सर्वांचा अंदाज चुकवून “हिंदकेसरी” आणणारे पैलवान तसेच अंदाज चुकवून गेले..

भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे याच निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेच्या बातम्या येत होत्या. वय देखील झालं होतं. लोकांना वाटत होतं ते बरे होतील पण हा माणूसच अंदाज चुकवण्यात वस्ताद. बरे होतील वाटत असतानाच ते गेल्याची माहिती आली.

हिंदकेसरी स्पर्धेत देखील त्यांनी अशीच अनपेक्षितपणे गदा आणली होती…

१९ डिसेंबर १९५९.

राजधानी दिल्लीमध्ये देशाची ”पहिली हिंदकेसरी” स्पर्धा भरली होती. खरे तर मागच्याच वर्षापूर्वी हैद्राबादमध्ये एक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती पण त्याला हिंद केसरी असे नाव नव्हते. ती स्पर्धा रामचंद्र बापू यांनी जिंकली होती.

१९५९सालच्या कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेला पहिली हिंद केसरी स्पर्धा असे नाव देण्यात आले.

अगदी सुरवातीपासूनच या स्पर्धेला प्रचंड मोठे ग्लॅमर प्राप्त झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून पहिलवान आपल्या वस्तादांसह दिल्लीमध्ये आले होते. त्याकाळी उत्तरेच्या पहिलवानांचा मोठा बोलबाला होता. पंजाब हरियाणाचे मल्ल ही स्पर्धा सहज जिंकायची या अतिआत्मविश्वासाने फुरफुरत होते.

पण सगळ्यांचे अंदाज चुकवत एक मराठी मल्ल स्पर्धेच्या मुख्य लढतीत उतरला. त्याच नाव श्रीपती खंचनाळे. 

मूळचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एकसंभा गावचे. एकेकाळी शाहू महाराजांच्या संस्थानात येत असलेल्या या गावात कुस्तीचं बाळकडू पोरांना दुधात मिसळून दिलं जायचं. गावातल्या शाळेपेक्षा तालमीत जाणाऱ्या पोरांची संख्या जास्त होती.

श्रीपती खंचनाळे यांना देखील लहानपणापासून कुस्तीचं जबरदस्त आकर्षण होतं. त्यांनी सातवीत शाळा सोडून दिली.

शेतकरी आईबापांनी प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन पोराचा खुराक सांभाळला, त्याच्या कुस्तीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. तब्बल ३००० बैठका, ३००० जोर, अर्धा तास माती खणणे अशी मेहनत त्यांनी घेतली. श्रीपती खंचनाळे यांचं नाव लवकरच कोल्हापुरात गाजू लागलं. अगदी कमी वयात त्यांनी अनेक मोठमोठ्या पहिलवानांना पाणी पाजलं.

श्रीपती यांची खासबागेत झालेली सादिक पहिलवानासोबतची कुस्ती प्रचंड गाजली. उत्तरेत त्यांचं नाव जाऊन पोहचलं. खडकसिंग, बच्चनसिंग, रोहित्राम अशा दिग्गज पहिलवानांना चारी मुंड्या चिट केल्यामुळे त्यांचा दबदबा प्रचंड वाढला होता.

१९५९ च्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेची मुख्य फेरी श्रीपती खंचनाळे विरुद्ध रुस्तम ए हिंद बत्तासिंग यांच्यात होणार आहे हे कळल्यावर लाखो कुस्ती शौकिनांचा महापूर दिल्लीच्या न्यू रेल्वे स्टेडियमकडे वळला.

प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कुस्ती पुकारण्यात आली. दोन महाकाय पहाड एकमेकांशी झुंजु लागले.
डाव प्रतिडाव डावांच्या उकळी करून सर्वांघ घामाने भिजून गेले. पण निकाल काही केल्या लागत नव्हता. सुप्रसिद्ध पहिलवान सतपाल यांचे गुरु दिल्लीच्या हनुमान आखाड्याचे वस्ताद गुरु हनुमान हे पंच होते. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत होती पण दोन्ही पहिलवान तुल्यबळ असल्यामुळे निकाल लागत नव्हता.

अखेर पंचानी वेळ टळून गेल्यामुळे कुस्ती अनिर्णयीत ठरवली आणि दोघांनाही हिंद केसरी घोषित केले.

कुस्ती शौकिनांच्यामध्ये प्रचंड निराशा पसरली. श्रीपती खंचनाळे यांनी थेट राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची भेट घेतली आणि पहिली हिंद केसरीची स्पर्धा हि निकालीच व्हायला पाहिजे अशी मागणी केली. सुरवातीला तर राष्ट्रपतीनां खंचनाळे यांच्या आत्मविश्वासाचे आश्चर्य वाटले.

पण ते स्वतः कुस्तीप्रेमी असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी बेमुदत लढतीला परवानगी दिली.

राष्ट्रपतींच्या आदेशानुसार २० तारखेला मुख्य लढतीची दुसरी फेरी सुरु झाली. हि देखील फेरी प्रचंड रंगली. यावेळी मात्र श्रीपती खंचनाळे यांनी घुटना डावावर बंतासिंग यांचा पराभव  केला.

महाराष्ट्रातून खास आलेल्या शौकिनांनी एकच जल्लोश केला, पटके आभाळात उडाले, खंचनाळे याना खांद्यावर घेण्यात आलं. पहिले हिंद केसरी पद जिंकून श्रीपती खंचनाळे यांनी मराठी मातीचे,कोल्हापूरच्या शाहूरायांचे पांग फेडले होते.

राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली. श्रीपती यांच्या आत्मविश्वासाचे आणि धाडसाचे त्यांनी कौतुकच केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी खंचनाळे यांना आपल्या हाताने फेटा गुंडाळला.    

पुढच्या कारकिर्दीत श्रीपती खंचनाळे यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, एकलव्य पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शिष्यानी देखील हिंद केसरी सारख्या स्पर्धा जिंकून खंचनाळे यांचं नाव उंचावलं. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अध्यक्ष म्हणून तब्बल २० वर्ष जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्राच्या कुस्तीतील हा महागुरू मात्र गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांनी खचला होता. कुस्तीतून निवृत्त झाल्यावर त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना कोल्हापुरात एक घर व ३ हजारांची पेन्शन देण्यात येत होती. मात्र वेळोवेळी हॉस्पिटलच्या खर्चाला त्यांची आयुष्यभराची जमापुंजी संपून गेली.

पूर्वीपासून छत्रपतींच्या काळात पहिलवानांना राजाश्रय होता. संस्थाने खालसा झाली आणि कुस्ती लोकाश्रयावर वाढू लागली. गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या सरकारांचे या आपल्या परंपरागत खेळाकडे दुर्लक्षच झाले आहे आणि याचा फटका श्रीपती खंचनाळे यांच्यासारख्या पहिलवानांना बसला.

क्रिकेट सारखे ग्लॅमर असणाऱ्या खेळातील खेळाडूंना कोट्यवधींची बक्षिसे दिली जातात पण याच वेळी कुस्तीसारख्या मातीतल्या खेळातील खेळाडूंना त्यांचा खुराकाचा पैसा देखील निघत नाही हि आज आपल्या देशाची दुर्दैवी परिस्थिती आहे. यात क्रीडारसिक मायबाप देखील कमी पडत आहेच.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात श्रीपती खंचनाळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऍडमिट करण्यात आले होते. वयाची ८६ वर्ष उलटल्यामुळे त्यांची  तब्येत जास्तच खालावली व त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. हिंद केसरींच्या उपचाराचा खर्च कुटुंबाला पेलवत नसल्यामुळे कुस्तीप्रेमींना सढळ हाताने मदत करण्याची मागणी केली जात होती.

कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांनी श्रीपती खंचनाळे यांच्या उपचाराचा सगळं खर्च उचलण्याची घोषणा केली. मात्र अजूनही प्रश्न उरतोच की एवढ्या मोठ्या माणसाला आयुष्याच्या संध्याकाळी ही वेळ येते हा दोष कोणाचा ? शासन, की आपण कुस्तीरसिक. असो श्रीपती खंचनाळे यांना भावपूर्ण अभिवादन..!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.