‘हिंदूत्व’ आणि ‘हिंदू खतरे मैं हे’ या दोन्ही गोष्टी या राज्यातून देशभर पसरल्या…

हिंदू खतरे मे हैं…

विषय काश्मिर फाईल्सचा असो की भोंग्याचा असो, हिंदू खतरें में हैं ची हाक कायम दिली जाते. पण या वाक्याला आधार काय आहे. पहिल्यांदा ही घोषणा कुठे देण्यात आली होती. व भारतात हिंदू खतरें मैं हें कधी सुरू झालं  हे सांगणारी ही गोष्ट…

बंगालमध्ये “हिंदुत्वाची” पहिली हाक देण्यात आली होती.

बंगालमध्ये पुरोगामी विचार पहिल्यांदा रुजवला ब्राम्हो  समाजाने. एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण येऊन पोहचले होते. यातून पाश्चात्य जगात घडणाऱ्या घडामोडी, तेथील प्रबोधन, औद्योगिक क्रांती, आधुनिकता या भारतीयांना कळू लागल्या होत्या.

याच आधुनिक शिक्षणाच्या प्रभावातून राजा राममोहन रॉय, महाराजा द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांनी कलकत्ता येथे ब्राह्मो सभा स्थापन केली. जगातील सर्व धर्मांचे तुलनात्मक अध्ययन करून राममोहन रॉय व त्यांचे मित्र यांनी सार्वत्रिक एकच धर्म आधुनिक जगाला पवित्र जीवन जगण्याकरता आवश्यक आहे, असे निश्चित केले.

यातूनच ब्राम्हो समाज उदयास आला.

सतीप्रथेचा विरोध व इतर कर्मकांडांवर टीका करणारे राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणांच्या माध्यमातून ब्राम्हो विचारांची चळवळ तळागाळात नेली. बंगालमधून अनेक जण ब्राम्हो समाजाचा स्वीकार करू लागले. पुराणमतवादी विचारांवर वर्तमानपत्रे, कादंबऱ्या यांच्या माध्यमातून कडाडून टीका केली जाऊ लागली.

पण मूर्तिपूजेचा विरोध आणि सामूहिक उपासना हे ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य असल्यामुळे परंपरागत रूढिनिष्ठ हिंदू धर्मीयांना व त्यांच्या नेत्यांना असे वाटू लागले, की ब्राह्मो समाज हा ख्रिस्ती धर्माच्या अनुकरणातून उत्पन्न झाला आहे.

पाश्चात्य विचारांच्या व संस्कृतीचा सामना करण्यासाठी हिंदुत्ववादी विचारांची सुशिक्षित तरुणांची फळी पुढे आली. त्यांनी देखील ब्राम्हो विचारवंतांप्रमाणे वर्तमानपत्रे, कादंबऱ्या याचा वापर करून रूढीवादी विचारांचा पुरस्कार सुरु केला.

हिंदू खतरे में है ची पहिली हाक बंगाल मधूनच देण्यात आली होती आणि याचा संबंध राष्ट्रवादाशी जोडण्यात आला.

१८६६ साली प्रकाशित झालेल्या उनाबिंगशो पुराण या कादंबरीत भारत माता या संकल्पनेचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला.

कृष्णद्वैपयन वेदव्यास या टोपणनावाने कोणी तरी हि कादंबरी लिहिली होती पण एक मान्यता आहे की याचे लेखक बुधदेब भट्टाचार्य हे होते. ही कादंबरी चांगलीच गाजली. यातून हिदुत्ववादी विचार करणाऱ्यांना आत्मविश्वास मिळाला.

याच्या पुढच्याच वर्षी देवेंद्रनाथ टागोर, नाटककार नबागोपाल मित्रा आणि लेखक राजनारायण बसू यांनी हिंदूंचा मेळा भरवला ज्याला जातीयो मेला (राष्ट्रीय मेळावा) असं म्हटलं गेलं. यात रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू द्विजेंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता समारंभ गीत म्हणून गायन्यात आलं. त्याचे शब्द होते,

“मलीना मुखचंद्रा माँ भारती तोमारी”

याचाच अर्थ हे भारतमाते तुझा मुखचंद्र असा मलूल का झाला आहे? भारतमाता आणि हिंदुत्व यांची सांगड याच गाण्यापासून घालण्यात आली.

याचंच पुढचं पाऊल म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ हि कादंबरी.

बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म चोवीस परगणा जिल्ह्यातील नैहाटीजवळच्या कांठालपाडा गावी झाला. शालेय जीवनापासूनच ते एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले, त्यांत बंकिमचंद्र होते. यानंतर त्यांनी डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी स्वीकारली (१८५८) व १८९१ मध्ये सेवानिवृत्त होईतो ते विविध हुद्यांवर सरकारी नोकरीतच होते.

बंकीमचंद्र आधुनिक बंगाली साहित्याचे एक प्रवर्तक होते. आधुनिक कादंबरीचे जनक व असाधारण लेखनसामर्थ्याचे विचारवंत म्हणून ते श्रेष्ठ ठरले. त्यांचे साहित्यिक जीवन विद्यार्थीदशेतच सुरू झाले व जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले.

बंकिमचंद्रांनी १८७२ साली सुरू केलेले वंगदर्शन  हे नियतकालिक बंगाली साहित्यात युगप्रवर्तक ठरले. सुशिक्षितांत स्वातंत्र्यप्रेम आणि राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूनेच बंकिमचंद्रांनी वंगदर्शन सुरू केले होते. यातूनच हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण केली जात होती.

बंकिमचन्द्र हे मुख्यत्वे करून एक गद्यलेखक होते तरी त्यांनी काही कविताही लिहिल्या. यातच आनंदमठ या कादंबरीमध्ये शेवटी लिहिलेली कविता म्हणजे वंदे मातरम जी पुढे जाऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनली.

आनंदमठ कादंबरीला  १८ व्या शतकात झालेल्या संन्याशाच्या बंडाची पार्श्वभूमी आहे. ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध संन्यासी एकत्र येऊन त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असा या कादंबरीचा आशय आहे. हे संन्यासी जंगलातील आनंदमठ नावाच्या गुप्त ठिकाणी राहून कालीमातेची उपासना करीत आणि वंदे मातरम चा जयघोष करीत, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्व वाहिलेल्या संन्यासी समूहाची कहाणी यात वर्णन केलेली आहे.

देशभक्ती आणि मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच धर्म ही शिकवण या कादंबरीच्या कथाभागाचे वैशिष्ट्य आहे.

मात्र बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या लेखणीतून भारताच्या इतिहासावर मुस्लिम आक्रमणाच्या प्रभावावर कडाडून टीका केली. त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पाहावयास मिळते. त्यांनी आपल्या लेखातून इंग्रजी इतिहासकारणांवर टीका देखील केली व बंगाली हिंदूंना आपला खरा इतिहास अभ्यास करण्याचे देखील आवाहन केले होते. ते म्हणतात

बंगालचा इतिहास म्हणून मुस्लिम आक्रमक शासनकर्त्यांच्या सर्व गोष्टी स्वीकारणारे बंगाली हे बंगाली नाहीत. जो स्वत: च्या वृथा अभिमानाने अंध आहे व मुस्लिमांच्या इतिहासाला कोणतेही प्रश्न न विचारता स्वीकारतो तो खोटा आणि हिंदूद्वेषी आहे, तो बंगाली नाही.

याचा खूप मोठा प्रभाव तत्कालीन तरुणवर्गात पडला.

हिंदुत्व या नावाने लिहिलेल्या चंद्रनाथ बासू यांच्या कादंबरीत हिंदू समाजाच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले. हिंदुत्व या शब्दाचा लिखित स्वरूपात पहिला वापर देखील याच कादंबरीत झाला असल्याचं सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.