळे पोलिसांना एखादी विशिष्ट गाडी शोधायला किंवा एखाद्या गाडीविषयीची माहिती गोळा करायला फायदा होतो.

चोरीला गेलेली गाडी शोधण्यातही या नंबर प्लेटमुळे मदत होते. इतकंच नाही तर, गाडी चोरी केल्यानंतर चोराने जर ही प्लेट गाडीपासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर, गाडीच्या मालकाला त्या संदर्भातला मेसेजही जातो.

ही नंबरप्लेट केंद्राने २०१९ पासून अनिवार्य केलीये. २०१९ च्या आधीच्या गाड्यांसाठी महाराष्ट्रात अजूनतरी निर्णय झालेला नाही.

महाराष्ट्रात या नंबरप्लेट्स जुन्या गाड्यांवर अनिवार्य करायच्या की नाही या संदर्भात चर्चा सुरू आहेत. अजूनपर्यंत हा नियम आलेला नसला तरी, या नंबर प्लेट्सचे विविध फायदे बघता हा नियम कधीही लागू होऊ शकतो.

केंद्राने मात्र जुन्या गाड्यांसाठीची नियमावली जाहीर केलीये.

या नियमावलीनुसार १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या गाड्यांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कंपल्सरी असणार आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर अश्या दोन्ही प्रकारच्या वाहनांना या प्लेट्स लावणं अनिवार्य केलंय. याशिवाय तुमची गाडी पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांपैकी कोणत्या इंधनावर चालते हे दाखवणारे कलर कोडेड स्टीकर्स लावणंही अनिवार्य असेल. या नियमांचं उल्लंघन केलं तर, पाच हजार ते दहा हजार इतका दंड ठोठावला जाऊ शकतो.

या पाट्या मिळवण्यासाठी बाईकवाल्यांना ४०० तर कारवाल्यांना १,१०० रुपये खर्च येणारे.

पण, हे पैसे कुठे भरायचे आणि ही नंबर प्लेट कुठून मिळवायची?

या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एचएसआरपी सुद्धा म्हणतात. bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन आपण आपली हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंद करू शकतो. वाहन क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन प्रकार ही माहिती तिथं भरायची.

मग आपल्याला मोबाईल नंबरवर युजरनेम आणि पासवर्ड येईल.

हा युजरनेम आणि पासवर्ड आला की मग, तो पासवर्ड वापरून तुम्ही लॉगइन करायचं आणि मग ऑनलाईन ते शुल्क भरून तुम्ही रजजिस्टर करू शकता आणि मग तुमच्या वाहनाचा उच्च सुरक्षा क्रमांक तयार झाला की, तुम्हाला मोबाईलवर तसं नोटीफाय केलं जातं.

पण सध्या चर्चा असली, तरी महाराष्ट्र सरकारने अद्याप या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स महाराष्ट्रात अनिवार्य केल्या नसल्याने याबाबतची डेड लाईनही देण्यात आलेली नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.