भाऊ म्हणतील तोच सरपंच, अन् भाऊ म्हणतील तोच चेअरमन अस चित्र पंचक्रोशीत होतं..

पैलवान म्हणजे गावातला हिरो असायचा आणि हिंदकेसरी मारुती माने म्हणजे सुपरस्टारच. प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून पैलवान व्हायची.

एकूण काय तर लोकांच मारुती मानेवर जीवापाड प्रेम होत.

मारुती मानेंच मूळ गाव कवठेपिरान. तालुका मिरज, जिल्हा सांगली.

वयाच्या आठव्या वर्षी अंगाला कुस्तीची लाल माती लागली ती आयुष्यभर सुटलीच नाही. दिल्लीचे पैलवान ज्याला घाबरतात असा तो मारुती माने म्हणून त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत झाली. भाऊंनी कवठेपिरानच नाव फक्त दिल्लीच नव्हे तर ऑलम्पिक, आशियायी गेम्स पर्यंत नेलं.

वाघ जंगलाचा राजा आहे हे सांगायला लागत नाही तसच गावचं नेतृत्व भाऊंच्याकड येणं नैसर्गिकच होतं. गावातले सगळे मोठे निर्णय मारुती मानेच्या सल्ल्यानेच घेतले जायचे. पंचवीस वर्ष सलग ते गावचे सरपंच राहिले. गावकऱ्यांनी त्यांना जिल्हापरिषदेवर पाठवलं.

भाऊ म्हणतील तोच सरपंच. भाऊ म्हणतील तोच सोसायटी चेअरमन. कवठेपिरान गावानं निवडणूक कधी बघितलीच नाही.

तेव्हा वसंतदादा सांगली जिल्ह्याचे नेते होते. मारुती मानेंनी त्यांच नेतृत्व स्वीकारलं. वसंतदादांच्या साखर कारखान्यात आधी संचालक आणि नंतर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

एकदा राजीव गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.

सांगलीत कामगार भवनात कॉंग्रेस कमिटीची मिटिंग होती. तेव्हा राज्यसभेसाठीचा एक खासदार सांगलीतून निवडला जाणार आहे अशी चर्चा होती.

इच्छुकांनी कामगार भवनात गर्दी केली होती. राजीव गांधीच भाषण सुरु झालं. साडेसहा फुट उंची, धिप्पाड शरीर, डोक्यावर फेटा, अंगात धोतर अशा वेशात हाताची घडी घालून उभारलेल्या मारुती मानेकडे राजीव गांधीच लक्ष गेलं. राहून राहून त्यांच्या डोळ्यापुढ मारुती मानेची मूर्ती उभी राहू लागली. त्यांनी अखेरीस आपल्या पी.ए. ला विचारलं की

“ये भीमकाय पहिलवान कोण है?”

पी.ए म्हणाला ” यही तो है मारुती माने जिन्होंने भारतको कुश्ती में सुवर्ण पदक दिलाया”.

राजीव गांधी वसंतदादाना म्हणाले,

“इन्हे ही बनायेंगे सांसद ! “

अख्खं सभागृह आवाक झालं. टाळ्यांचा दुमदुमाट झाला.

हिंदकेसरी मारुती माने राज्यसभेचे खासदार बनले. पहिल्यांदाच एका पैलवानाला हा मान मिळाला होता.

राज्यसभेत त्यांनी पाउल टाकल्यावर सगळ्यांच्या माना त्यांच्याकडेच फिरायच्या. रोखठोक स्वभावाच्या मारुती मानेना कुस्तीतले डाव सगळे यायचे पण राजकारणातले छक्के पंजे त्यांना कधी आलेच नाहीत. राज्यसभेमध्ये तर सगळे एकापेक्षा एक राजकारणाचे खिलाडी असत.

जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी एक किस्सा लिहून ठेवला आहे.

नवीनच सदस्य झालेले मारुती माने सभागृहात जास्त बोलायचे नाहीत. पण त्यांना सांगलीच्या जनतेचे प्रश्न मांडायची खूप इच्छा असायची. एकदा राज्यसभेत ओरिसाच्या आदिवासींच्या प्रश्नाची चर्चा सुरु होती. अचानक मारुती माने उठले आणि त्यांनी जम्मू ते पुणे चालणारी झेलम एक्स्प्रेस कोल्हापूर पर्यंत आणली जावी अशी मागणी केली.

दिल्लीला ठगांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि सर्वात मोठे महाठग संसदेत बसतात. मारुती मानेंच्या या निरागस प्रश्नामुळे हे सदस्यांनी अख्ख्या सभागृहात हशा पिकवला.

रेल्वेचा प्रश्न संपून आदिवासी प्रश्नाची चर्चा सुरु होती. गडबडीत भाऊंच्या ते लक्षातच आले नव्हते. शेजारीच बसलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना ते समजावून सांगितले. हा गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही.

पुढे रेल्वेच्या विद्युतीकरणावर काही प्रश्न सुरु झाले आणि सभापती व्यंकटरमण यांनी माने हे नवे सदस्य असून त्यांना रेल्वे संदर्भात काही विचारायचे होते हे लक्षात घेऊन त्यांच नाव पुकारलं. भाऊंनी आपला मगाचाच झेलम एक्स्प्रेसचा स्टॉप कोल्हापूर पर्यंत वाढवण्याचा प्रश्न परत विचारला.

यावेळी चर्चा रेल्वे विद्युतीकरणाबद्दल चालू असल्याने इथे देखील हा प्रश्न अप्रस्तुत होता. पुन्हा काही सदस्य हसले. रेल्वे राज्यमंत्री माधवराव सिंधिया यांनी सध्या तरी झेलम एक्स्प्रेसचा विद्युतीकरणाचा कोणताही इरादा नाही असं सांगून मारुतीभाऊंना सांभाळून घेतलं.

असे होते खासदार मारुती माने. त्यांच्याकडे राजकीय चलाखी व धुर्तपणा नव्हता, आपल्या भागातल्या माणसांचा प्रश्न सोडवण्याची तळमळ होती. भले त्यासाठी कधी कोणी चेष्टा केली तरी ते लाजले नाहीत. कुस्ती प्रमाणेच आपल्या भागाचा प्रश्नाचा चिवटपणे निकाल लावणारा नेता म्हणून त्यांना संसदेत ओळखलं गेलं.

राजकारणाच्या फडात यशस्वी झाले नाहीत म्हणून अनेकजण त्यांच नाव घेतीलही पण त्याअगोदर प्रत्येकानेच हा विचार करावा कि ते असे पैलवान होते जे जनतेसाठी आणि रसिकांसाठी काळ आणि वेळ गणित मांडत नसतं.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.