५० वर्ष जुनी मागणी पूर्ण झाली अन् मुंबई ला चेन्नईशी जोडणारी चेन्नई एक्सप्रेस धावू लागली

चेन्नई अई अई अई… चेन्नई एक्सप्रेस, गेट ऑन दी ट्रेन बेबी…

आठवलं का एसआरके आणि दीपिकाचा सुपरहिट सिनेमा चेन्नई एक्सप्रेस. २०१३ मध्ये आलेल्या या सिनेमाने काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना वेड लावलं होतं. या सिनेमाला ९ वर्ष झालीत तरी सुद्धा हा सिनेमा आजही नुकताच रिलीज झाला असा वाटतो. 

हा सिनेमा जरी आजही नवीनच वाटत असला तरी ज्या ट्रेनवर हा सिनेमा बनवण्यात आलाय ती चेन्नई एक्सप्रेस यंदा १०१ वर्षांची झालीय. 

या १०१ वर्षांच्या इतिहासात या एक्सप्रेसने निव्वळ प्रवाशांची वाहतूकच केली नाही तर बॉम्बेला मुंबई आणि मद्रासला चेन्नई होतांना पाहिलाय. देशातील पहिल्यावहिल्या लांब टप्यांवर धावणाऱ्या एक्सप्रेसपैकी एक असलेल्या या चेन्नई एक्सप्रेसचा सुद्धा स्वतःचा असा इतिहास आहे.

तर बाकी ऐतिहासिक एक्सप्रेस प्रमाणेच चेन्नई एक्सप्रेसचा किस्सा सुद्धा लॉर्ड साहेबांशी म्हणजेच ब्रिटिशांशी जुळला आहे.

१८५० च्या दशकात भारतात मुंबई ते ठाणे अशी पहिली पॅसेंजर रेल्वे धावली आणि देशात रेल्वेला सुरुवात झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी अख्या भारतभर रेल्वेचं जाळं विणायला सुरुवात केली. या जाळ्यामध्ये भारतातील तीन सर्वात महत्वाची शहरं, म्हणजेच बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या तीनही शहरांना रेल्वेच्या नेटवर्कने जोडण्यास सुरुवात करण्यात आली. 

यात सगळ्यात आधी बॉम्बे आणि मद्रास या दोन शहरांना जोडण्याची योजना बनवण्यात आली. १८५८ मध्ये राणीचा जाहीरनामा आला आणि त्याच वर्षी या रेल्वे रुटचं नारळ फोडण्यात आलं. स्टेप बाय स्टेप जात १३ वर्षांनी म्हणजेच १८७१ मध्ये हे रेल्वे रूट बांधून पूर्ण झालं. 

दोन शहरांना जोडणारा रूट पूर्ण झाला होता परंतु दोन शहरांना जोडणारी रेल्वे काही या मार्गावर सुरु झालेली नव्हती. 

काही रेल्वे बॉम्बे पासून सुरु व्हायच्या पण काही स्टेशनांतर परत यायच्या. तसंच मद्रास वरून सुद्धा रेल्वे सुटायच्या पण बॉम्बेला पोहोचण्याआधी मधनच परत जायच्या. बॉम्बे वरून मद्रास ला जाणारा असो की मद्रास वरून बॉम्बेला जाणारा व्यक्ती असो, दोघांनाही सलग प्रवास करता येत नव्हता. यावरच उपाय म्हणून बॉम्बे आणि मद्रासला जोडणारी एक एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी करण्यात येऊ लागली, पण हा प्रस्ताव बरीच वर्ष अडकून पडला होता. 

अखेर रूट तयार झाल्याच्या ५० वर्षांनंतर, १९२१ सालात बॉम्बे मद्रास फास्ट पॅसेंजर सुरु झाली. 

दोन महानगरांना जपडणारी ही एक्सप्रेस सुरुवातीला कोळशावर चालणारी स्टीम इंजिनची एक छोटीशी अगीनगाडी सुरु झाली. झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी म्हणत ही गाडी दोन्ही शहरातील फार थोडक्या स्टॉप वर थांबायची. या ट्रेनचे स्टॉप कमी असल्यामुळे फास्ट पॅसेंजरला एक्सप्रेस बनवण्याची मागणी करण्यात येऊ लागली. 

जनता जनार्दन की जय म्हणत ही मागणी सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात आली आणि १९३० मध्ये फास्ट पॅसेंजरचं एक्सप्रेस मध्ये रूपांतर करण्यात आलं. सुरुवातीला कोळशाच्या स्टीम इंजिनवर चालणारी ही एक्सप्रेस हळूहळू डिझेलवर चालायला लागली. तर सध्या ही एक्सप्रेस विजेवर चालत आहे. 

जेव्हा देशात चार अंकी नंबरच्या गाड्या चालायला लागल्या तेव्हा १०४१ आणि १०४२ या दोन्ही ट्रेनला चेन्नई एक्सप्रेस बनवण्यात आलं. तर २०२० मध्ये देशात पाच अंकी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या तेव्हा या एक्सप्रेसचं नंबर २२१५९ आणि २२१६० करण्यात आलं. 

मुंबईतून निघालेली ही ट्रेन महाराष्ट्रातील महत्वाच्या स्टॉपवर थांबते. 

मुंबईच्या सीएसएमटी वरून एक्सप्रेस निघाल्यावर दादर, कल्याण, लोणावळा, खडकी, पुणे, दौंड, कुर्दवाडी आणि सोलापूर जंक्शन ओलांडल्यानंतर कर्नाटकच्या कलबुर्गी स्टेशनवर पोहोचते. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक महत्वाच्या स्टेशनला जोडत एक्सप्रेस चेन्नईच्या एमजीआर चेन्नई सेंट्रलवर जाऊन थांबते. 

सुरुवातीला फार थोडेसे डब्बे असलेल्या या ट्रेनमध्ये सध्या १८ डब्बे आहेत. सुरुवातीला साधे डब्बे असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आज एसी टू टियरचा एक डब्बा, एसी थ्री टियरचे चार डब्बे, स्लीपर कलासचे ८ डब्बे, जनरलची दोन डब्बे आणि रेल्वे मेल सर्विसचा एक डब्बा असतो. बॉम्बे आणि मद्रासला जोडणारी ही एक्सप्रेस आज या दोन शहरांना जोडणारीच नाहीत तर काश्मीर ते कन्याकुमारी अशा भारताच्या दोन टोकांना जोडण्याचा आदर्श ठरली आहे. 

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.