पुण्यात औषध निर्मितीचा कारखाना काढून नेहरूंनीच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत उभा केला

औषध बनवणे हा जगातला सर्वात नफ्याचा धंदा मानला जातो. जगात कितीही इमर्जन्सी आली तरी औषध उत्पादन, विक्री बंद राहत नाही. आपल्या सगळ्यांना लागणारी ही अत्यावश्यक सेवा आहे.

यामुळेच औषध कंपन्या प्रचंड मार्जीन ठेवून औषध विक्री करतात. दुसरा पर्याय नसल्यामुळे ही औषधे अवाढव्य किंमतीला विकत घेण्यापासून आपल्याला पर्याय नसतो. आपल्या मेडिकल रीप्रेजेन्टेटिव्ह मार्फत डॉक्टरांपासून ते मेडिकल दुकानदारांपर्यंत साऱ्यांना या भ्रष्ट साखळीत ओढण्याचा कंपन्यांचा प्रयत्न सुरु असतो.

स्वातंत्र्यापूर्वी तर ही परिस्थती आणखी भयावह होती.

भारताला लुटून इथली संपत्ती इंग्लंडला न्यायची हेच ब्रिटीश राज्यकर्त्यांच धोरण होतं. त्यांनीच आधुनिक औषधोपचारपद्धती भारतात आणली मात्र या मागे त्यांचा उद्देशरुग्णांवर उपचार व्हावेत यापेक्षाही त्यांच्या औषधकंपन्याना मार्केट मिळावे हाच मुख्य हेतू होता.

भारतीय जनतेला तेव्हा अज्ञान व अंधश्रद्धा यांच्या जोखडाने जखडलेल होतं. साध्या साध्या रोगाने अनेकांचा मृत्यू होत असे. साथीचे रोग आल्यावर तर परिस्थिती प्रचंड बिकट होत असे. काही भारतीयांनी फार्मास्युटिकल कंपनी सुरु केली होती मात्र हे प्रयोग अजून बाल्यावस्थेमध्ये होते.

टिळकांपासून ते गांधीजीपर्यंत अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यलढयावेळी स्वदेशीचा आग्रह धरला होता.

प्रत्येक गोष्टीत भारताने आत्मनिर्भर व्हावे जेणे करून परदेशी कंपन्याकडून होणारी लुट थांबवली जाईल.

महात्मा गांधी जेव्हा पुण्याच्या येरवडा येथे आगाखान यांच्या बंगल्यात राजकीय कैदी म्हणून बंदी केले होते तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या देखील होत्या. या बंदीवासात त्या एकदा प्रचंड आजारी पडल्या. त्यांच्यावर औषधउपचार वेळेत झाले नाहीत.

अस सांगितल जात की त्यांच्यावर उपचारासाठी पेनिसिलीन या औषधाची गरज होती. पण हे औषध भारतात तयार होत नव्हते व ते इंग्लंडहून मागवावे लागणार होते. ते औषध न मिळाल्यामुळे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. पंडीत नेहरुंच्या मनाला ही गोष्ट प्रचंड लागली.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंडीत जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान बनले.

गांधीजींच्या स्वप्नातला आदर्श राष्ट्र साकार करण्यासाठी सगळा देश झाडून कामाला लागला. नेहरूंनी भारतात अनेक उद्योगाची पायाभरणी केली.

सुई पासून ते अंतराळ यानापर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात निर्माण व्हावी यासाठी नेहरूंचा कटाक्ष होता. टाटा, बजाज, बिर्ला या उद्योगसमूहाना भारतात वेगवेगळे कारखाने सुरु करण्यास प्रोत्साहन दिले गेले.  मात्र काही उद्योग असे होते ज्याचा थेट गोरगरीब जनतेच्या दैनदिन जीवनाशी संबंध येत होता. या उद्योगामध्ये सरकारनेच उडी घेतली.

यातूनच कल्पना पुढे आली हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड या कंपनीची.

पुण्याजवळील पिंपरी चिंचवड ही त्या काळात औद्योगिक नगरी म्हणून पुढे येत होती. बजाजसारख्या अनेक कंपन्याचे वाहनकारखाने सुरु होत होते. याच पिंपरीमध्ये भारताचा पहिला सरकारी औषध कारखाना सुरु करायचं ठरलं.

ज्या ठिकाणी कस्तुरबा गांधी यांचा औषधाअभावी मृत्यू झाला होता तिथेच पेनीसिलीन बनवणारा कारखाना सुरु करायचा अशी जिद्द नेहरूंनी मनात धरली होती अस म्हणतात.

१० मार्च १९५४ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

भारताच्या प्रत्येक नागरिकाला परवडेल अशा दरात अँटिबायोटिक औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून हा कारखाना उभा राहत होता. याच्या निर्मिती साठी जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्रे यांनी विशेष मदत केली होती. १९५५ साली पिंपरीच्या भल्या मोठ्या परिसरात उभारलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या कारखान्यातून औषधांचे प्रोडक्शनही सुरु झाले.

एका नुकताच स्वतंत्र झालेल्या विकसनशील देशाने केलेला हा चमत्कार मानला गेला. जागतिक पातळीवर भारताचे कौतुक झाले.

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स उर्फ एचए भारतातल्या नवरत्नांपैकी एक गणला जात होता. या कारखान्यामुळे पुणे परिसरातील शेकडो कामगारांना काम मिळाले. देशभरातून तरुण संशोधक, अधिकारी पिंपरीला येत होते. या साऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूलची देखील स्थापना झाली.

लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते त्याच उद्घाटन करण्यात आलं होत.

यानंतर कित्येक वर्ष हिंदुस्तान अँटिबायोटिक्सने Penicillin, Streptomycin, Gentamicin, Ampicillin & Amoxycillin अशा अनेक औषधांची निर्मिती केली. फक्त औषध निर्मिती पुरतेच मर्यादित न राहता कृषी व पशुवैद्यकीय शास्त्रासाठी लागणारे प्रोडक्टसुद्धा बनवले जाऊ लागले.

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स भारतीय उद्योगक्षेत्राचा अभिमान होते. इथे बनणारी उच्च दर्जाची औषधे बाहेरच्या मार्केटपेक्षाही अनेक पट कमी किंमतीमध्ये मिळत होती. सरकारी हॉस्पिटल, लसीकरणसारख्या मोहिमा अशा विविध ठिकाणी एचएची औषधे पुरवली गेली.

करोडो भारतीयांना या औषधांना जगवणारा हा कारखाना मात्र पुढे सरकारी अनास्थेमुळे स्वतः मरणाच्या दारात जाऊन पोहचला.

खाजगी फार्मा कंपन्याचे सरकारशी असणारे लागे बांधे, नोकरशाही मध्ये चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, यातच जागतिकीकरण अशा अनेक गोष्टींचा फटका बसून हिंदुस्तान अँटिबायोटिक्स खिळखिळी होत गेली.

मागच्या काही वर्षात तर पगाराअभावी काही कर्मचार्यांनी आत्महत्या देखील करण्याचे प्रकार समोर आले. पुढे ही कंपनी डबघाईतून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले गेले. यासाठी काही कर्मचाऱ्याना स्वेच्छानिवृत्ती घ्यावयास लागली तर पिंपरी येथील एचए परिसरातील प्रचंड जमिनीपैकी काही भाग विक्रीस काढण्यात आला.

आजही कोरोनाच्या काळात पीपीई कीट, पॅरासिटॉमॉल, सिट्रोजीन, हायड्रोक्लोरोक्वीन यांचा अत्यंत कमी दरात पुरवठा करून रोगाशी लढण्यासाठीची कटिबद्धता कायम राखली आहे.

याशिवाय कोव्हीडची रॅपिड टेस्ट करण्यासाठी त्यांनी बनवलेल्या हेल्थ एटीएमचे सर्वत्र कौतुक झालं.

देशाच्या आत्मनिर्भरतेच प्रतिक असणारी ही कंपनी या पुढेही टिकली पाहिजे, तिच्या कडे सरकारने योग्य लक्ष पुरवले पाहिजे हीच मागणी जनतेतून होताना दिसते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.