भगतसिंग यांच्यासोबत काम करणारा हा व्यक्ती पुढे भारतीय सिनेसृष्टीत पहिला खलनायक झाला

२१ व्या शतकातील आम्हा तरुण मुलांना भारतीय सिनेसृष्टीतील खलनायक कोण? असा प्रश्न विचारल्यावर धडाधड डोळ्यांपुढे काही नावं उभी राहतात. यातील अगदी वरच्या स्थानावर असतं ते म्हणजे अमजद खान आणि त्यांनी रंगवलेला गब्बर. यानंतर केवळ आवाजाने समोरच्याला गार करणारे अमरीश पुरी. कबीरा स्पिकिंग म्हणत हेराफेरी करणारा गुलशन ग्रोव्हर. आणि अगदी हल्ली लक्षात राहणारा ‘सिंघम’ मधला जयकांत शिक्रे फेम प्रकाश राज.

आणखीही बरीच नावं आहेत, पण ती सांगत बसलो तर विषय राहील बाजूला.. त्यामुळे मुद्द्यावर येतो. या सर्व खलनायकांच्या आधी भारतीय सिनेसृष्टीत एक असा खलनायक होऊन गेला, ज्याला पहिला सुपरस्टार खलनायक म्हणून ओळख मिळाली.

हा खलनायक म्हणजे हिरालाल.

युवा पिढीला यांच्याविषयी कदाचित ठाऊक नसावं. पण आपल्या आजी – आजोबांना नक्कीच या खलनायकी भूमिका करणाऱ्या माणसाविषयी माहीत असावं. हिरालाल या नावाने प्रसिध्द झालेला बॉलिवुडमधला हा पहिला खलनायक सुपरस्टार. पूर्ण नाव हिरालाल ठाकूर. जन्म पंजाब येथे १९०९ साली.

त्याकाळी त्यांच्या गावात रामलीला सादर व्हायच्या. या रामलीला बघत बघत ते मोठे झाले. लहानग्या हिरालाल यांना प्रभू श्रीराम ऐवजी लंकाधीपती रावणाची व्यक्तिरेखा जास्त आकर्षित करायची.

त्या काळात अनेक क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देत होते. आजूबाजूला देशप्रेमाने भरलेलं वातावरण होतं.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत वयाच्या १४ व्या वर्षी हिरालाल यांनी भाग घेतला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये ते कार्यरत होते. यानंतर भगत सिंग आणि लाला लजपत राय यांचा एक राजकीय आणि सामजिक कार्यकर्त्यांचा गट होता. सिनेमात करियर करण्याआधी हिरालाल यांचा या गटामध्ये सक्रिय सहभाग होता.

त्यांचं भाग्यच असेल की त्यांना भगतसिंग आणि लाला लजपतराय यांसारख्या क्रांतिकारकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

१९१३ साली दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. हळूहळू सिनेमा बनवण्याच्या हेतूने अनेक माणसं या क्षेत्रात येऊन स्थिरावत होते. यातील एक महत्वाचं नाव म्हणजे अब्दूर रशीद कारदार. अभिनय हा एक छंद म्हणून जोपासणाऱ्या हिरालाल यांनी कारदार यांच्या ‘सफदर जंग’ सिनेमात पठाण साकारला. ही गोष्ट १९२९ ची. याच दरम्यान ‘डॉटर्स ऑफ टुडे’ या मुकपटात त्यांनी अभिनय केला.

आणि अशाप्रकारे हिरालाल यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली.

तुम्हाला कदाचित माहीत असावं की, त्या काळातील पुरुष नटांना स्वतःच्या केसांबद्दल खूप प्रेम होतं. भूमिकेसाठी मिशी कापणं सुद्धा त्यांना आवडायचं नाही. या जमान्यात हिरालाल भूमिकेची गरज म्हणून वाट्टेल ते करण्यास तयार होते. त्यांनी १९३१ साली आलेल्या ‘आवारा रकासा’ या सिनेमासाठी स्वतःच्या डोक्यावरचे सगळे केस उडवले. त्यांच्या या धाडसाचं त्यावेळी सर्वत्र कौतुक झालं.

भूमिकेसाठी प्रामाणिक असणं म्हणजे काय? याचं उदाहरण त्यांनी सर्वांना दाखवून दिलं.

सिनेमा माध्यम सुद्धा बदलत होतं. मुकपटांचा जमाना मागे सरून बोलपट सुरू झाले होते. १९३२ साली आलेल्या ‘पवित्र गंगा’ या सिनेमात त्यांनी वेडसर संन्यासी रंगवला. त्यांना सिनेसृष्टीत पुढे अशा खलनायकी छटा असलेल्या भूमिका मिळत गेल्या. आणि यात ते खुश होते. शरीरयष्टी आणि दमदार आवाज या जोरावर त्यांनी रंगवलेले खलनायक लोकप्रिय झाले.

१९२८ ते १९८१ हा मोठा काळ त्यांनी बॉलिवुडमध्ये अनुभवला. या काळात बदलत गेलेल्या सिनेमा माध्यमाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला.

२७ जून १९८१ रोजी त्यांचं निधन झालं. भारतीय सिनेसृष्टीत त्यांची ओळख ही खलनायक म्हणून अजरामर झाली. मोठ्या खलनायकांच्या यादीत त्यांचं नाव काहीसं झाकोळलं गेलं असलं तरीही भारतीय सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार खलनायक म्हणून हिरालाल ठाकूर यांना आपण विसरता कामा नये.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.