फ्रेंच ब्रेकफास्ट सोडा, फ्रेंचांच्या अंघोळ न करण्याची हिस्ट्री सुद्धा लय डिपाय!

आपल्या मनुष्य जातीचा स्वभाव जन्मजातच आळशी आहे. या आळशीपणाची सुरुवात कुठून होते माहिताय का ? सकाळी सकाळी उठण्यापासूनच.. म्हणजे कसंय ना सकाळी उठा मग…मग थोडं पेंगा..मग परत अजून थोडं पेंगा आणि मग डोळे चोळत चोळत फायनली उठा.. उठल्या उठल्या आंघोळीसाठी पळा.. आणि जर वातावरणात गारठा असेल तर काही विचारूच नका.. अंघोळ करताना कापरं भरतयं…..हि सगळी उरस्फोड करताना नेहमी येणारा विचार म्हणजे

किती बरं झालं असतं जर अंघोळीची गोळी या जगात अस्तित्वात असती तर !

पण आपल्याकडं अंघोळीची गोळी असते बरं का ! फक्त अंघोळीची गोळीच नाहीतर मग कावळ्याची पण अंघोळ असते आपल्याकडे. थोडक्यात भराभर पाणी अंगावर ओतून घेणे, साबण न लावता होणाऱ्या जुजबी अंघोळीच्या प्रकारात हे प्रकार मोडतात.

आता याला लैच फॅन्सी करून सांगायचं म्हंटल तर याला फ्रेंच बाथ म्हणतात.

हा बाथ रोज घ्यायलाच पाहिजे असं काही नसतं. तसं बघायला गेलं तर फ्रेंच लोकांमध्ये रोजच्या रोज अंघोळ करायची पद्धत नसतेच. ते आपल्या भारतीयांपेक्षा आळशी असतात आंघोळीच्या बाबतीत. पण त्यांच्या या आळशीपणाला पण एक इतिहास आहे.

तुम्ही आम्ही फ्रेंच हा शब्द ऐकल्यावर काय आठवतो…तर रंगेल, गुलछबू पुरुष बाया, फ्रेंच वाइन, फ्रेंच परफ्यूम, फ्रेंच टोस्ट, फ्रेंच डोअर, शॅम्पेन, तसंच फ्रेंच बाथ..

हा बाथ म्हणजे गार नाहीतर मग कोमट पाण्याचे थोडे शॉवर्स घेऊन किंवा हात पाय तोंड धुऊन उग्र वासाचा परफ्युम फवारलं की, झाला फ्रेंच बाथ.

तर फ्रेंच बाथ हा शब्द अमेरिकन लोकांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस वापरायला सुरुवात केली. कारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत रोज अंघोळ करणं ही बहुतेक युरोपीयन लोकांना अनावश्यक बाब वाटत होती. त्यात आणि अमेरिकेत आलेला एखादा युरोपियन शेजारून गेला तर सेंटचा एकदम उग्र वास आला तर त्या व्यक्तीने ‘फ्रेंच बाथ घेतलेला दिसतोय’ असं म्हटलं जायचं. त्यातून या म्हणी प्रचलित झाल्या.

पण त्याआधी बहुतेक सर्व युरोपीयन देश आणि विशेषतः फ्रान्समध्ये तेरावे ते सतरावे शतक, अशी पाचशे वर्षे पाणी व पाण्याने स्नान करण्याची फार मोठी दहशत निर्माण झाली होती.

बाराव्या, तेराव्या शतकात तुर्की आणि अरबस्तानात धर्मयुद्ध पेटलं होत. त्यावेळी धर्मयुद्धांवरून परतणाऱ्या क्रुसेडर्सनी युरोपात असा समज पसरवला की, स्नानगृहातून संसर्गजन्य आजार आणि ब्लॅक डेथचा प्रसार होण्याचा धोका असतो. याचा परिणाम असा झाला की मध्ययुगीन काळात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्पेन इथं रोगराई पसरण्याच्या भीतीने लोक पाण्याचा संपर्क टाळू लागली.

त्यांना असं वाटत होतं की पाण्याने अंघोळ केली तर त्वचेच्या छिद्रांमधील मळ, धूळ निघून जाईल आणि छिद्रे मोकळी होतील. या छिद्रांद्वारे प्लेग किंवा इतर रोगांचे जंतू शरीरात जातील आणि रोगांचा फैलाव होईल. यामुळे पाण्याने अंघोळ करणं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक मानलं गेलं. लोकांनी अंघोळ करू नये असे फतवे काढण्यात आले. पाण्याच्या भीतीने सर्व युरोप आणि त्यातही फ्रान्स अधिकच पछाडला गेला.

यांच्या आंघोळीचे किस्से सांगावे तेवढे कमीच…!

  • यातूनच मग १६०१ सालात जन्मलेल्या तेराव्या लुईला तो सात वर्षांचा होईपर्यंत अंघोळच घातली नव्हती. लुईच्या अंघोळीचा विषय बरीच वर्षे राजघराण्यातील लोक, अमीर-उमराव यांच्या वर्तुळात चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला होता.
  • फ्रांझवाज प्रथम या फ्रेंच राजाने तर १५३८ मध्ये कायद्याने फ्रेंच स्नानगृहे बंद करायला लावली होती.
  • साऊथवार्कचा आठवा हेनरी याने १५४६ मध्ये पाण्यात शिजविलेले अन्न खाणे बंद केले.
  • सोळाव्या शतकात अंतर्वस्त्रे रोज बदलणे ही फ्रान्स व इटलीमध्ये एक फाजिल बाब समजण्यात येई.
  • गरम पाण्याने स्नान ही तर फार मोठी जोखमेची बाब समजली जाई.
  • फ्रान्सचा राजा चौथा हेनरी हा तर कायमच घाणेरडा मळ आणि घाम यांनी थबथबलेला असायचा. घोड्यांच्या तबेल्यात, गोठ्यात येतो तसा उग्र दर्प त्याला यायचा. त्याचा सरदार ड्युक डी सुली याने आंघोळ केल्याची बातमी हेनरीच्या कानावर आली तेव्हा हेनरीने भीतीने राजवैद्याकडे धाव घेतली. वैद्याने राजाला इशाला दिला की, तो अंघोळ करणारा सरदार आता या जगात काहीच दिवसांचा पाहुणा आहे. राजाने सरदारला हे सर्व कळवून त्याला घराबाहेर पडण्यास बंदी केली.
  • एकदा रशियन राजदूत राजा सोळावा लुईला भेटण्यासाठी गेला. राजदूताने पाठवलेल्या अहवालात लिहिले होते. लुईच्या अंगाला जंगली प्राण्यांसारखा दर्प येत होता. या सोळाव्या लुईने आयुष्यात फक्त दोनदाच अंघोळ केली होती.
  • इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम हिला तर पाण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे महिन्या-दोन महिन्यांतून एकदा ती अंघोळ करायची. तिचा वारस जेम्स प्रथम याने वर्षातून दोन, चार वेळाच स्नान केले. तो रोज फक्त तळहात आणि बोटेच धुवायचा.
  • फ्रान्सचा राजा चौदावा लुई याने व्हर्सायच्या राजवाड्यात मोठी थोरली स्नानगृहे बांधली होती. पाण्याने अंघोळ करणे आरोग्यास हानीकारक असल्यामुळे राजवाड्यातले सेवक राजाचे हातपाय आणि चेहरे अल्कोहोलने धुऊन देत.

अशाप्रकारे स्वच्छ अंघोळ न करता शरीराचा घाणेरडा दर्प लपविण्यासाठी अंगावर उग्र अशी सुगंधी द्रव्ये लावणे ही सर्वमान्य पद्धत फ्रान्समध्ये पाच शतके प्रचलित होती. पाण्याविषयी गैरसमज पुढे दूर झाल्यावरही कमी अधिक प्रमाणात स्नानाविषयीची उदासीनता फ्रेंच लोकांमध्ये राहिलीच. सध्याही दोन-चार दिवस अंघोळ न करता राहणे, ही सर्वसामान्य पद्धत फ्रान्समध्ये आहे. आणि त्यामुळेच सगळे महागडे परफ्यूम फ्रान्स मध्येच भेटतात.

 हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.