मिठाईच्या दुकानांची नावं ‘अग्रवाल स्वीट मार्ट’ असण्यामागंही मोठा इतिहास आहे
जगातले ट्रेंड्स एका क्लिकवर दाखवणाऱ्या, किमान शब्दांत कमाल भावना व्यक्त करायला लावणाऱ्या ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल नावाचा भारतीय माणूस बसला आणि ट्विटरच्या हेड ऑफिसला झाला नसेल इतका आनंद भारतीयांना झाला.
तसे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. त्यात काय नवं नाय. पण सारखं सारखं मिठाईच्या दुकानांच्या आणि सीए भिडूंच्या बोर्डावर दिसणारं नाव आता ट्विटरच्या एवढ्या मोठ्या पदावर दिसणार म्हणल्यावर जरा किलोभर जास्त आनंद होणं स्वाभाविक आहेच.
मिठाईच्या दुकानांवरून आठवलं, आपल्या आजूबाजूला, रोजच्या प्रवासात कुठंतरी अग्रवाल स्वीट मार्ट हे दुकान तुम्हाला फिक्स दिसलं असणार. बरं काही ठिकाणी अग्रवाल स्वीट मार्ट नावाची इतकी दुकानं असतात की, कुणाला फोनवर ‘भावा अग्रवाल स्वीट मार्टपाशी थांबलोय’ असं सांगितलं, तर समोरून प्रश्न प्रश्न येणार… ‘अरे कुठलं अग्रवाल स्वीट मार्ट ?’
आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, की भिडू मिठाईच्या बऱ्याच दुकानांना अग्रवाल हेच नाव का असतं? या सगळ्याचा मालक एकच आहे का? अग्रवाल लोकांनी आपलं बस्तान कसं काय बसवलं?
तर या मागे पार महाभारतापासूनचा इतिहास आहे…
असं म्हणतात जगात जेवढे अग्रवाल, अगरवाल, अग्रेवाल, अगरवाला आहेत, ते सगळे अग्रसेन महाराजांचे वंशज आहेत. महाभारताच्या काळात असलेल्या अग्रसेन महाराज यांना प्रभू रामाचा वारसा असल्याचं मानलं जातं. अग्रोह या व्यापाऱ्यांच्या शहराचे ते राजे होते. हरियाणाच्या जवळ त्यांनी अग्रोह शहर वसवलं होतं. सूर्यवंशीय अग्रसेन राजांनी वणिका धर्म स्विकारला होता. त्यांच्या काळात व्यापाराला चालना मिळाली असं म्हणलं जातं.
अग्रसेन महाराजांना अग्रवाल घराण्याचं कुलपुरुष म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं अग्रवाल हा शब्दाचा शब्दश: अर्थ अग्रसेन महाराजांची मुलं असा होतो.
साधारण १३५४ च्या सुमारास, भारतावर मुघलांचं आक्रमण झालं. फिरोझ शाह तुघलकनं अग्रोह शहराजवळ नवं शहर बसवायचा घाट घातला, त्याला नाव देण्यात आलं ‘हिसार-ए-फिरोझा.’ पुढं हिसार हेच नाव प्रचलित झालं. त्याच हिसारमध्ये मोठ्या प्रमाणावर अग्रवाल कुटुंब राहत होती.
पुढं देशातल्या मोठ्या भागावर मुघलांनी वर्चस्व वसवलं. मुघलांच्या काळात अग्रवालांची चांगलीच प्रगती झाली. त्यातले अनेक जण बांधकामातले कुशल कारागीर म्हणून काम करू लागले, तर अनेकांनी हलवाई म्हणून काम करायला सुरुवात केली. मुघलांची सत्ता गेल्यानंतर, देशात ब्रिटिशांची सत्ता आली. या सत्तांतरा दरम्यान, अनेक अग्रवाल कुटुंब बिहार आणि कोलकात्यामध्ये स्थायिक झाले.
क्रांतिकारकांनी १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. अग्रवाल समाजातल्या रामजी दास गुरवाला यांनी या लढ्याला आर्थिक मदत करण्यासाठी कर्जही घेतले आणि सोबतच आपल्या जवळचे पैसे दानही केले. त्यांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीमुळं ब्रिटिशांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
पुढे अग्रवाल समाज देशाच्या अनेक भागांमध्ये विस्तारला. अनेकजण बॉर्डरपार सिंधू आणि पंजाबमध्येही स्थायिक झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अग्रवाल समाजानं पुढे अनेक व्यवसायांमध्ये मुहूर्तमेढ रोवली.
पारंपारिक कारागीरी काहीशी मागे पडली असली, तरी स्वयंपाककलेचा हात त्यांनी सोडला नाही. त्यामुळं आजही त्यांची देशभरात बरीच हलवाई दुकानं आहेत. त्यामुळंच त्यांची नावं ‘अग्रवाल स्वीट मार्ट’ अशी असतात.
मिठाईसोबतच सामोसे, जिलेब्या आणि बरंच सामान घ्यायला आपण हलवायाच्या दुकानात जातो, तेव्हा तिथं मिठाई बनवणाऱ्या ‘टिपिकल महाराज’सोबत अग्रसेन महाराजांचा फोटोही आपल्याला दिसतो.
आता अग्रवाल म्हणले की, फक्त हलवायाचंच काम करतात असं अजिबात वाटू देऊ नका. आपल्या आजूबाजूला अनेक अग्रवाल सीए आहेत, मयांक अग्रवाल तर भारतासाठी क्रिकेट खेळतो, ज्येष्ठ नेते ओम प्रकाश जिंदाल यांनीही भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. पराग अग्रवाल हे या लिस्टमधली लेटेस्ट ॲडिशन आहेत आणि आता अशी लिस्ट देत बसलो तर शप्पथ लय नावं होतील.
एका गोष्टीची मात्र दाद द्यायला हवी, गेली कित्येक वर्ष स्वीट मार्टचं मार्केट सांभाळणाऱ्या अग्रवालांनी कित्येक संकटांचा, मंदीचा सामना केला असेल. पण त्यांच्या मिठाईचा गोडवा आणि मनातली जिद्द अजिबात कमी झालेली नाही.
हे ही वाच भिडू:
- एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज इंग्रजांच्या रेल्वेमुळे देशोधडीला लागला.
- पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे
- कॉलर ताठ करा, सगळं जग वापरतंय त्या फोटोशॉपचा CEO पण भारतीयच आहे