जगातला पहिला आतंरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा असा रंगला होता

क्रिकेटमध्ये दोन-तीन तासात स्पर्धेचा निकाल ठरवणारी टी – ट्वेंन्टी स्पर्धा, एका दिवसात जग्गज्जेता बनवणारी वन-डे आणि खेळाडूंची पाच दिवस परिक्षा बघणारी टेस्ट मॅच. अशा हल्लीच्या क्रिकेटचे स्वरुप झालं आहे.

पण हे स्वरुप आधीपासूनच असं होत का? तर नाही.

क्रिकेट या खेळाला आत्ताच्या स्वरुपात येण्यासाठी अनेक वर्षांच्या स्थित्यंतरामधून जावं लागलं आहे.

बहुतेक इतिहासकार आणि संशोधकांनी यांचे एकमत आहे की क्रिकेट या खेळाचा उदय कदाचित सॅक्सन किंवा नॉर्मन यांच्या काळात झाला असावा. तज्ज्ञांच्या मते,

१६ व्या शतकाच्या शेवटामध्ये दक्षिण-पूर्वेकडील इंग्लंडच्या भागातील वेल्ड प्रदेशात दाट जंगलातील जागा साफ करुन काही लहान मुलांनी मिळून या खेळाचा शोध लावला.

पुढे १७ व्या शतकात क्रिकेटला प्रामुख्याने मुलांचा खेळ मान्यता मिळाली.

क्रिकेट हा खेळ जरी इंग्लंडने शोधला असला तरी ही त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्सच्या फ्रेंच भाषेतुन आला आहे.

१७ व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात मोठ्या माणसांनी क्रिकेटची बॅट हातात धरायला सुरुवात केली.

मोठ्या माणसांनी साधारण १६११ मध्ये पहिली मॅच खेळल्याचा संदर्भ सापडतो. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या एका शब्दकोशात याला मुलांचा खेळ म्हणून मान्यता दिली. सुरुवातीपासूनच या खेळाला इंग्लंडमध्ये डोक्यावर घेतल्याचे दिसते.

१६११ मध्ये चर्चमध्ये जाण्याऐवजी क्रिकेट खेळायला गेल्याने दोघा जणांविरुद्ध खटला चालला होता.

१६४२ मध्ये इंग्लंडमधील गृहयुद्धाला सुरुवात होईपर्यंत क्रिकेटविषयी अनेक नोंदवह्यांमध्ये संदर्भ सापडतात. हे देखील सिद्ध करतात की अवघ्या थोडक्या वर्षात क्रिकेट एक अत्यंत लोकप्रिय खेळ बनला होता आणि खेड्यातील स्थानिक रहिवाश्यांनी याच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यास सुरुवात केली होती.

१६४६ साली केंटमधील कॉक्सहीथ येथे क्रिकेट सामना झाल्याचा पहिला उल्लेख सापडतो

१६४८ मध्ये गृहयुद्ध संपल्यानंतर नवीन प्युरिटन सरकारने बेकादाशीर रित्या सभागृह बरखास्त केली. आणि सोबतच फुटबॉल, रग्बी आणि इतर खेळांवर कडक बंदी घातली. आणि शब्बाथ (विश्रांतीचा दिवस) पाळण्यास भाग पाडले. त्यामुळे १७ व्या शतकाच्या मध्यात क्रिकेटचे वेड थोडेफार कमी झाले.

१६६० मध्ये परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर शाळांमध्ये ही क्रिकेटची सुरुवात झाली. विषेशतः विंचेस्टर स्कूल आणि सेंट पॉल स्कूल. यामुळे खेड्यात असणारा क्रिकेट खेळ शहरी भागात रुजायला सुरुवात झाली. श्रीमंत लोकांनी यात भाग घ्यायला सुरुवात केली. खेळाने पुन्हा लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली.

१७ व्या शतकाच्या अखेरीस बेटिंगची सुरुवात.

एखादी गोष्ट एकदा का लोकप्रिय झाली की लोक त्यातुन आणखी वेगळं शोधतात त्याच प्रमाणे लोकांनी यावर अधिकृत रित्या जुगार खेळण्यास चालू केला. आणि इथेच सुरुवात झाली क्रिकेट बेटिंगची. १६९६ मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य दिले गेले तेव्हा तेथील वृत्तपत्रांमधून क्रिकेटचे वार्तांकन चालू झाले. 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत या वार्तांकनाची जागा बेटिंगच्या वार्तांकनाने घेतली.

१८ व्या शतकात क्रिकेटमध्ये अनेक सुधारणा :

१७०६ साली केंब्रिजच्या विल्यम गोल्डविनने एक लॅटिन कविता लिहिली, तीत क्रिकेट सामन्याचे संपूर्ण वर्णन दिले आहे. चेंडूफळीच्या अपरिपक्क खेळास क्रिकेटचे सुविहित स्वरूप देण्याचे प्रयत्न अठराव्या शतकात पहिल्यांदाच झाले. १७१० पासून केंब्रिज विद्यापीठात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

१८ जून १७४४ रोजी केंट व ऑल इंग्‍लंड असा सामना झाला. त्याचे संपूर्ण धावपत्रक उपलब्ध आहे. १७८७ मध्ये ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’ची स्थापना झाली. या संस्थेने क्रिकेटच्या नियमावलीत सुधारणा घडवून आणल्या.

१९ व्या शतकात क्रिकेटमध्ये सुधारणांची सुरुवात झाली.

१८३९ पासून मॉडर्न काऊंटी क्लब्सना सुरुवात झाली. इंग्लंड-इलेव्हन नावाचं पहिलं “आंतरराष्ट्रीय चमू” इंग्लंडचे क्रिकेटर आणि संघ व्यवस्थापक विल्यम क्लार्क यांनी तयार केला होता.

आंतरराष्ट्रीय सामने १९ व्या शतकातच सुरू झाले. पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात १८४४ मध्ये खेळला गेला. १८७७ मध्ये इंग्लंडने दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन संघांविरुध्द सामने खेळले. हेच सामने आता कसोटी सामने म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तणावपूर्ण स्पर्धेमुळे अ‍ॅशेसला वेग आला.

इंग्लंड बाहेरील क्रिकेट :

इंग्लंडमधील व्यापारी १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर व्यापारासाठी बाहेर पडू लागले. ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका इथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. आणि सोबत येताना त्यांनी क्रिकेटही आणले. ब्रिटीश सैनिक आणि अधिकारी यांच्यामुळे हा खेळ वसाहतींमध्येही पसरला.

१८३२ सालापासूनच तेथे क्रिकेटचे क्लब स्थापन होऊ लागले, त्या वर्षी ‘होबार्ट टाउन क्लब’ हा ऑस्ट्रेलियातील पहिला क्लब अस्तित्त्वात आला आणि १८३८ साली ‘मेलबर्न क्रिकेट क्लब’ ची स्थापना झाली. १८५६ साली मेलबर्न येथे व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स ह्या संघांत पहिला अधिकृत सामना खेळला गेला.

ब्रिटिश फौजांबरोबर वेस्ट इंडीज बेटांतही हा खेळ गेला. १८४२ च्या सुमारास त्रिनिदाद बेटात पहिला क्रिकेट क्लब स्थापन झाला. १८४० पासून न्यूझीलंडमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. डनीडन व वेलिंग्टन येथे १८४८ मध्ये पहिल्या क्रिकेट संस्था स्थापन झाल्या आणि १८६० साली वेलिंग्टन व ऑक्लंड ह्या दोन संघांत न्यूझीलंडमधील पहिला प्रतिनिधिक सामना खेळला गेला.

भारतातील क्रिकेट :

ब्रिटिश फौजेतील सैनिक करमणूक म्हणून क्रिकेट खेळत. गुजरात येथील खेडा विभागातील खंबायत संस्थानात १७२१ साली ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी क्रिकेट खेळत असल्याचा उल्लेख सापडतो. १७९२ साली कोलकाता क्रिकेट क्लबची स्थापना झाली. जगातील सर्वांत जुना असा हा दुसरा क्रिकेट क्लब. याच दरम्यान कलकत्ता क्रिकेट क्लबचा बरॅकपूर व डमडम बरोबर सामना झाला.

भारतात १८६६ साली हिंदूंनी व १८८३ साली मुस्लिम सामाजानी आपले स्वतःचे क्रिकेट क्लब स्थापन केले. पारशी समुदायाने १८८६ व १८८८ साली आपले संघ इंग्‍लंडच्या दौऱ्यावर धाडले. भारताबाहेर जाणारे हे पहिलेच संघ होत. भारताच्या दौऱ्यावर १८८९ आणि १८९२ मध्ये दोन इंग्‍लिश संघ येऊन गेले.

१८९२ च्या वर्षीपासून क्रिकेटची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा पहिल्यांदा सुरू झाली. त्यामध्ये पारशी व यूरोपीय संघांत प्रतिवर्षी सामने होत. ह्या सामन्यांना ‘दुरंगी’ अथवा ‘प्रेसिडेन्सी’ सामने म्हणत. पुढे १९०७ साली त्यात हिदूंचा संघ येऊन सामील झाल्याने त्या वार्षिक लढतीला ‘तिरंगी’ सामने असे नाव मिळाले.

१९१२ मध्ये मुस्लिम संघ या लढतीत उतरल्याने त्याला ‘चौरंगी’ सामन्यांचे स्वरूप प्राप्त झाले.

फक्त भारतीयांचा समावेश असलेला भारतीय खेळाडूंचा पहिला प्रातिनिधिक संघ पतियाळाच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली १९११ मध्ये इंग्‍लंडला गेला.

पुढे १९२८ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय विजेतेपदासाठी १९३४ पासून सुरू झालेल्या ‘रणजी ट्रॉफी’ सामन्यांमुळे भारतीय क्रिकेटला सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले.

१९३७ मध्ये चौरंगी सामन्यांमध्ये ख्रिश्चन संघाची भर पडून ‘पंचरंगी’ सामने सुरू झाले. पण बीसीसीआयला अशा सामन्यामुळे जातीय वृत्ती वाढण्याची शक्यता वाटल्याने १९४७ पासून हे पंचरंगी सामने बंद केले.

२० व्या शतकात दक्षिण आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज न्यूझीलंड, पाकिस्तान हे देश कसोटी देश बनले. १९०९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्थापना झाली. ज्याचे प्रतिनिधीत्व इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी केले होते.

पहिला मर्यादित षटकांचा सामना मेलबर्न येथे १९७१ मध्ये झाला आणि तो लोकांना आवडला देखील. यानंतर आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कपची स्थापना केली आणि १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये पहिला विश्वचषक आयोजित केला होता.

सध्याच्या काळात क्रिकेट आता केवळ एक खेळ न राहता ती राष्ट्रीयत्वाची भावना बनली आहे. सर्वच देशांमध्ये उत्कट देशप्रेमासोबत ही स्पर्धा पाहिली जाते. उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान या एकाच उपखंडातील राष्ट्रांचे.

हळू हळू आयर्लंड, अफगाणिस्तान आणि केनियासारख्या देशांनीही क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उत्सुकतेने भाग घेण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या क्रिकेटच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. एकूणच क्रिकेट हा एक समृद्ध इतिहासाचा साक्ष देणारा खेळ आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.