आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या स्पोर्ट्स बजेटचं श्रेय ऑलिम्पियन्सला दिलं पाहिजे भिडू

आपल्या देशात राजकारण या विषयात सगळे जण एक्सपर्ट असतात. म्हणजे निवडणुकीला उभा रहा म्हणलं तर नाही म्हणतील, पण मापं काढण्यात मात्र एक नंबर. राजकारणानंतर ही एक्स्पर्ट गॅंग असते खेळात… स्वतः हातात बॅट धरली नसेल, तरी कोहली, धोनीचा बाजार उठवायचा. आपला लॉजिक हा विषय गंडलेला असलेला तरी विश्वनाथन आनंदचा फॉर्म कसा बिघडलाय यावर रान हाणायचं. त्यात या सगळ्याचं वाईट वैगरे पण वाटायचं नाही… कारण खेळावर गप्पा मारणं हे आपल्या सवयीचं झालंय.

पण तरीही गप्पांचा आणि चर्चांचा विषय कायम क्रिकेटभोवतीच घुटमळायचा. ॲथलेटिक्स, हॉकी, कबड्डी या खेळांची तेवढ्यापुरती लाट येते आणि गायबही होते. मात्र ही सगळी परिस्थिती बदलली, ती २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक्सनं.

या स्पर्धेत भारतीयांच्या कामगिरीचा आलेख जबरदस्त उंचावला. एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि चार ब्रॉंझ अशी एकूण सात मेडल्स आपल्या नावावर केली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकत ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देण्याचा भीमपराक्रम केला. पुरुषांच्या हॉकी टीमनं जिगरबाज खेळ करत ब्रॉंझ पदक मिळवलं आणि देशात पुन्हा एकदा ‘चक दे इंडिया’चा माहोल तयार झाला. क्रिकेट सोडून दुसऱ्या खेळांकडे लोकांचं लक्ष गेलं.

भारतानं ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं यश खेळाडूंचे जबरदस्त प्रयत्न तर होतेच, पण सोबतच सरकारनं खेळाडूंना दिलेल्या विविध सुविधाही होत्या. खेळाडूंसाठी आणि खेळांसाठी वाढवलेल्या बजेटचा हा परिणाम होता. त्यामुळंच यंदाच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, यंदाचं स्पोर्ट्स बजेट आतापर्यंतचं सर्वात मोठं स्पोर्ट्स बजेट ठरलं आहे.

आकडे काय सांगतात…

तर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३०६२.६० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. गेल्यावर्षीच्या बजेटपेक्षा यावेळी क्रीडा क्षेत्राला तब्बल ३०० कोटी रुपये जास्त मिळणार आहेत.

गेल्या काही वर्षांतलं स्पोर्ट्स बजेट पाहिलं, तर २०२१-२२ मध्ये २५९६ कोटी, २०२०-२१ मध्ये २८२६ कोटी, २०१९-२० मध्ये २७७६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावर्षीच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्राला ३०० कोटींचा बूस्टर मिळाला असला, तरी पहिल्यांदाच एवढी मोठी वाढ झाली आहे असं नाही.

याआधी, २०१८-१९ मध्ये २१९७ कोटी असलेल्या स्पोर्ट्स बजेटनं २०१९-२० मध्ये जवळपास ६०० कोटींची झेप घेतली होती. तर मोदी सरकारनं आपल्या पहिल्याच बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी आधीच्या बजेटपेक्षा ५०० कोटी रुपये जास्त जाहीर केले होते. यावेळी ३००० कोटींचा आकडा पार झाल्यानं, खेळाडू, प्रशिक्षक यांच्यात आनंदाचं वातावरण नक्कीच असेल.

ही वाढलेली तरतूद कशासाठी करण्यात आली आहे?

गेल्या वर्षी लॉकडाऊन आणि कोविडच्या थैमानामुळं क्रीडा क्षेत्राला दिलेल्या बजेटमध्ये कपात करण्यात आली होती. सोबतच स्पर्धांची संख्याही रोडावली होती. सरकारनं ऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड गेम्ससाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदतही केली होती. त्यातच आता सरकारनं बजेटमध्ये वाढ करायचं ठरवलेलं असल्यानं खेळाडूंना आणखी अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही रक्कम यावर्षी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्सच्या तयारीसाठी उपयोगी येईल. नॅशनल युथ एम्पॉवरमेंट प्रोग्रॅमसाठीची तरतूदही वाढवण्यात आली आहे. गेल्या बजेटमध्ये ही रक्कम १०८ कोटी होती, तर आता १३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उदयोन्मुख क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या खेलो इंडियासाठीची तरतूदही जवळपास १०० कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

त्यामुळं निश्चितच यंदाचा अर्थसंकल्प क्रीडा विश्वासाठी समाधानकारक आहे आणि हा बदल घडवण्यात ऑलिम्पियन्सनं मिळवलेल्या यशाचा महत्त्वाचा वाटा आहे. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.