कधीही न बदललेल्या चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न.

आजच्या वर्तमानपत्रात एक ब्रेकिंग न्यूज दिसत आहे, महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा घाट घातला आहे.

दैनिक लोकसत्ता मधील बातमी नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून या  आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या वर्षी पर्यंत या संस्थेची वेगळी प्सुतके नव्हती मात्र यावर्षी त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम बनवला आणि या ऑगस्टमध्ये ती पुस्तके बालभारतीकडून छापूनही घेतली. पण त्यात चौथ्या वर्गातील पुस्तकांमध्ये शिवरायांच्या इतिहासाचा समावेश केलेला नाही.

बालभारतीच्या नेहमीच्या पुस्तकामध्ये मात्र हा इतिहास अजून तसाच आहे.

“श्री शिवछत्रपती” (परिसर अभ्यास भाग-२ ) इयत्ता चौथी.

हो तेच ते पुस्तक, ज्याने  शिवरायांच्या इतिहासाशी आपली पहिली ओळख करून दिली. त्या वयात या पुस्तकाने मनावरती शिवाजी महाराजांचं गारुड निर्माण केलं.

आपण दरवर्षी कुठल्यातरी वर्षाच्या कुठल्यातरी पाठ्यपुस्तकात झालेल्या बदलांच्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादविवादांच्या बातम्या ऐकतोच की पण तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की या आपल्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात मात्र गेल्या ४८ वर्षांमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता.

हे पुस्तक आजपर्यंत चौथीच्या अभ्यासक्रमात जशास तश्या स्वरुपात होते.

गेली जवळपास ४८ वर्षे हे पुस्तक अभ्यासक्रमात आहे. अशाप्रकारचं हे जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे, असा दावा जेष्ठ शिक्षणतज्ञ किशोर दरक यांनी आपल्या एका लेखात केला आहे. याबद्दल ची खात्री आम्ही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाशी बोलून केली. त्यावेळी आम्हाला उत्तर मिळालं की काही छोटेमोठे बदल सोडले तर पाठ्यपुस्तकाचा मूळ ढाचा गेली ४८ वर्षे आहे तसाच आहे.

पुस्तक अभ्यासक्रमात कधीपासून आहे..?

१९७० साली चौथीच्या अभ्यासक्रमात इतिहासाचं पुस्तक म्हणून या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. हे मूळ पुस्तक कोणी लिहिले, या पुस्तकातली चित्रे कोणी काढली याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्याकडे देखील नाही.

जीजाउंनी शिवबांना कसं घडवलं…? शिवरायांनी स्वराज्याचं तोरण कसं बांधलं..? शाहिस्तेखानाची फजिती, आगऱ्याहून सुटका हे सगळं आपल्यापैकी बहुतेकांना  आजही जसंच्या तसं आठवतं  असणार. ‘गड आला पण सिंह गेला’ हा धडा शिकताना अंगावर शहारे उभे राहायचे.

‘ज्यावेळी उदेभान आणि तानाजी लढत असतात आणि तानाजीची ढाल तुटते, तो तसाच हाताला शेला गुंडाळून लढू लागतो’

हा प्रसंग वाचताना आणि ऐकताना आपोआपच आपल्या मुठी आवळल्या जायच्या.

जेव्हा तानाजी पडतो तेव्हा धीर खचलेले मावळे पळून जाऊ लागतात.आणि मग सूर्याजी त्यांना म्हणतो, “तुमचा बाप असा इथे मरून पडला आहे आणि तुम्ही भागूबाई सारखे काय पळता…? मी दोर कापले आहेत. आता शत्रूवर तुटून पडा अथवा कड्यावरून उडी टाकून मरून जा” ते शब्द ऐकून मावळे परत फिरतात आणि पराक्रमाची शर्थ करून कोंढाणा सर करतात. तानाजी धारातीर्थी पडल्याची बातमी जेव्हा शिवरायांना समजते तेव्हा ते हळहळून उद्गारतात,

“गड आला पण सिंह गेला !”

SHIVAJI MAHARAJ
शिवाजी महाराज- अफजल खान भेट

हा प्रसंग आला की शिकणारी मूलंच काय तर शिकवणाऱ्या बाईंच्या ही डोळ्यात अश्रू उभे राहायचे. अफझल खानाची भेट, त्यात शिवरायांनी काढलेला खानाचा कोथळा, सय्यद बंडा आणि ‘होता जीव म्हणून वाचला शिवा’ हे सगळं  कधीच मनातून पुसलं जात नाही.

बाजी प्रभू देशपांडे ,नेताजी पासलकर,फिरंगोजी नरसाळे, मुरारबाजी या सगळ्यांची ओळखचं या पुस्तकाने झाली.  एवढेच नव्हे तर महाराष्ट्राची  ज्ञानोबांपासून ते तुकोबापर्यंतची संत परंपरा इथेच समजली.

फक्त पुस्तकच नाही तर पुस्तकाच्या मुखपृष्ठात देखील गेल्या ४८ वर्षात कसलाही बदल झालेला नाही. मुखपृष्ठावर असलेले अश्वारूढ शिवरायांचे चित्र देखील जशास तसे आहे.

पुस्तकाच्या आतील चित्रांमध्ये मात्र थोडाफार बदल करण्यात आलेला आहे.  त्या चित्रांमध्ये सफाईदारपणा आणण्यात आला आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार  पूर्वीची चित्रे भालजी पेंढारकरांच्या “छत्रपती शिवाजी” या प्रसिद्ध चित्रपटातून घेण्यात आलेली आहेत.

याचा अर्थ असा नाही की यापुस्तकाबद्दल वाद झाले नाहीत. पुस्तकामध्ये ४थीच्या मुलांच्या मानाने हिंसक भाषा वापरण्यात आली आहे किंवा आकारण काही ठिकाणी धार्मिक किंवा भाषिक अस्मितांचे उदात्तीकरण केले गेले आहे असे आक्षेप काही शिक्षणतज्ञ घेतात.

२००९ साली दादोजी कोंडदेव यांच्या चित्राबद्दल देखील वाद निर्माण झाला. या वादामुळे दादोजी कोंडदेवांचं चित्र बदलून त्या जागी शहाजी महाराजांचं चित्र वापरण्यात आलं.

त्यानंतर २०१६ साली काही प्रकरणे नव्याने समाविष्ट करण्यात आली. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये महाराजांच्या गडकोटाचे आणि आरमाराचे व्यवस्थापन कौशल्याची ओळख करून देण्यात आली आहे.

मात्र हे एखाद-दुसरे अपवाद वगळता या पुस्तकात इतर कुठलेच मोठे बदल करण्यात आलेले नसून गेल्या ४८ वर्षांत या पाठ्यपुस्तकाचा ढाचा आहे तसाच राहिला आहे त्यात काहीही बदल झालेला नाही.

कित्येक पिढ्या हा गौरवशाली इतिहास शिकत आहेत. कोट्यावधी मुलांच्या हृदयावर शिवाजी महाराज कोरण्याच काम या पुस्तकाने केलय आणि पुढेही करतच राहावं असच महाराष्ट्रातील जनतेचं म्हणण आहे.

पण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने यात बदल करायचा प्रयत्न केला आहे  आणि याबद्दल सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया ऐकावी लागत आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.