फक्त सध्याची आंदोलनंच नाही, बजरंग दलाला इतिहासही मोठाय…

कर्नाटकमध्ये शाळा-कॉलेजात हिजाब घालण्यावरुन सुरू झालेला वाद, संपूर्ण देशभरात गाजला. त्या वादाचे पडसादही सगळीकडे उमटले. पण आता या वादाला हिंसक वळण लागत असल्याची चिन्ह कर्नाटकमध्ये दिसून येत आहेत. झालंय असं, की कर्नाटकमधल्या शिवमोगामध्ये हर्षा नावाच्या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं. हर्षा बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्यानं राज्यात सुरु असलेल्या हिजाबच्या वादावर फेसबुक पोस्ट केली होती, असं प्राथमिक पोलिस तपासात समोर आलंय.

हर्षा याच्या अंत्ययात्रेला हिंसक वळण लागलं. त्याच्या अंत्ययात्रेदरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. त्यातच भाजप मंत्र्यांनी हर्षाच्या हत्येचा आरोप मुस्लिम समुदायावर ठेवला. त्यामुळे या प्रकाराला राजकीय वळण मिळालं आहे. कर्नाटकमध्ये शाळा आणि कॉलेजला दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

पण हर्षा या तरुणाची हत्या, त्याच्या अंत्ययात्रेला लागलेलं हिंसक वळण या सगळ्यामुळे आणखी एक संघटना चर्चेत आलिये ती म्हणजे बजरंग दल. हिजाबवरुन झालेल्या वादातही बजरंग दलाची भूमिका चांगलीच चर्चेत आली होती.

व्हॅलेन्टाईन्स डे, सध्या सुरु असलेला राडा या गोष्टींमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बजरंग दलाचा इतिहासही डीप आहे…

स्थापनेलाही वादाची किनार…

बजरंग दलाची स्थापना झाली, ती रामजन्मभूमीवरुन झालेल्या वादादरम्यान. ऑक्टोबर १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येतून ‘श्रीराम जानकी रथयात्रा’ काढली होती. त्यावेळी तत्कालीन सरकारनं या यात्रेस सुरक्षा न दिल्यानं विश्व हिंदू परिषदेनं तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना यात्रेचं रक्षण करण्याचं आवाहन केलं. त्या कार्यकर्त्यांमधूनच बजरंग दलाची स्थापना झाली. अयोध्येतून सुरू झालेल्या यात्रेमुळं पुढं जोरदार राजकारण तापलं होतं.

पुढं बाबरी मशिद पाडण्यात आली, तेव्हाही बजरंग दलाचा सक्रिय सहभाग होता. १९९३ मध्ये बजरंग दलाला संघटनात्मक रुप देण्यात आलं. देशातल्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये बजरंग दलाच्या शाखा उघडण्यात आल्या. विशेषत: २०१० नंतर बजरंग दलाचं प्राबल्य आणखी वाढायला सुरुवात झाली. सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येनं बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.

बजरंग दल नेमकं काय काम करतं?

तर विश्व हिंदू परिषदेची युथ विंग अशी ओळख असलेल्या बजरंग दलाच्या कामाबाबत त्यांच्या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय, की आपत्कालीन घटनांवेळी नागरिकांची मदत करणं, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर असे विधायक उपक्रम राबवण्याचं काम बजरंग दल करतं. हिंदू मंदिरं आणि हिंदू धर्मियांच्या रक्षणासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते तत्पर असतील, असंही विश्व हिंदू परिषदेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलंय.

बजरंग दलामध्ये संयोजक नेमून दिलेले असतात, त्या त्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येते. बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘बल उपासना केंद्र’ याच्या अंतर्गत व्यायाम आणि इतर ड्रिल्स करतात. सोबतच दर आठवड्याला त्यांचा संस्कार दिवस असतो, ज्यात ते मंदिरात एकत्र येऊन हनुमान चालीसा वाचतात. प्रत्येक विभागात सहा ते सात जणांवर जबाबदारी दिलेली असते, ज्यात चालीसा प्रमुख, आखाडा प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि प्रशिक्षण प्रमुख असतात. चालीसा प्रमुखाला संस्कार दिवसाला हनुमान चालीसा पठण होतंय ना हे पाहावं लागतं, आखाडा प्रमुख व्यायामाकडे लक्ष देतो, सुरक्षा प्रमुख बजरंग दल आंदोलन वैगेरे करणार असेल, तर त्याची माहिती राज्य आणि केंद्र विभागाला देतो. प्रशिक्षण प्रमुखाकडे कार्यकर्त्यांच्या वर्षभराच्या प्रशिक्षणाची जबाबदारी असते.

व्हॅलेंटाईन डेला बजरंग दलाचा कायम विरोध राहिला आहे, व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलन केलंय. त्यामुळं ते चर्चेत असतात.

आत्मरक्षा कॅम्पही सापडलेला वादात…

मे २०१६ मध्ये, बजरंग दलानं आपल्या कार्यकर्त्यांसाठी अयोध्येमध्ये ‘आत्मरक्षा कॅम्प’चं आयोजन केलं होतं. यामध्ये कार्यकर्त्यांना स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र या कॅम्पमधले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात काही कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायात घालतात, तशा टोप्या घातल्या होत्या, तर कार्यकर्त्यांचा दुसरा गट त्यांच्यावर हल्ला करत होता. या व्हिडीओमुळं देशातलं राजकीय वातावरण पेटलेलं आणि त्यावरुन बजरंग दलावर गुन्हाही दाखल झाला होता.

आता कर्नाटकमधल्या वादात बजरंग दल काय भूमिका घेणार आणि त्यामुळं राज्यातलं आणि पर्यायानं देशातल्या वातावरणावर काय परिणाम होणार हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.