मराठी रंगभूमीवर पहिली स्त्री नाटककार होण्याचा मान हिराबाईंना जातो….

मराठी रंगभूमीवर ही जगातल्या महत्वाच्या रंगभूमीपैकी एक. याच रंगमंचावर महान महान कलाकार घडले आणि त्यांनी जगभरात आपला दरारा निर्माण केला. पुरुषसत्ताक नाट्य परंपरा मोडीत काढत पहिली स्त्री नाटककार होण्याचा मान मिळवला होता हिराबाई पेडणेकर यांनी.

त्यावेळच्या सावंतवाडी संस्थानात सावंतवाडी शहरात २२ नोव्हेंबर १८८५ रोजी त्यांचा जन्म झाला.

त्या लहान असतानाच आईचे निधन झाल्यामुळे त्यांची मावशी लहान हिराला घेऊन वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी
मुंबईला आली. मुंबईत आल्यावर नवीवाडी मधील मिशनरी स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण सुरु झाले. मुळातच अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी हिरा अभ्यासातील सर्व विषयात पारंगत झाली. मावशीकडे घरात संगीत होतेच नव्हे तो घराण्याचा वारसा असल्याने मावशीने त्यांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केली.

भास्करबुवा बखले, परशुरामपंत धुळेकर, फैय्याज खाँ इत्यादी श्रेष्ठ संगीतकारांनी त्यांना तालीम दिली. एवढेच नव्हे अंजनीबाई मालपेकर या मैत्रिणीचे गुरु नजिरखाँ,खादिम हुसेन खाँ यांचे गाणेही हिराबाईने आत्मसात केले.

लहान वयातच नृत्य व उत्कृष्ट गायिका म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली.

पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला.

या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वतःच नाटककार झाल्या.

हिराबाईंनी वयाच्या विशीत १९०५ साली पहिले नाटक लिहिले ते जयद्रथ विडंबन. ते रंगभूमीवर आले नसले तरी अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यांचे ‘संगीत दामिनी’, पहिला प्रयोग १९०८, पुस्तकरूपाने प्रकाशित सन १९१२ साली झाला.

हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले कारण हिराबाईंनी लिहिलेले “संगीत दामिनी’ हे नाटक कोणतीही नाटक कंपनी करण्यास तयार होईना. कारण कनिष्ठ कुलीन लेखिकेचे नाटक रंगमंचावर कसे आणावे, असा प्रश्न त्यावेळच्या प्रस्थापित नाटकमंडळींना पडलेला! शेवटी ही गोष्ट मामा वरेरकरांच्या कानी गेली.

त्यांनी “ललितकलादर्श’ या नाटकमंडळीचे चालक व प्रखर अभिनेते केशवराव भोसले यांना हे नाटक करण्याविषयी गळ घातली. ती भोसले यांनी मान्य केली आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते. पहिल्या स्त्री नाट्यलेखिका म्हणून त्यांचा गौरव झाला.

हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता-निबंधलेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या ‘मनोरंजन’ मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई.

एकेकाळी प्रसिद्धीच्या ऐन भरात असताना हळूहळू त्या मागे पडत गेल्या. हिराबाई पेडणेकर हा मराठी नाट्यसृष्टीतील असा अाविष्कार होता की, जो काही काळच तेजाने तळपला व नंतर प्रसिद्धीच्या झोतापासून इतका दूर गेला की, त्यांची आठवणही खूप कमी लोकांनी राखली.

कर्करोगाने त्यांचे पालशेत येथेच १८ ऑक्टोबर १९५१ रोजी निधन झाले. पुढे हिराबाई पेडणेकरांच्या आयुष्यातील घटनांनी प्रेरित होऊन वसंत कानेटकरांनी “कस्तूरीमृग’ हे नाटक लिहिले.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.