हिमाचलमध्ये काँग्रेसची हवा नाही, मुख्यमंत्र्यांच्या मते भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय

हिमाचल प्रदेश म्हणलं की, थंडगार हवा, हिरवीगार मैदानं, पर्यटकांची गर्दी आणि गोल टोप्या घातलेली बारकी बारकी पोरं हमखास आठवतात. याच हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात फुल धुरळा उठला होता, हा धुरळा उठण्याचं कारण होतं निवडणूका.

आता तुम्ही म्हणाल धुरळा उठला होता गेल्या महिन्यात, मग भिडू तू आत्ता काय सांगतोय.

धुरळा शांत झाला असला, तरी पडसाद उमटलेच आहेत की. या निकालाचे पडसाद उमटले, भाजपच्या चिंतन बैठकीत. त्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पराभवाची कारणं स्वतःच सांगितली आणि इलेक्शन बाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं.

सगळ्यात आधी सांगतो, की इलेक्शन कसलं होतं…

तर हिमाचल प्रदेशमध्ये पार पडल्या पोटनिवडणूका. यात एका मंडी लोकसभा मतदारसंघ, तर अर्की, फतेहपूर आणि जुब्बल-कोटखाई या तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका पार पडल्या. मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मंडी मतदार संघातून भाजपनं ४.५ लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. सध्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री असणाऱ्या जयराम ठाकूर यांच्यासाठी मंडी हे होमग्राऊंड आहे. असं असूनही भाजपला आपला किल्ला राखता आला नाही.

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांनी मंडीमधून बाजी मारली. उरलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघातही भाजपच्या पदरी निराशाच आली. हिमाचलच्या विधानसभा निवडणूका पुढच्या वर्षी होणार आहेत, त्यामुळं निवडणूका तोंडावर असताना भाजपचा असा पराभव झाल्यानं त्यांच्या गोटात टेन्शन पसरलं.

याबाबतीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काही माध्यमांशी संवाद साधला. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये अशी चर्चा आहे की, काँग्रेसची हवा तयार झाली आहे. जयराम ठाकूर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

त्यांच्यामते, पराभवाच्या अनेक एक कारणांपैकी एक कारण म्हणजे पक्षाला अति-आत्मविश्वास नडला आहे.

‘राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. आपली सत्ता असल्यामुळं आपण पुन्हा एकदा निवडून येऊ असा कार्यकर्त्यांचा भ्रम होता. या पराभवामुळं आमचे डोळे निश्चितच उघडले आहेत. पोटनिवडणुकांच्या आधारे विधानसभा निवडणुकांबाबतचा अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आता मिळालेल्या ब्रेकमुळं आम्ही चिंतन करू आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आणखी ताकदीनं उतरु,’ असं ठाकूर म्हणाले.

राज्यात काँग्रेसची हवा सुरु झालीये का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘वीरभद्र सिंग हे राज्यातले मोठे नेते होते. त्यांच्या निधनानंतर आलेल्या सहानुभुतीच्या लाटेमुळं काँग्रेसनं हा विजय मिळवला आहे. आमच्याही आमदाराचं निधन झालं होतं. मात्र पक्षाच्या नियमानुसार निवडणुकांसाठी काम बघून तिकीट दिलं जातं, घराणेशाहीमुळं नाही. त्यामुळंच आमदारपुत्र चेतन ब्राग्टा यांना तिकीट देण्यात आलं नाही. ही सहानुभूतीची लाट विधानसभा निवडणुकांपर्यंत टिकेल या भ्रमात काँग्रेसनं राहू नये.’

पक्षांतर्गत बंडखोरांना वॉर्निंग

यावेळी ठाकूर यांनी पक्षांतर्गत बंडखोरांचाही उल्लेख केला. ‘ज्यांनी पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, त्यांनी अजिबात असं वाटू देऊ नका की त्यांना पुन्हा पक्षात संधी मिळेल. आज आमच्या विरोधात काम केलं आणि उद्या पुन्हा आमच्यासोबत याल असं अजिबात होणार नाही. आपला पक्ष हा भारतातलाच नाही, तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या घामामुळंच आपला पक्ष उभा आहे, त्यामुळं नियमांचं आणि शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे,’ असंही ठाकूर म्हणले.

आता सहानुभूतीच्या लाटेचा फायदा कधी कुठल्या पक्षाला होईल हे काय सांगता येत नाही, पण ज्या पक्षाकडं अति-आत्मविश्वास असतो त्याला तो नडतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं म्हणायला हरकत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.