त्याचा चेहरा भोळा होता, पण कांड असे केले की पोलीस सुद्धा हादरले होते

२०१५ सालचा सप्टेंबर महिना. पावसाळ्याचा हंगाम असल्यांनं बाहेर पावसाची रिपरिप सुरु होती. तेवढ्यात बंगळुरू एअरपोर्ट अथॉरिटीच्या ऑफिसमधला फोन वाजला. स्पेशली इमर्जन्सीसाठीचा नंबर असल्यानं अधिकारी फोन उचलायला केला नाही.

‘हॅलो बेंगळुरू एयरपोर्ट.. ‘ असं म्हंटल्यावर समोरुन अपेक्षित नव्हता असा मिश्किल हसू असणारा पण  धमकीने भरलेला आवाज आला, ‘बेंगळुरू आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवलेत…. ‘ एवढं एकचं  वाक्य बोलून फोन ठेवला.

आता बॉम्ब ठेवल्याच्या फोन म्हटल्यावर लगेच सगळी सूत्र हलवली गेली. बॉम स्कॉड, डॉग स्कोड, स्पेशल पोलीस फोर्स, सगळ्यांपर्यत बातमी पोहोचवली गेली, उड्डाण केलेल्या विमानांना इमर्जन्सी लँडिंग करण्याचे आदेश देण्यात आले, तर उड्डाण होणारी विमान तातडीने रद्द करण्यात आली. एका अनोळखी फोन कॉलवर मिळालेल्या धमकीमुळे सगळीकडे नुसती खळबळ उडाली.

सगळं प्रशासन हातची काम सोडून बॉंम्बचा शोध घेत बसले. दिल्ली – बंगळुरू जाणाऱ्या सगळ्या विमानांची तपासणी केली गेली, सोबत बाकची काही विमान सुद्धा तपासली. दिल्ली आणि बंगळुरू दोन्ही एअरपोर्ट कानाकोपरा तपासला गेला.

पण बॉम्ब काही सापडला नाही आणि अथॉरिटीला बॉम्ब ठेवल्याचा आलेला फोन हा खोटा होता हे समजलं.

मग काय… तपास संपला नाही. पोलिसांनी त्या फोन नंबरचा तपास केला, तेव्हा समजलं की, हा नंबर साजू जोश नावाच्या एका व्यक्तीचा आहे. आता पोलिसांना माणूस सापडून काढायला वेळ थोडीना लागतोय. पोलिसांनी साजू जोशचा सगळा सात – बारा काढून त्याला गाठलं आणि तपास करायला सुरुवात केली.

पण ज्याच्या नंबरवरून हा फोन कॉल आला होता, त्या जोशला हा सगळा प्रकार माहीतचं नव्हता, तो डोक्याला हात लावून बसला, पोलीस सुद्धा हैराण झाली. कारण ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच नाव तर जोशच्य नावावरून होत, पण तो नंबर जोशचा नव्हताचं. त्यामुळं तपास अजून वाढला, पोलीस सगळे धागेदोरे तपासत होते. तेव्हा समोर आलं की, त्या नंबरचा सिग्नल जोशच्याच अपार्टमेंटमधून येतोय. शोध घेतला तेव्हा तो नंबर गोकुल माचरी नावाच्या व्यक्तीकडे सापडला.  

गोकूल हा आयटी इंजिनिअर होता आणि जोशचा जिगरी यार सुद्धा, पण त्यानं आपल्या मित्राला म्हणजे जोशलाच फसवण्यासाठी त्याचा फोन घेऊन हा फ्रॉड केला होता. जोशला हे समजल्यावर दोघांमध्ये पोलिसांसमोरच हमरातुमरी झाली. तेव्हा पोलिस गोकुलला घेऊन गेले आणि चौकशी सुरु केली. तेव्हा समजलं की या सगळ्यांमागे लव्ह ट्रँगल होता….

गोकुलचा हा सगळा कांड केला होता जोशच्या बायकोसाठी म्हणजे धन्या बाबूसाठी, जी खूप सुंदर होती. पण धक्कादायक म्हणजे फक्त एवढंच नाही तर धन्याला मिळवण्यासाठी त्याने आपल्या बायकोला सुद्धा २०१४ मध्ये मारून टाकलं होत. हे ऐकून पोलीस सुद्धा हादरले. आणि गोकुलने पोपटासारखी सगळी स्टोरी सांगायला सुरुवात केली. 

जोशची बायको धन्या आणि गोकुल २००७ पर्यंत केरळमधल्या त्रिशूर इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. गोकुलला धन्या आधीपासूनच आवडायची, त्याला तिच्याशी लग्न सुद्धा करायचं होत, पण त्याला तिला बोलायची हिम्मत कधीच झाली नाही. 

शेवटी कॉलेज संपलं आणि गोकुल दिल्लीला निघून गेला. जिथे तो अनुराधा नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. अनुराधा खूप अध्यात्मिक होती. २००९ साली गोकुल आणि अनुराधानने लग्न केले, त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. या सगळ्यात गोकुल आपली कॉलेजची मैत्रीण धन्याला पार विसरून गेला होता

पण पिक्चरमधल्या इंटर्वल नंतर जशी स्टोरी बदलते, तसंच गोकुल सोबत झालं. म्हणजे लग्नाच्या काही वर्षातचं गोकुल आणि अनुराधा यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. त्यात अनुराधाचे बाहेर कोणाशी संबंध असल्याचं गोकुलला समजलं. 

गोकुल या सगळ्या टेन्शनमध्ये असताना त्याला २०११ मध्ये फेसबुकवर त्याची कॉलेजची जुनी मैत्रीण धन्याची प्रोफाइल दिसली, त्याने लगेच कॉन्टॅक्ट केला. जुन्या आठवणी ताज्या झाल्यानं त्याचा आणखी संबंध वाढला. तो बंगळुरूला ये-जा करायचा. तेवढ्यात त्याला समजलं की, धन्याचं सुद्धा लग्न झालंय आणि ती एका बाळाची आई आहे. गोकुलला जरा वाईट वाटलं, पण तरी त्यानं कॉन्टॅक्ट बोलणं सोडला नाही.  

पण गोकुलला हे सुद्धा समजलं की, तो प्रेम करत असलेल्या धन्याची सुद्धा मॅरीड लाईफ खराब आहे. तेव्हा त्यानं प्लॅन आखायला सुरुवात केली. धन्याला मिळवायचं म्हंटल्यावर त्याला आपली बायको अनुराधा आणि धन्याचा नवरा जोश यांना बाजूला काढणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यानं अनुराधापासून सुरुवात केली. 

अनुराधाच्या अफेअरची माहिती गोकुळने आपल्या सासऱ्यांना म्हणजे अनुराधाच्या वडिलांना सांगितली. जेणेकरून त्यांच्या मनात एक सॉफ्टकॉर्नर ठेवता येईल. मग त्यानं अनुराधाच्या आध्यात्मिक असल्याचा फायदा घेतला. अनुराधाची साईबाबांवर भक्ती होती, म्हणून त्यानं साईबाबांच्या एका ट्रस्टशी रिलेटेड आहे दे दाखवून देत एक फेक ईमेल आयडी तयार केला, ज्यावरून तो अनुराधाला मेल पाठवायचा. 

अनुराधा आता गोकुलच्या जाळ्यात चांगलीच सापडली होती. दोन महिन्यातचं तिने आपल्या अफेअरची माहिती त्या बाबांना म्हणजे गोकुलला दिली. पण गोकुलला ही गोष्ट कुठेतरी खटकली कि आपण चुकीचं वागतोय, म्हणून त्याने अनुराधाला बाबा म्ह्णून सल्ला दिला कि, तू नवऱ्याचा स्वीकार करून एक नॉर्मल जीवन जग…. 

अनुरोधाने सुद्धा बाबांच्या म्हणण्यानुसार गोकुलला कबुल केलं आणि इकडे गोकुलने सुद्धा तिला माफ केलं. पण हा गोड संसार काहीच महिने राहिला आणि अनुराधाचं अफेअर पुन्हा सुरु झालं. गोकुलची मात्र सहनशक्ती संपली, त्याने फायनली ठरवलं कि आता मागे न हटता अनुराधाला बाजूला काढायच आणि धन्याला कुठल्याही परिस्थितीत परत मिळवायचं. 

गोकुलने पुन्हा आध्यात्मिक फेक आयडी बनवून अनुराधाला गुंडाळायचा प्रयत्न सुरु केला आणि अनुराधा पुन्हा जाळ्यात अडकली. पण यावेळी सल्ला उलटा कि, तू जे करतेय त्यात चुकीचं काही नाही. अनुराधाला यामुळे एक सहानुभती मिळाल्यासारखं वाटलं, मग गोकुलने मेल करून अनुराधाला तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले, जेणेकरून गोकुलला त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रार्थना करू शकतील.   

अनुरोधाने विश्वास ठेवून सगळे फोटो पाठवले, पण गोकुलने हे फोटो अफेअरचे पुरावे म्हणून ठेवले. आणि सगळे फोटो आपल्या सासऱ्यांना पाठवून त्यांना आपल्या बाजूने करून घेतलं. पुढे गोकूलसुद्धा बंगळुरूला शिफ्ट झाला, आणि त्याच अपार्टमेंटमध्ये घर घेतलं जिथे धन्या आणि जोश राहायचे. 

गोकुलने त्या ईमेल आयडीवरून अनुराधाला विशेष प्रार्थना करण्यासाठी एक भली मोठी लिस्ट पाठवली. ज्यात भरपूर दारू प्यायला सांगितलं, जेणेकरून ती नवऱ्यापासून दूर जाऊन आपल्या प्रियकराशी जोडली जाईल. 

२७ जून २०१४ चा तो दिवस अनुराधाने इतकी दारू पिली कि तिला कसलीचं सूद नव्हती. गोकुलने याच संधीचा फायदा घेतला. घरातली एक मूर्ती उचलून अनुराधाच्या डोक्यात एकामागून एक वार केले आणि तिची हत्या केली. यांनतर त्याने पोलीस आणि अनुराधाच्या घरच्यांना फोन करून अपघाती मृत्यूची माहिती दिली. 

पोलिसांना मात्र गोकुलवर दाट संशय होता, या प्रकरणात पोलीस तपास सुद्धा करणार होते, पण अनुराधाच्या घरच्यांनीचं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि जावयाला वाचवलं. कारण त्यांना आपल्या मुलीच्या अफेयरची कल्पना होती, त्यांना गोकुलवर जरा सुद्धा डाउट आला नाही. त्यामुळे अनुराधाचा चॅप्टर गोकुलने पूर्णपणे क्लोज केला. 

आता एक प्लॅन तर सक्सेसफुल झाला, म्हंटल्यावर गोकुलने दुसऱ्या प्लॅनवर फोकस केला. म्हणजे धन्या आणि साजू जोश यांच्यात भांडण लावायला सुरुवात केली. आता साजू आणि धन्या ख्रिश्चन धर्मीय असल्याचे त्याने बंगळुरूच्या एका फादरच्या नावे साजूला पत्र लिहिले कि, तुझी बायको तुझ्यासोबत खुश नाही त्यामुळे तुम्ही डिवोर्स घ्या. दुसरीकडे त्याने धन्याला सुद्धा पत्र लिहिलं कि, तू तुच्या नवऱ्याला सोडून दे.  

त्याला वाटलं आता हे दोघे वेगळे होतील. म्हणून तो निवांत गावाला गेला. पण आल्यावर बघतो तर काय साजू आणि धन्यामध्ये परत पॅचअप झालं. मग मात्र गोकुलचं डोकं फिरलं आणि त्यानं डायरेक्ट फुल प्रूफ प्लॅन बनवला. 

त्याने सलमान नावाने एक फेक सिम घेतलं आणि त्यावरून साजु जोशला धमकीचे मॅसेज पाठवायला सुरुवात केली. तसंच साजूचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्या नावाने दुसरं सिम घेतलं. साजू हा एका दहशतवाद्यांशी मिळालेला आहे, हे त्याला दाखवून द्यायचं होत. जेणेकरून धन्या त्याला सोडून देईल. 

त्यांनतर त्यानं बंगळुरू एअरपोर्ट अथॉरिटीला फोन करून तो बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन केला. आणि सगळं रामायण घडलं . 

गोकुलच्या सगळ्या कबुली जबाबानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर फ्रॉड, मर्डर, फेक ईमेल आयडी,  पुरावे नष्ट केल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३८५, १७७, ३०२, ४१९ आणि २०१ अन्वये  गुन्हे दाखल करण्यात आले आणि गोकुल आजही जेलमध्ये आहे.   

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.