युपीचा गडी कोल्हापूरचा पैलवान बनला, महाराष्ट्राला हिंदकेसरीची गदा जिंकून दिली.

दीनानाथ सिंह. मूळचे उत्तरप्रदेशच्या काशी वाराणसीचे. मुंबईला त्यांचं कुटुंब दूध घालायचं काम करायचं. त्यांचा गोरेगाव येथे भलामोठा म्हैशींचा तबेला होता. अशी अनेक उत्तर भारतीय कुटुंबे मुंबईत आसरा शोधण्यासाठी आली होती. त्यांना भैय्या म्हणून संबोधलं जायचं. दीनानाथ सिंहदेखील याच गर्दीचा भाग बनले असते.

एका व्यक्तीची भेट त्यांचं आयुष्य बदलणारी ठरली.

वसंतदादा पाटील.

साल असावं १९६४. वसंतदादा तेव्हा राज्याच्या राजकारणात दबदबा असणारं नाव. स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकार्यात इंग्रजांच्या गोळ्या खाल्लेले वसंतदादा लौकिकार्थाने उच्चशिक्षित नव्हते मात्र माणसं वाचण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. त्यांनी या सतरा अठरा वर्षाच्या उंचपुर्या धट्ट्याकट्ट्या तरुणाला पाहिलं आणि विचारलं कुस्ती शिकायला सांगलीला येणार काय?

संस्थाने विलीन झाल्यापासून कुस्तीवरचा राजाश्रय संपुष्टात आला होता. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची परंपरा सांगणाऱ्या तालमी होत्या. सांगली कोल्हापूरच्या ग्रामीण भागातच कुस्ती लोकाश्रयावर जगत होती. दीनानाथ सिंह तिकडे जाण्यासाठी एका पायावर तयार झाले. त्यांच्या घरचे देखील पोरगा पहिलवान झाला तर लोकांच्या उधारी वसूल करायला मदत होईल असं म्हणत त्यांना सांगलीला जाण्यासाठी परवानगी दिली.

दीनानाथ सिंह दादांच्या सांगण्यावरून सांगलीला आले, तिथून काही दिवसांनी कुस्तीपंढरी कोल्हापूरला गेले. तिथल्या गंगावेस तालमीतली लाल माती आयुष्यभरासाठी त्यांची ओळख बनली. तिथं लहान मोठ्या कुस्त्या जिंकत त्यांनी स्वतःच नाव कमावलं.  

त्यांचं एक स्वप्न होतं एकदा तरी महाराष्ट्र केसरी बनायचं. त्यांनी बनारसमध्ये राहणाऱ्या आपल्या आईला शपथ घातली होती की महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय तुला तोंड दाखवणार नाही. ही संधी त्यांना लवकरच मिळाली.

दीनानाथ सिंह हे कोल्हापूरला आल्यानंतर दोनच वर्षानंतरची गोष्ट. जळगाव येथे कुस्तीचे महाअधिवेशन भरलं होतं. तिथे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार होती. दीनानाथ सिंह यांनी देखील मुंबई संघाच्या वतीने आपली एंट्री नोंदवली. एका पाठोपाठ एक कुस्ती जिंकत ते अंतिम फेरीत पोहचले.

त्यांचा महाराष्ट्र केसरी साठीचा अंतिम सामना कोल्हापूरच्याच चंबा मुत्नाळ यांच्या बरोबर होणार होता.

तेव्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते पाटणचे बाळासाहेब देसाई. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. ते त्याकाळी राज्याचे गृहमंत्री देखील होते. दीनानाथ सिंह जेव्हा अंतिम फेरीत पोहचले तेव्हा काही जिल्ह्याच्या कुस्ती संघानी बाळासाहेबांकडे त्यांच्या बद्दल तक्रार केली कि

‘महाराष्ट्र केसरी’साठी खेळणारा मल्ल हा महाराष्ट्राचाच असावा, दीनानाथ सिंह मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

ज्या पाच जिल्ह्यांनी ही तक्रार केली, त्या जिल्ह्यांतील फारसे पैलवानही नव्हते. त्यांनी ही एका ओळीची तक्रार केली. तक्रार आल्यावर बाळासाहेब देसाई यांनी तातडीने बैठक बोलावली. त्या बैठकीस मुंबई तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले. त्या बैठकीत देसाई म्हणाले,

“हा पैलवान महाराष्ट्रातून लहानपणापासून कुस्ती खेळत आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे. अनेक गटांतून लढत अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना आता कसा नकार देणार.”

कोणीतरी हि चर्चादीनानाथ सिंह यांच्या पर्यंत पोहचवली. आपल्यावर आक्षेप घेतला जातोय हे कळल्यावर ते दुखावले.

अंगावरच्या लंगोटसह येथून काशीला निघून जाणार. असे त्यांनी जाहीर केलं.

बोरीबंदर-बनारस ही एक्स्प्रेस जळगावहून जाते त्यातून मी जातो व परत कोल्हापूरलाही जाणार नाही, असं ते म्हणत होते. इतरांनी त्यांना समजावून सांगितलं.

तिकडे बाळासाहेब देसाई आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांनी आयोजकांना खडसावलं की तुम्ही दीनानाथला ‘महाराष्ट्र केसरी’साठीच मुळात प्रवेश नाकारायला हवा होता. तो चार लढती जिंकला व फायनलला आला. आता तासाभरात कुस्ती होणार आणि तुम्ही त्याला लढू देऊ नका म्हणत असाल तर ते चुकीचे आहे, मी त्यास संमती देणार नाही. काही झाले तरी दीनानाथ खेळणारच व लढत ७.३० वाजता लावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

बाळासाहेब देसाई हे दीनानाथ सिंह यांच्या पाठीशी डोंगराप्रमाणे उभे राहिले. खाशाबा जाधव यांनी दीनानाथ सिंह याना हि बातमी कळवली तर त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.

ठरल्याप्रमाणे कोल्हापूरच्या चंबा मुत्नाळ यांच्याशी त्यांची लढत झाली. दोघेही तोडीस तोड पहिलवान होते. कोल्हापुरात त्यांनी एकमेकांसोबत बऱ्याचदा कुस्ती खेळली होती. दोघे इतके सारखे दिसायचे की अंगाला माती लागल्यावर चंबा मुत्नाळ कोण आणि दीनानाथ सिंह कोण हे ओळखू यायचं नाही.

दोघांची कुस्ती  वीस मिनिटे रंगली. दोन्ही पहिलवान  घेण्याऱ्यातले नव्हते. चंबा मुत्नाळ यांनी मोठ्या चिकाटीने प्रयत्न केले पण अखेर दीनानाथ सिंह यांनी हि कुस्ती जिंकली आणि ते महाराष्ट्र केसरी बनले. आईला दिलेलं वचन पूर्ण केलं.

कोल्हापुरात त्यांची जाहीर मिरवणूक काढण्यात आली. ते त्यावेळी म्हणाले,

“वाराणसी मध्ये मला एक गंगा मैया आहे पण कोल्हापुरात मला पंचगंगा मैया मिळाल्या आहेत.”

दीनानाथ सिंह यांनी कोल्हापूरला आपलं घर आणि महाराष्ट्राला आपली मातृभूमी मानली. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला पाचव्यांदा हिंद केसरीची गदा मिळवून दिली.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दिवशी रुसून लंगोटवर काशीला जाण्याची घोषणा करणारे दीनानाथ सिंह निवृत्तीनंतर देखील कोल्हापुरातच राहिले. आजही कोल्हापुरात आपल्या अस्सल रांगड्या कोल्हापुरी भाषेत बोलणारे दीनानाथ सिंह आपल्या पठ्ठ्यांना तालमीत रगडताना दिसतात. वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई हे लोकनेते होते म्हणून मी माझ्या महाराष्ट्राचं नाव मोठं करू शकलो असं त्यांचं आजही म्हणणं असतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.