स्वत:ला “बुद्धांच्या संघाचा” म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा असा आहे इतिहास…
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी एक चेहरा नेहमी समोर येत होता. ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते. आता पुन्हा एकदा सदावर्ते चर्चेत आले आले. त्याच कारण म्हणजे त्यांनी केलेली स्वतंत्र मराठवाड्याची मागणी.
याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक केली. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशा घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी शाईफेक करतांना केली.
महाराष्ट्रात चर्चेतली एखादी केस सुरू असली की सदावर्ते यांचं नाव हमखास बातम्यांमध्ये येतं. सोबतच त्यांच्या पत्नी ॲड जयश्री पाटील यांचंही.
पण त्यांची भूमिका विरोधाभासी वाटते…
यासाठी त्यांचा इतिहास बघायला लागेल…
एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा सुरू होता पण त्याविरोधात थेट न्यायालयात जाणारे सदावर्तेच होते. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची याचिका करून त्यांना थेट राजीनामा द्यायला लावणाऱ्या जयश्री पाटीलच होत्या.
आणि त्यानंतर हे दांपत्य गेली ४-५ महिने झालेत एसटी संपाच्या निमित्ताने सतत बातम्यांमध्ये झळकत असतात.
मध्यंतरी भाजपने एसटी संपातून माघार घेतली तरी आपण हा “संप डंके की चोट पे सुरू ठेवणार” असं म्हणून या संपाची जबाबदारीच त्यांनी खांद्यावर घेतलीये. पण इकडे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात तर तिकडे एसटी संपात एक मराठा लाख मराठाची घोषणा हे सगळंच करणारे गुणरत्न सदावर्ते.
गुणरत्न सदावर्तेहे मूळचे नांदेडमधील हिवरा या गावचे आहेत. त्यांचे वडील नांदेड महानगरपालिकेत ३० वर्षे नगरसेवक होते. सदावर्ते यांचं शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून झालयं. आधी त्यांनी बीडीएस पुर्ण केलयं त्यानंतर त्यांनी एलएलबीसुद्धा केलयं.मुंबई विद्यापीठातून त्यांनी एलएलएमही केलयं.
२०१३ च्या दरम्यान त्यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेट, सेक्युलर रिफ्लेक्टेड इन इंडियन कॉन्स्टीट्युशन’ या विषयात औरंगाबादेतून पीएचडी केलीये. कॉलेज जीवनात असताना ते विविध सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच पुढे असायचे. मुंबईमध्ये वकिली करताना सदावर्ते हे मॅटच्या बार असोसिएशनचे दोनदा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.
त्यांनी अनेक महत्वाच्या केसेस लढवल्यात…
केवळ मराठा आरक्षणावरील याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैद्राबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या विरोधात केस लढत असल्यामुळे सदावर्ते यांना अनेकदा धमक्या आल्याचं ते सांगतात.
१० डिसेंबर २०१८ ला तर त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता.
तर दुसरीकडे मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टात जेव्हा रद्द झालं तेव्हा ‘जर आमच्या जीवाचं काही बरवाईट झालं तर त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील’ असं सदावर्ते म्हणाले होते.
या सगळ्या प्रकरणात सदावर्तेंवर ते भाजपशी संबंधित असल्याचा अनेकदा आरोप झाला परंतु भाजपशी माझा काहीही संबंध नसून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर विरोधक आहे. फडणवीस संघाचे आहेत तर मी बुद्धांच्या संघाचा आहे अस स्पष्टीकरण ते अधून मधून देत असतात.
आता जयश्री पाटील यांच्याविषयी बोलायचं तर,
मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही विरोध केला होता.
त्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचं काम असून त्यांनी या विषयावर आधारित अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. तसंच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे.
गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचा प्रेमविवाह आहे. औरंगाबादच्या विद्यापीठात दोघांनी सोबत शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी दोघेही आक्रमक आंदोलन करायचे. एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या रूम जाळण्यात आल्या होत्या. त्या आरोपात काही आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडून नेले होते.
तेव्हा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी जयश्री यांनी केलेला संवाद पाहून गुणरत्न सदावर्ते त्यांच्या प्रेमात पडले अशी आठवण ते सांगतात. तेव्हा पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही वेगवेगळया आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत सुरूच आहे. त्यांच्यावर अनेकदा टिका झालीये पण ते काही मागे हटत नाहीत. आतासुद्धा गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे.
हे हि वाच भिडू :
- ST कर्मचारी बंगल्यात घुसले चप्पल व दगडफेक : नेमकं काय घडल सिल्व्हर ओकवर..?
- गुणरत्न सदावर्तेंच्या विलिनीकरणाच्या हट्टापायी एसटी डेपोतच….!
- संपात फूट पडली अनं मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली