हिसारमधल्या आत्महत्या प्रकरणामुळं लोकांना बुरारी हत्याकांड आठवतंय
विकेंड सुरू होता, म्हणलं उद्या सुट्टी आहे… निवांत उठलो तरी चालतंय. त्यामुळं एकट्यानंच नेटफ्लिक्स अँड चिल करायचं ठरवलं. तेव्हा ट्रेंडिंगमध्ये होती, ‘हाऊस ऑफ सिक्रेट्स’ नावाची डॉक्युमेंट्री. आता बुरारी हत्याकांडाची न्यूज वाचली होती. त्यामुळं लय उत्सुकता होती, म्हणून डॉक्युमेंट्री बघायला सुरुवात केली. पहिला एपिसोड बघून चेहऱ्यावरची माशी पण हलली नाय. असं वाटलं आपल्यात लय डेरिंग आलीये.
पण दुसऱ्या एपिसोडमध्ये जेव्हा ललितचा डोळा दिसला, तेव्हा डायरेक्ट मणकाच थंडगार पडला. फाटून हातात येणं म्हणजे काय, हे त्या दिवशी समजलं. आता आपण स्क्रीनवर हे सगळं पाहत होतो, ज्यांनी खऱ्या आयुष्यात पाहिलं आणि अनुभवलं त्यांचा तर विचारच न केलेला बरा.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, हरियाणामधल्या हिसारमध्ये घडलेली घटना. एका भलत्या अट्टहासापायी पाच जणांच्या सुखी कुटुंबाला आपले प्राण गमवावे लागले. कित्येक स्वप्नं चिरडली गेली.
नक्की काय मॅटर झालाय?
रमेश वर्मा नावाचा एक माणूस रस्त्याच्या मध्ये उभा राहिला आणि गाडीखाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं खरं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आता साहजिकच माणूस गेलाय, म्हणल्यावर त्याच्या घरच्यांना कळवायला हवं की. त्यात पोलिसांना रमेशजवळ एक सुसाईड नोट सापडली.
त्यात काय लिहीलेलं हे सांगायच्या याधी, पोलिस रमेश वर्माच्या घरी गेले तेव्हा काय दिसलं हे सांगतो. रमेशची बायको, त्यांच्या दोन मुली आणि मुलगा यांचे मृतदेह घरात होते.
रमेशनं रात्री घरच्यांसोबत जेवण केलं, त्यानंतर त्यांच्यावर कुदळीचे घाव घालून त्यांची हत्या केली. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रमेशनं जेवणात विष कालवल्याची दाट शक्यता आहे. विषबाधेमुळं कुटुंबीय बेशुद्ध झाले आणि त्यानंतर रमेशनं त्यांची हत्या केली आणि मग स्वतः गाडीखाली येत जीव दिला.
एकाचवेळी घरातल्या पाच सदस्यांची जीवनयात्रा अशाप्रकारे संपली आहे, म्हणल्यावर लय प्रश्न पडतात. पैशाची चणचण? घरातले राडे? असं बरंच काय काय. पण जी माहिती समोर आलीये ती वाचून तुम्ही खरं हँग व्हाल.
वर्मा कुटुंबाचं घर अगदी उदास वातावरणात अजिबात नव्हतं. त्यांच्या भागातल्या वाढीव घरांपैकी एक घर म्हणून त्यांचं घर ओळखलं जायचं. कारण घराजवळ बाग आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि पक्ष्यांची घरटीही आहेत. रमेशला सगळ्यात जास्त आवड सापांची होती, त्यानं सोशल मीडियावरही सापांसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.
त्याला आर्थिक चणचण असण्याची शक्यताही कमीच होती, त्याचा व्यवसाय उत्तम चालत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी माध्यमांना दिली. हे सगळं असताना त्यानं घरातल्यांची हत्या आणि मग आत्महत्या का केली? आणि त्याच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
डीआयजी बलवान सिंह राणा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘रमेशनं ११ पानी सुसाईड नोट लिहिली आहे. या दुनियेत मन लागत नाही, त्यामुळं मोक्ष मिळवण्यासाठी मी हे जग सोडून चाललो आहे. या दुनियेत माझं कुटुंब कसं राहणार? म्हणून त्यांनाही घेऊन चाललोय. मरण्यासाठी मी स्वतःला करंट द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल माफी मागतो आणि जे झालं त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही,’ असा उल्लेख रमेशच्या सुसाईड नोटमध्ये आहे.
थोडक्यात काय… तर व्यवस्थित सुरु असणारा व्यवसाय, सुखी कुटुंब हे सगळं असताना केवळ मोक्ष प्राप्ती करायची म्हणून स्वतःचा अनमोल जीव तर द्यायचाच, पण सोबत पुरेशी दुनिया न पाहिलेल्या आपल्याच लेकरांची हत्या करायची… हे सगळं वाचून आणि कल्पना करुन लोकांना दिल्लीतलं बुरारी हत्याकांड आणि ललितचा चमकणारा डोळा या गोष्टी आठवल्याशिवाय राहत नाही, हे नक्की…
हे ही वाच भिडू:
- नरेंद्र गिरींची हत्या कि आत्महत्या ? अखेरच्या चिठ्ठीच्या बाबतीतही एक मोठा ट्विस्ट आहे.
- मराठ्यांच्या भीतीनं जयपूरच्या महाराजाने विष खाऊन आत्महत्या केली होती
- भारताचा अभिमान असणारे शूटर्स स्वतःच्याच बंदुकीनं गोळी झाडून आत्महत्या करतायत