पंक्चरवाल्यांची गॅंग लोकांना कस गंडवतात जरा समजून घ्या
आज मला समग्र गाडीवानांची व्यथा मांडू वाटते. म्हणजे मी एक गाडीवान बोलतोय आणि आज माझी गाडी पंक्चर झाली.
हे असं स्वतःची आत्मकथा वैगरे मांडण किती दुःखदायक असतं हे तुम्हाला तुमची गाडी पंक्चर झाल्याशिवाय नाही समजणार. असो…
तर आज माझी गाडी पंक्चर झाली. आणि टायरला एक नव्हे दोन नव्हे, तब्बल चार चार पंक्चर होते. मग काय एकदम दोन तीन मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर पंक्चरवाल्याच दुकान होत. मग काय गेलो तिकडे पंक्चर काढायला. तिथे घडलेला प्रसंग म्हणजे,
ऑफिसला निघायला जरा उशीरच झाला होता. बाईक काढली आणि सुसाट निघालो. सकाळी सकाळी रस्त्यात ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे आज ऑफिसात जरा लवकरच पोचायची आशा होती. पण मध्येच लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. मग म्हणलं हवा भरून घेऊ. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली.
साब गाडी पंक्चर है. बनाना पडेगा.
काय करणार ? कपाळाला हात मारला, नशिबाला दोष देत, निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो. मागचं टायर पंक्चर होतं. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले. मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो. पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले. म्हणजे किमन १२० रुपयाला फटका. त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.
गप्पा मारता मारता त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले. त्यातला मोठा आणि जास्त किंमतीचा पॅच गळ्यात मारला. असे करुन ५०० रुपये उकळले. ऑफिसला पोचायला उशीर व्हायचा तसा झालाच.
गाडीत चालवत चालवत सकाळी सकाळी ५०० रुपयांना लागलेल्या बांबूचा विचार करत करत डोक्यात आलं राव आपल्याला उल्लू बनवलंय, पोरांनी.
मला काही प्रश्न पडले
- पेट्रोल पंपवाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात ?
- टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का ? की ती एक बिझनेस ट्रिक आहे ?
- टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात ? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच पुण्यात शहरात २५० ला का ?
- चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते?
- रस्त्यात एव्हढे खिळे कुठुन येतात ?
मग एक बातमी वाचलेली आठवली. बातमी होती या पंक्चरवाल्यांच्या गँग असतात म्हणे..
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून जुना पुणे-मुंबई महामार्ग. या महामार्गावर पंक्चर माफियांचे जाळे आहे.
हा माफिया एखाद्या दुचाकीला हेरून दुचाकीस्वाराला हवा भरण्यास पंक्चर काढून घेण्यास सांगतात. दुचाकी जेंव्हा पंक्चरच्या दुकानात नेली जाते, तेंव्हा एकापेक्षा अधिक पंक्चर दाखवून दुचाकीस्वारांना लुटले जाते. त्यामुळे तुम्ही जर या मार्गाने प्रवास करत असाल तर सावधान.
दुसरी बातमी.
खाजगी गाडीने पुण्याहून पिंपरी-चिंचवड आणि पिंपरी-चिंचवडहून पुण्याकडे जाताना बोपोडी परिसरात तुमची गाडी अचानक पंक्चर होऊ शकते. गाडीच्या चाकातली हवा कमी होऊ शकते. विशेष म्हणजे हा प्रकार तुमच्या अगोदर रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या दुचाकीस्वाराच्या लक्षात येऊ शकतो. जर असा प्रकार तुमच्यासोबत झाला, तर सावध रहा. कारण तुम्ही पंक्चर माफियाच्या जाळ्यात अडकू शकता.
म्हणजे पंक्चर माफिया सुद्धा असतात. कसला विषय हार्ड आहे. इथं वाळू माफीये, ड्रग्ज माफीये कमी पडले म्हणून पंक्चर माफीये आले.
हे माफीये गाडीवनांना नाहक त्रास देऊन लुटतात. काही गॅरेज चालक त्यांच्या काही पंटर लोकांना दुचाकीवर तैनात करतात. एखादे वाहन हेरून हे दुचाकीस्वार हेरलेल्या व्यक्तीच्या वाहनात हवा कमी आहे, पंक्चर आहे असे सांगतात. वाहन प्रेमी नागरिक पुढे काही अनर्थ घडू नये म्हणून लगेच वाहन बाजूला घेतात. हीच संधी साधून दुचाकीस्वार त्या हेरलेल्या वाहन चालकाजवळ येतात आणि जवळच पंक्चरचे दुकान आहे. तिथे गाडी दाखवून घ्या, असा सल्ला देतात.
वाहन चालक जवळ असलेल्या पंक्चरच्या दुकानात जातो आणि गाडी दाखवतो. इथून पुढे दुकानदाराची भूमिका सुरु होते. दुकानदार वाहनाचे टायर खोलताना अनेक ठिकाणी लोखंडी टोच्याने पंक्चर करतो. असे करून पंक्चर दुकानदार वाहन चाकाकडून भलीमोठी रक्कम लुबाडतो. वाहन चालक देखील पंक्चर दुकानदाराने केलेल्या पंक्चरसाठी नाईलाजाने पैसे देतात.
हे असं होऊ नये म्हणून काय करता येऊ शकत ? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…वाट बघतोय.