भारतमाता नेमकी होती तरी कशी… समजून घ्या.. विचार करा…

भारतमातेचा फोटो आज आपल्याला जसा दिसतो तो पूर्वीपासूनच तसा नव्हता. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघता हा फोटो अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर आलेला बघायला मिळतो.

भारतमातेचा सर्वात पहिला फोटो १९०५ च्या स्वदेशी आंदोलनादरम्यान आपल्यासमोर येतो. रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे अवनिन्द्रनाथ टागोर यांच्या पेंटिंगमधून भगव्या वस्त्रातील भारतमाता  आपल्या समोर येते.

हा तोच फोटो होता, ज्याने स्वातंत्र्यसंग्रामातील लोकांना प्रेरित करण्याचं काम केलं होतं. ‘स्पिरीट ऑफ मदर इंडिया’ या शीर्षकाखाली ज्यावेळी सर्वप्रथम हा फोटो छापण्यात आला त्यावेळी अवनिन्द्रनाथ टागोरांनी त्याला ‘बंग माता’ असं नांव दिलं होतं, जे पुढे बदलून भारतमाता असं करण्यात आलं.

Screenshot 2022 11 03 at 5.55.56 PM

 

या फोटोतील भारतमातेला ४ हात आहेत आणि त्यात कुठलाही झेंडा किंवा शस्त्र नाही. फोटोमधील भारतमातेच्या ४ हातांमध्ये असलेल्या गोष्टींकडे बघून टागोरांनी स्वातंत्र्यभारतातील लोकांच्या संपन्नतेसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या ३ मुलभूत गरजांच्या परिपूर्तीचीच अपेक्षा व्यक्त  केलेली बघायला मिळते.

abanindranath tagore
अवनिन्द्रनाथ टागोर

असं सांगण्यात येतं की,

अवनिन्द्रनाथ टागोरांना भारतमातेचं हे पेंटिंग बनविण्याची प्रेरणा बकिमचंद्र चॅटर्जी यांच्याकडून मिळाली. कारण देशासाठी माता हा शब्द सर्वप्रथम बकिमचंद्रांनीच आपल्या १८८२ साली प्रकाशित ‘आनंदमठ’ या कादंबरीत वापरला होता.

१९०५ साली ज्यावेळी ब्रिटिशांनी धार्मिक धृविकरणाचा अजेंडा समोर ठेऊन भारतीय समाजात ‘हिंदू-मुस्लीम’ अशी फुट पाडण्यासाठी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ‘वंदे मातरम’ याच शब्दाने लोकांना जोडून ठेवण्याचं काम केलं. हाच शब्द पुढे स्वातंत्र्यचळवळीतील लोकांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवत राहिला आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढण्यासाठीची प्रेरणा लोकांना त्यातून मिळाली.

देशाला मातेच्या स्वरुपात चित्रित करण्याची कल्पना अवनिन्द्रनाथ टागोरांना यातूनच मिळाली आणि त्यांनी भारतमातेचं पहिलं पेंटिंग साकारलं.

भारतमातेच्या या फोटोचा  देशभरात प्रसार करण्यात भगिनी निवेदिता यांचं देखील मोठं योगदान आहे. त्यांनीच ‘मॉडर्न रीव्हीव्ह’या नियतकालिकात या पेंटिंगच्या सामर्थ्याविषयी लिहिलं. त्यांच्याच प्रयत्नातून भारतमाता देशभरातील वेगवेगळ्या भागात पोहोचली.

१९०५ साली बंगालमध्ये अवनिन्द्रनाथांनी काढलेलं पेंटिंग १९०७ येता-येता दक्षिण भारतात पोहोचलं होतं आणि महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी आपल्या वर्तमानपत्रात भारतमातेचा फोटो छापला होता.

या फोटोमध्ये ‘हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई’ या सर्वच भारतीय धर्मातील लोक भारतमातेला वंदन करत असताना दाखवण्यात आलेलं आहे.

 भारती यांनीच छापलेल्या भारतमातेच्या एका फोटोवर त्यांनी हिंदीत ‘वंदे मातरम’ आणि उर्दूमध्ये ‘अल्लाहू अकबर’ असं लिहिलंय. याच सुब्रामण्यम भारती यांनी १९११ साली भारतमातेचा पुतळा बनविण्यासाठी देखील प्रयत्न केला होता.

bharatmata 2
सुब्रमण्यम भारती यांनी छापलेलं भारतमातेचं चित्र

भारतमातेच्या फोटोचा जसा प्रसार झाला तसा देशभरात या नावाने वेगवेगळ्या संघटना उदयास येऊ लागल्या. पंजाबमध्ये ‘भारतमाता सोसायटी’ आणि मद्रासमध्ये ‘भारतमाता असोसिएशन’ सारख्या संघटना स्थापन झाल्या.

पुढे १९१८ साली महात्मा गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल आणि अब्दुल गफार खान यांच्या उपस्थितीत बनारसमध्ये भारतमातेच्या मंदिराचं उद्घाटन केलं. भारतमातेचं चित्र आणि सोबत ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देशभरातील आंदोलकांची  विरोध प्रदर्शने आणि मोर्चांमधील मुख्य भाग बनली.

देशभरातील  वेगवेगळ्या भागातील भारतमातेच्या प्रसारानुसार  तेथील स्थानिक गोष्टींना आणि प्रतीकांना या फोटोमध्ये स्थान मिळायला लागलं. अनेक संस्था आणि संघटनांनी आपापल्या सोयीनुसार त्यात बदल करून घेतले.

त्यामुळेच आपल्याला आज भारतमाता वेगवेगळ्या स्वरुपात बघायला मिळते. परंतु भारतमातेचं अवनिन्द्रनाथ टागोरांनी पेंट केलेलं जे मूळ पेंटिंग आहे, ते मात्र आजदेखील कोलकात्यातील ‘रवींद्र भारती सोसायटी’मध्ये संग्रहित ठेवण्यात आलेलं आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.