हिंदू- मुस्लिम काय घेऊन बसलाय…अमरावती हिंसाचारात सर्वांचंच नुकसान झालंय.
या घटनेमुळे निर्माण झालेले तणावग्रस्त वातावरण आणि त्यामुळे समोर आलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देत नाही.
विशेषकरून अमरावती शहराचं बोलायचं झालं तर निदर्शने व बंदच्या आवाहनानंतर उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीच्या पहिल्याच दोन दिवसांमध्ये ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. हिंसाचाराच्या सुरुवातीच्याच काही दिवसामध्ये जाळपोळ व तोडफोडीच्या ज्या घटना घडल्या होत्या त्यात जवळपास ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी माध्यमांना दिली होती….
यावरूनच अंदाज बांधा कि, संपूर्ण घडामोडीमध्ये सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आणि त्यांना कितीतरी नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. पण याची कुणालाही कसलीही परवा नाही, न राजकारण्यांना नाही ना जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना नाहीये..मग तो मुस्लीम असो कि हिंदू असो झालेल्या हिंसाचारात सर्वांचेच मोठे नुकसान झालेय.
तरी सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यातच बिझी आहेत.
त्रिपुरातील कथित हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ त्याच्या दुसऱ्याच दिवशी दुपारी अमरावतीतील रझा अकादमी आणि काही मुस्लिम संघटनांनी अमरावती शहरात मोर्चा काढला होता. ज्यामध्ये भाजप नेते प्रवीण पोटे यांच्या घरावर आणि काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ दुसऱ्याच दिवशी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शनेही केली. ज्यामध्ये हिंसाचार उसळला आणि अनेक दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे डझनभर दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
१२ नोव्हेंबर रोजी निदर्शनानंतर हिंसाचार सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ११, त्यानंतर १३ तारखेला एकूण २४ असे आतापर्यंत ३५ एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे देखील व्यापाऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले होते.
त्यातल्या काही दुख:द कहाण्यामधील काही निवडक कहाण्या सांगायच्या झाल्या तर, अमरावतीच्या हरशराज कॉलनीमध्ये गेल्या आठ वर्षांपासून सलून चालवणाऱ्या शेख परिवारावर दुहेरी संकट कोसळलं होतं. या हिंसाचाराच्या आधीच वारीस शेख यान्ह्यायांच्या मुलीचे निधन झाले होते म्हणून जाळपोळ झालेल्या दिवशी त्यांचे सलूनला कुलूप होते. पण तरी देखील आंदोलन करणाऱ्या लोकांनी सलूनचे कुलूप फोडून दुकानाची नासधूस केली, सामानाची तोडफोड केली.
वारिस शेखच्या वडिलांचे संपूर्ण आयुष्य दुकानाला वाढवण्यात गेले. दर महिन्याला या दुकानाचे ४० हजारांचा हफ्ता ते भरत असतात. पण काही दंगलखोरांमुळे शेख कुटुंबियांच्या दुकानाची आणि त्यांच्या उपजीविकेची राखरांगोळी झालीये. वारीस शेख कोणत्याही धर्माचा विरोधक नव्हता न द्वेषी नव्हता. त्याच्या सलून मध्ये आलेल्या प्रत्येक धर्माच्या लोकांना तो सेवा द्यायचा मग तो ग्राहक हिंदू असो, मुस्लिम, सिंधी असोत. तो सर्वांनाच चांगली सेवा द्यायचा आणि कधीही कोणाशी भांडत नसायचा. पण तरीही तो हिंदू -मुस्लीम द्वेषाचा बळी ठरला..त्याचा किंचितही दोष नसतांना.
इतकं होऊन देखील वारीस शेख यांची भूमिका हीच आहे कि, जे व्हायचे होते ते झाले. आता सर्वांनीच शांततेत जगा कारण या दंगलखोरांना धर्म नसतो.
त्यानंतर ची एक कहाणी म्हणजे, वसंत टॉकीज परिसरात असलेल्या मेडिकल पॉईंटचे मालक हरीश अड्डा यांची. हरीश अड्डा यांनी माध्यमांना सांगितले,
” दंगा चालू असतांनाच एका हिंसक जमावाने हरीश अड्डा यांच्या मेडिकल शॉप ला टार्गेट करायला सुरुवात केली असतांनाच हरीश यांचा मुलगा धावत आला आणि त्याने आपल्या वडिलांना दुकान बंद करायला सांगितले. दुकानाचे शटर बंद करत असतांनाच त्या हिंसक जमावाने दगडफेक सुरू केली. लाठ्या-काठ्याने मारायला सुरुवात केली. हरीश यांच्या बरोबरच त्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाही काही दंगलखोरांनी खूप मारलं….त्यांचा कसलाही दोष नसतांना !
हिंसक जमावाने मेडिकलचे नुकसान तर केलेच पण कोरोना काळात जीव धोक्यात घालून लोकांना जीवदान देणाऱ्या दुकानमालकालाही दंगलखोरांनी बेदम मारहाण केली….त्त्यांच्या उपकारांची जाणीव न ठेवता !
तर त्याच दरम्यान शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दाबेली फास्ट फूड कॉर्नर चालवणारे राजेश गुप्ता दाबेली विकून आपले घर चालवतात. कोरोनाचा फटका सहन केलेल्या राजेशने मात्र यंदाच्या दिवाळीत चांगली कमाई केल्यामुळे ते खूश होते. कोरोनाच्या काळात त्यांच्यावर जमा झालेले कर्ज आता हळूहळू कमी करायचं अशी योजना राजेश यांनी केली होती. पण अमरावतीच्या या हिंसाचाराच्या घटनेत त्यांच्या फूड कॉर्नरचे नुकसान झाले.
राजेश दुकान बंद करत असताना काही मुलांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. त्यांनी राजेशजवळचे पैसे तर लुटलेच आणि त्यांच्या मुलाला देखील मारहाण केली. सर्वांनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण कायद्याच्या विरोधात आंदोलन व्हायला हवे.
दुकाने बंद करून तुमचा प्रश्न सुटत असेल तर नक्की करा पण तोडफोड आणि लूटमार करणे चुकीचे आहे अशी भूमिका राजेश यांनी मांडली.
अमरावती हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत कितीतरी लोकांवर गुन्हे दाखल झालेत. तर १८८ जणांना अटक करण्यात आली आहे. कधी वातावरण गरम होईल कधी हिंसाचार उसळेल सांगता येत नाहीये म्हणून, सामान्य माणूस आणि व्यापारी आजही भीतीच्या वातावरणात जगत आहेत.
गेल्या एक आठवड्यापासून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही आजतागायत पोलिसांना या हिंसाचाराच्या मुळापर्यंत पोहोचता आलेले नाही.
हिंदू असो वा मुस्लीम, सर्वांचेच मोठे नुकसान झाले असले तरी राज्य सरकार आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतायेत कि, हा हिंसाचार राज्य पुरस्कृत आहे, तर दुसरीकडे मंत्री नवाब मलिक भाजपवर आरोप करत आहेत कि, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या हिंसाचाराला यूपी निवडणुकीची खेळी म्हणतया आरोपांमुळे हिंसाचार थांबण्याच नावच घेत नाहीये उलट वातावरण तापवत आहे.
पण या सर्व गोंधळामध्ये दोन वेळच्या भाकरीसाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाला अश्रू ढाळण्याशिवाय पर्याय उरला नाहीये.