जगातला पहिला डॉक्टर. याने घातलेली शपथ सगळ्या जगभरातले डॉक्टर पाळतात.

“कोरोना” ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. गेल्या वर्षी चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे अजूनही राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत.

आणीबाणीची परिस्थिती अख्ख्या जगावर ओढवलेली आहे. अशाप्रसंगी या रोगाशी लढण्याची सर्वात प्रमुख जबाबदारी आहे डॉक्टरांवर.

गेल्या काही दिवसात समोर आलं आहे की या रोगाचा सर्वात जास्त धोका डॉक्टरांना व त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचाऱ्याना आहे.

अनेक डॉक्टरांना त्याची लागण देखील झाली आहे मात्र तरीही त्यांनी आपला लढा थांबवलेला नाही. हे देवदूत आपला किल्ला लढवत आहेत त्यांची प्रेरणा काय आहे तुम्हाला ठाऊक आहे.

हिप्पोक्रॅटिसची शपथ.

पण हा हिप्पोक्रॅटिस कोण? त्याचा काय संबंध? सगळं सांगतो धीर धरा.

इसवी सणापूर्वी पाचव्या शतकात ग्रीसमध्ये जन्मलेला हा एक वैद्य. खर तर ग्रीसमध्ये सुद्धा भारताप्रमाणे एक पुरातन संस्कृती आहे. पण जशी भारतात आयुर्वेदाने प्रगती केली त्यामानाने पाश्चात्य देशात वैद्यकशास्त्र खूप मागे राहिले होते.

त्याकाळात कोणताही रोग झाला तर तो देवाचा शाप आहे असंच लोकांना वाटायचं. त्यामुळे त्याच्यावर उपचार हे मांत्रिक व  पुजारी यांच्या सारखे भोंदू लोक करायचे. हिप्पोक्रॅटिसचे वडील आणि आजोबा हे देखील वैद्यकी करायचे मात्र ते ही मंत्र तंत्राचा वापर करूनच.

पण हिप्पोक्रॅटिस वेगळा निघाला.

तो बालपणापासून हुशार होता. त्याने अनेक ग्रंथाचा अभ्यास केला होता. त्याला सर्व विषयातलं सगळं काही कळत असा समज लोकांमध्ये पसरला होता. तो विद्वान तर होताच पण प्रत्येक गोष्टीचा तो विवेकी वृत्तीने अभ्यास करायचा.

त्याच्या लक्षात आलं की कोणत्याही रोगाच्या मागे दैवी शक्ती असणे शक्य नाही. त्याने अनेक प्रयोग करून वेगवेगळी औषधे शोधून काढली.

म्हणूनच हिप्पोक्रॅटिसला पाश्चात्य जगातला पहिला डॉक्टर मानलं गेलं.

रोग्यांना तपासणे, त्यांना औषध लिहून देणे, त्या रोगाचा इतिहास लिहून ठेवणे ही कला विकसित केली. अनेक माणसे अचानक एकत्र आजारी पडतात यामागे साथीचे रोग असतात हा शोध देखील त्यानेच लावला. पाश्चात्य वैद्यकीय शास्त्राचा जनक तोच होता. त्याने या शास्त्राचा अभ्यास करणारे अनेक शिष्य बनवले.

या शिष्यांसाठी त्याने वैद्यकीय नीतीची शपथ बनवली होती त्याला हिप्पोक्रॅटिसची शपथ म्हणून ओळखली जाते.

या शपथेमध्ये रुग्णसेवा हाच डॉक्टरचा खरा धर्म हा या शपथेचा पाया आहे. कोणत्याही रुग्णाला नाकारू नये व रुग्णाचे आजार बरे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा अस त्याने सांगितलं होतं.

त्या काळात लिहलेली  हिप्पोक्रॅटिसची शपथ आजही आपल्याला वाचायला मिळते.

अस म्हणतात की ही शपथेची प्रत हिप्पोक्रॅटिसच्या मृत्यूनंतर लगेच कोणी तरी लिहून ठेवलेली असावी.

फक्त ग्रीसच नाही तर जगभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर होणारे विद्यार्थी ही हिप्पोक्रॅटिसची शपथ घेतात.

भारतात देखील अनेक ठिकाणी ही शपथ आहे. फक्त काहीजण हिप्पोक्रॅटिसच्या ऐवजी चरक ला स्मरून शपथ घेतात.

काळानुसार त्यात अनेक बदल झालेले आहेत मात्र त्याचा मूळ गाभा अडीच हजार वर्षांपूर्वी हिप्पोक्रॅटिसने लिहिलाय तसाच ठेवण्यात आलेला आहे. जगभरातले सर्व डॉक्टर याच शपथेला बांधलेले आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की ही शपथ कोणी मोडत नाही. आपण अनेकदा पाहतो की डॉक्टरकी चा पवित्र व्यवसाय करत असूनही काहीजण गैरप्रकार करतात मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

आज 30 मार्च Doctor’s Day. आजच्या दिवसानिमित्त तहानभूक हरपून कोरोनाशी व अशाच प्राणघातक रोगांशी लढणाऱ्या डॉक्टरांना व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, त्यांना हे अखंड रुग्णसेवेचे व्रत देणाऱ्या हिप्पोक्रॅटिसला सलाम.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.