अकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शहरांची नावे बदलण्याचा ठेका आपल्याकडे घेत त्यांचे वारसदार समजल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तरप्रदेशमधील इलाहाबादचं नामकरण ‘प्रयागराज’ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीये. त्यामुळे यापुढे इलाहाबाद आता प्रयागराज म्हणून ओळखले जाईल.

इलाहाबादचं नामकरण प्रयागराज करण्याविषयी साधू-संत आणि आखाडा परिषदेकडून आलेल्या प्रस्तावनंतर हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

‘इलाहाबाद’ या नावापूर्वी शहराचं नाव काय होतं..?

अनेक अभ्यासकांच्या मते धार्मिक ग्रंथांमध्ये या शहराचं नाव प्रयाग किंवा प्रयागराज असंच होतं. पौराणिक आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाने ब्रम्हांडाला वाचविण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी यज्ञ केला होता. त्यामुळे या ठिकाणाला प्रयाग असं नाव मिळालं होतं. ब्रह्मदेवाच्या या मान्यतेमुळे हिंदू धर्मात प्रयाग क्षेत्राला आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे.

अनेक साधुंताचा आणि महंतांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो आणि ते या शहराचा प्रयाग किंवा प्रयागराज म्हणूनच उल्लेख करतात. शहराच्या नजीकच्याच असणाऱ्या एका रेल्वे स्थानकाला देखील प्रयाग असंच नाव आहे.

शहराचं नाव कुणी व का बदललं होतं..?

मोगलकालीन ऐतिहासिक पुस्तके आणि अकबरनामा या ग्रंथानुसार अकबर बादशहाने १५७४ साली प्रयागमध्ये एक किल्ला बांधायला घेतला आणि त्याने संपूर्ण नवीन शहराची निर्मिती केली. नव्याने वसविण्यात आलेल्या या शहराला १५८३ साली अकबर बादशहा द्वारे चालविण्यात येत असलेल्या ‘दीन-ए-इलाही’ या संप्रदायाच्या नावावरून इलाहाबाद हे नाव देण्यात आले.

आजचं अस्तित्वातील इलाहाबाद आणि पौराणिक प्रयाग एकच आहेत का..?

इलाहाबाद विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असणाऱ्या हेरंब चतुर्वेदी यांच्या मते आजचं इलाहाबाद आणि प्रयाग हे वेगवेगळे आहेत. दोहोंचंही वेगळं अस्तित्व आहे. प्रयाग क्षेत्राचं भौगोलिक क्षेत्र अतिशय मर्यादित आहे.

“अकबराने जर गंगा आणि  यमुना नदीच्या किनाऱ्यावर बांध घालून नवीन शहराची निर्मिती केली नसती, तर आज इलाहाबाद शहर अस्तित्वातच नसतं” प्रा.चतुर्वेदी सांगतात.

प्रयाग क्षेत्राचं वेगळं अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे तसंच राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या इलाहाबादची वेगळी ओळख आहे. जगभरात या शहराची ओळख इलाहाबाद अशीच आहे. भारतातील अनेक महत्वाचे राजकारणी आणि साहित्यिक या शहरातून येतात.

मार्कंडेय काटजू यांची नामांतरासंबंधीची फेसबुक पोस्ट व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि इलाहाबादचे रहिवासी मार्कंडेय काटजू यांनी या नामकरणावर व्यंगात्मक टीका करत उत्तर प्रदेशमधील इतर १८ शहरांची नावे बदलण्यचा सल्ला त्यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलाय. काटजू हे फक्त सल्ला देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी या १८ शहरांसाठी नावं देखील सुचवलीत. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास फैजाबादसाठी नरेंद्रनगर आणि फतेहपुरसाठी अमित शाह नगर.

हे ही वाच भिडू

 

1 Comment
  1. Nilesh says

    Too much good n very interesting

Leave A Reply

Your email address will not be published.