महाविकास आघाडीची ही चौथी पोटनिवडणूक, पहिल्या तीन निवडणुकांचा स्कोअर १-२ आहे…

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. ३ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडेल.

पण या निवडणुकीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कारण याच निवडणुकीच्या निमित्तानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं, शिवसेना हे नाव वापरण्याची परवानगीही दोन्ही गटांना नाकारण्यात आली. दोन्ही गटांना नवं नाव आणि नवं चिन्ह मिळालं. त्यात रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन झालेला वादही अगदी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.

उच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानं ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, मात्र त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार की शिंदे गट हे अजूनही निश्चित झालेलं नाही.

या सगळ्यात हे लक्षात घ्यायला हवं की हा सामना फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती असा न होता, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा होणार आहे. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं या निवडणुकीत ठाकरे गटाच्या पाठीशी उभे राहत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणूका आणि लांब असल्या तरी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीसाठीही सरकारमध्ये नसतानाची लिटमस टेस्ट म्हणून ही पोटनिवडणूक गेमचेंजर ठरु शकते.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, तेव्हापासून राज्यात लागलेली ही चौथी विधानसभा पोटनिवडणूक. या आधीच्या पोटनिवडणुकांमध्ये नेमकं काय झालं ? कुणी कशाच्या जीवावर बाजी मारली ? तेच पाहू.

पहिली पोटनिवडणूक झाली, पंढरपूर मतदारसंघात

२०२० मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भरत भेलके यांच्या निधनानंतर इथली जागा रिक्त झाली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावरची ही पहिलीच पोटनिवडणूक. राष्ट्रवादीनं इथं भरत भेलके यांचे पुत्र भगीरथ भेलके यांना उमेदवारी दिली. आमदाराच्या निधनानंतर सहसा पोटनिवडणूक बिनविरोध होते, मात्र इथं असं झालं नाही. भाजपनं आपला उमेदवार उतरवत हा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यांनी समाधान आवताडे यांच्या रूपात स्थानिक उमेदवार दिला.

महाविकास आघाडी एकत्र असल्यानं शिवसेनेला या जागेवर राष्ट्रवादीला पाठिंबा देणं गरजेचं होतं. मात्र शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी केली. गुलाबराव पाटील सोडून शिवसेनेचे इतर कुणीही मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले नाहीत. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांनी ताकद लावली, पण महाविकास आघाडीचा समन्वय दिसून आला नाही.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे प्रचार केला आणि समाधान आवताडे यांनी ४ हजारांच्या फरकानं निसटता का होईना पण विजय मिळवला. स्कोअर झाला १-०.

दुसरी पोटनिवडणूक झाली, देगलूर मतदारसंघात

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. काँग्रेसनं या निवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. मात्र विषय असा होता की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. याच सुभाष साबणेंनी पोटनिवडणुकीवेळी बंडखोरी केली आणि भाजपकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळं पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना रंगला.

मात्र पंढरपूरप्रमाणं इथंही महाविकास आघाडीची एकी दिसून आली नाही. शिवसेनेकडून कोणताही मोठा नेता प्रचारात उतरला नाही, तर राष्ट्रवादीकडूनही फारशी ताकद लावली नाही. 

मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली. त्यांनी संपूर्ण ताकद लावली आणि जितेश अंतापूरकर जवळपास ४२ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले. स्कोअर झाला १-१ .

तिसरी पोटनिवडणूक झाली, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यामुळं या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा ज्या पक्षाचा आमदार आहे, त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. इथं गोम अशी होती की, याच मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर दोन टर्म आमदार राहिलेले. त्यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करुन दाखवली. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती.

त्यामुळं जे पंढरपूर आणि देगलूरमध्ये झालं, तेच बंडखोरीमुळं इथंही होणार का अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र उद्धव ठाकरेंनी राजेश क्षीरसागर यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. त्यांची नाराजी दूर करत जयश्री जाधव यांना पाठिंबा देण्याचे आदेशही दिले.

 यानंतर राजेश क्षीरसागर जयश्री जाधव यांच्या प्रचारातही सक्रिय झाले. स्थानिक ताकदीसोबतच वरुण सरदेसाई, उदय सामंत या शिवसेना नेत्यांनी प्रचारात भाग घेतला. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची सभा झाली, तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, अमित देशमुख आणि सचिन सावंत यांनी बंटी पाटील यांना पूर्णपणे साथ देत जोरदार प्रचार केला.

या एकत्रित प्रचाराचा फायदा झाला आणि जयश्री जाधव यांना ९६ हजार ४९२ मतं मिळाली, तर सत्यजित कदम यांना ७७ हजार ६४५ मतांवर समाधान मानावं लागलं. साहजिकच महाविकास आघाडीचा हा कोल्हापूर पॅटर्न हिट ठरला आणि स्कोअर झाला २-१.

आता चौथी निवडणूक असेल, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची

ठरल्यानुसार ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. पण शिवसेनेत झालेलं बंड आणि दोन गटांमुळे ठाकरे गटाची पूर्वीसारखीच ताकद असेल का ? यावर प्रश्न उपस्थित होतो. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष मुरजी पटेल यांनी रमेश लटकेंना चांगली लढत दिली होती. आता हे मुरजी पटेल भाजपकडून उभे राहतील अशी चर्चा आहे, तर भाजप शिंदे गटासाठी ही जागा सोडेल अशीही चर्चा आहे. त्यामुळं ऋतुजा लटकेंच्या विरुद्ध नेमकं कोण उभं राहणार हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही.

ठाकरे गटाला आपलं नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि लोकांवर ठसवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात शिंदे गटाकडून उमेदवार उभा करण्यात आला, तर आव्हान आणखी कठीण असेल.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहेच. सोबतच या मतदारसंघात असलेली काँग्रेसची ताकद पाहता त्यांची मतं आपल्याकडे वळवण्यात ठाकरे गट किती यशस्वी ठरणार आणि बदललेली राजकीय समीकरणं लक्षात घेता तिन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात दिसणार का ? हे या पोटनिवडणुकांच्या निमित्तानं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजवरच्या ३ लढायांमधला सामना भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा होता, मात्र या चौथ्या पोटनिवडणुकीत भाजपलाही नवा मित्र मिळालाय. त्यामुळं २-१ असलेला स्कोअर लेव्हल होणार की महाविकास आघाडीची आघाडी वाढणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.