हिशोब चुकलेला सिंधी
सिंधी माणूस व्यापारात तरबेज असतो. शून्यातून विश्व ऊभं करण्याची त्याची हातोटी सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानात सगळा जमीन जुमला, मालमत्ता सोडून अंगावरच्या कपड्यानिशी कित्येक सिंधी बांधवांना यावं लागलं. भारतात सहजासहजी बस्तान बसणार नव्हतं. खुप कष्ट करून व्यापारात नाव कमवावं लागलं.
सिधी माणसाचा हिशोब चुकत नाही याचा अनुभव जगाने घेतला. फक्त एक माणूस आहे ज्यांचा हिशेब चुकतच गेला. ते नाव म्हणजे लालकृष्ण अडवाणी.
हिंदुत्वाच्या राजकारणाची आक्रमक सुरुवात करणाऱ्या अडवानींचा जन्म आज पाकिस्तानात असलेल्या कराचीचा. अडवाणी शिकले ते एका कॅथलिक शाळेत. सेंट पॅट्रिक नावाच्या. कराचीत बालपण गेलेले अडवाणी तरूणपणी भारतात आले. फाळणीमुळे यावं लागलं. अडवाणींचं वकिलीचं शिक्षण महाराष्ट्रात झालं. मुंबईत. पुढे पत्रकार म्हणून काम करत होते. पण संघातही सक्रिय होते.
फाळणीच्या ताज्या जखमा ऊरात ठेऊन अखंड भारताचं स्वप्न बघणाऱ्या लोकांमध्ये ते सक्रिय झाले.
जनसंघापासून अडवानींची सक्रीय राजकारणाची सुरुवात झाली. पहिल्या बिगर कॉंग्रेसी सरकारमध्ये माहिती आणी प्रसारणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. पुढे त्यांनी वाजपेयी यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. वाजपेयींना नेहमी भाजपचा मुखवटा मानलं गेलं. भाजपचा आत्मा होते अडवाणी.
दोन खासदारांच्या या पक्षाला ८४ खासदारांचा पक्ष बनवून दाखवण्यात एकट्या अडवाणी यांच्या रथयात्रेचा सिंहाचा वाटा होता.
पण पुढे सत्ता आल्यावर अडवाणी यांना पंतप्रधान होता आले नाही. निमूटपणे वाजपेयी यांचा चेहरा समोर आणावा लागला. भाजपने अडवाणी यांची बळेच बनवलेली लोहपुरूष प्रतिमा त्यांच्यासाठी घातक ठरली.
अडवाणी खरेच लोहपुरूष आहेत का? होते का?
अडवाणी खरतर भारतीय राजकारणातले एक अतिशय सभ्य आणि साधे नेते. त्यांनी कितीही आक्रमक वक्तव्ये केली किंवा प्रखर हिंदुत्ववादी असल्याचा आव आणला तरी मनातून ते अतिशय हळवे राहिले. ही विसंगती त्यांना नुकसानीची ठरली. त्यांना बाबरी मशीद पडावी असेही वाटत नव्हते आणी मन्दिर उभारावे असेही वाटत होते. या दोन गोष्टी एकत्र कशा शक्य होत्या हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. राजधर्माच्या कारणावरून मोदींवर वाजपेयी नाराज झाले होते. पण अडवाणी ठामपणे मोदींच्या पाठीशी उभे राहिले. आणि एकेकाळच्या आपल्या लाडक्या सहकाऱ्यापासून म्हणजे प्रमोद महाजन यांच्यापासून मात्र दुरावले. त्याने गोंधळ असा झाला की मनोहर पर्रीकर यांच्यासारखे नव्या दमाचे नेतेसुद्धा अडवाणी यांच्या उघडपणे विरोधात गेले.
अडवाणी अहमदाबादमधून निवडून यायचे. त्यांनी मोदींना नेहमी प्रोत्साहन देणे क्रमप्राप्त होते. मोदीसुद्धा अगदी निष्ठेने अडवाणींच्या बाजूने होते. पण अडवाणींची आक्रमक हिंदुत्वाची प्रतिमा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांना मान्य नव्हती. त्यांना वाजपेयींचा चेहरा सोयीचा होता. बीजेपीकडे त्यावेळी असे दोन टोकाचे दोन चेहरे होते. मत मागायला अडवाणींचा आक्रमक चेहरा आणि सत्तेत पाठिंबा मिळवायला वाजपेयींचा सौम्य चेहरा.
शेवटी अडवाणींनी नंबर दोनवर राहणे ओघाने आले. पण तिथेही अडवाणींनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.
बाबरी पडल्यावर त्यांनी जवाबदारी स्वीकारली नाही. उलट जे झालं ते चुकीचं झालं अशा अर्थाची प्रतिक्रिया देऊन थांबले नाहीत तर अश्रूही ढाळले. त्यानंतर सत्तेत असताना थेट कंदाहार अपहरण प्रकरणात मोठा वाद ओढवून घेतला. अतिरेक्यांना सोडण्याचा निर्णय झाला त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो असं विधान केलं. आपली लोहपुरूष प्रतिमा जपण्याच्या नादात ते आपल्याच सरकारवर घसरले. त्यावेळी जसवंतसिंह यांच्यापासून अनेकांनी जाहीरपणे अडवाणी यांना खोटे ठरवले. हवाला प्रकरणात स्वतःवर आरोप होताच राजीनामा देणारे नैतिक अडवाणी अचानक वेगळे वाटू लागले. संघ आणी हिंदुत्ववादी जनतेच्या दृष्टीने अडवाणींनी केलेली घोडचूक म्हणजे पाकिस्तानात जाऊन जीनांच्या समाधीला भेट. त्यात जिना सेक्युलर होते असं प्रमाणपत्र. खरतर अडवानींचा राजकीय प्रवास तिथेच संपला.
मोदींनी त्यांना साईड लाईन केले असा आरोप केला जातो. पण जीनांच्या समाधीस्थळी जाऊन अडवाणींनी स्वतःच स्वतःला संघाच्या गुड बुकमधून साईडलाईन केलं. पुढे मोदींसाठी अनुकूल वातावरण आपोआप होत गेलं. त्यामुळे अडवाणी पंतप्रधान न होण्याला मोदींना जवाबदार ठरवणे चूक आहे.
अडवाणी यांनी केलेल्या चुका त्यांना भोवल्या. पण हे खरं असलं तरी राममंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित असण्याचा पहिला हक्क फक्त आणि फक्त अडवाणी यांचाच होता.
कारण या देशात राममंदिरासाठी वातावरण निर्मिती करण्याचं काम फक्त अडवाणी यांनी केलं. जीवावर उदार होऊन केलं. आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून केलं.
बीजेपीला सत्ता मिळाली ती राममंदिरामुळे. आणी अडवाणी पंतप्रधान होऊ शकले नाहीत तेही राममंदिरामुळे.
त्यांच्यावर दंगलीचे खापर होते. म्हणजे राममंदिराच्या आंदोलनाचा जो काही तोटा होता तो एकट्या अडवाणी यांनी सहन केला. आणी यश पक्षाने वाटून घेतले. हे सगळ्यांना माहित आहे. कोर्टात जायला, साक्ष द्यायला, आरोप सहन करायला अडवाणी होते. अशावेळी राममंदिरच्या पायाभरणी साठी ज्याने या पूर्ण आंदोलनाचा पाया रचला त्याला न बोलवणे चुकीचे होते. या देशात नव्हे जगात सगळ्यात मोठी रथयात्रा काढणारा माणूस म्हणून अडवाणी ओळखले जातात. त्यांच्या रथयात्रेच्या आयोजनात प्रमोद महाजन आणी नरेंद्र मोदी यांची जवाबदारी मोठी होती. मोदींनी आधी त्यांना अहमदाबादच्या हक्काच्या जागेवरून दूर केलं.
अडवाणी यांची सगळ्यात हक्काची जागा अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणीच्या वेळी होती. खरतर त्यावेळी अडवाणींना सन्मानाने बसलेलं बघून प्रत्येक हिंदुत्ववादी खुश झाला असता. आणि राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपद न मिळाल्याची खंत अडवाणींनी फार मनात ठेवली नसती. या वयात त्यांचा असा उचित सन्मान व्हायला हवा होता.
कारण रामजन्मभूमी आंदोलनात फक्त आरोपच त्यांच्या वाट्याला आलेत. प्रसाद नेहमी दुसऱ्यांनीच खाल्ला.
अडवाणी यांच्याबद्दल दिल्लीत बोललं जातं की त्यांनी जेवढं लिखाण केलय तेवढ कित्येक नेत्यांनी वाचन सुद्धा केलेलं नाही. पण मोदींची पुस्तकं जेवढी प्रसिद्ध आहेत तेवढी लेखक असलेल्या अडवाणींची नाहीत हे सत्य आहे. एकेकाळी फक्त अडवाणींचा निवडणुकीचा फॉर्म लिहितानाच लोकांनी मोदींना बघितलं होतं. वक्त वक्त की बात है. फार कमी वेळा सिंधी माणसाचा हिशेब चुकतो. अडवाणी त्यातले एक.
हे ही वाच भिडू
- जेव्हा सगळ जग अडवाणींच्या विरोधात गेल होतं तेव्हा एक माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
- राहुल गांधी होणे सोपी गोष्ट नाही.
- अमृतावहिनी हम तुम्हारे साथ है !