रजनीकांतसुद्धा बोलतो त्या “दक्षिणी मराठी ” मागे आहे, मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास.

काही दिवसापूर्वी सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ पहिला. त्यात तो मराठीत बोलत होता. त्याच्या भाषेमध्ये मराठीचा रांगडेपणा तर होताच पण त्याशिवाय दाक्षिणात्य भाषेतला गोडवा देखील होता. तेव्हा कोणीतरी सांगितलं की रजनीकांत बोलतोय तिला दक्षिणी मराठी म्हणतात.  

दक्षिणी मराठी हे पहिल्यांदाच ऐकत होतो. इंटरनेटवर थोडा शोध घेतला तेव्हा एक व्हिडीओ समोर आला. त्याची सुरवात होती.

नमस्कार …!

दक्षिणी मराठी चॅनलाला तुम्हांला स्वागत करतों…!

नमस्कार …! समस्त मराठी श्रोत्यांना..!

माझं नांव कंचि भीमराव रवी..

मी एक तंजावूर मराठी बोलणार..

वरच्या ज्या ओळी आहेत त्या ‘दक्षिणी मराठी’ नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओतून घेतल्या गेल्या आहेत. या लोकांच्या मराठीला एक प्रकारचा दक्षिणी तडका आहे. भाषेचे उच्चार बऱ्यापैकी तमिळभाषेसारखे  आहेत. आपल्या भाषेचा त्यांना अभिमान आहे.

आपल्या बोलीचे वेगळेपण सगळ्यांना कळावे, महाराष्ट्रासह इतरत्र पसरलेल्या मराठी भाषिकांना आपले हे बांधव दक्षिणेत आपल्या भाषेचा दीप तेवत ठेवले आहेत हे कळावे यासाठी तिथल्या काही  लोकांनी मिळून ‘दक्षिणी मराठी’ नावाचं नवीन युट्यूब चॅनल सुरु केलंय. 

स्वतःचीच मराठी ती अस्सल मराठी, आपले व्याकरण तेच प्रमाण व्याकरण असे समजणाऱ्या प्रत्येकाने ही भाषा ऐकावीचं. अशी काही मराठी पार दक्षिणेत बोलली जाते, सुपरस्टार रजनीकांतसुद्धा अशाच मराठीत बोलतो हे आपल्या पैकी अनेकांना ठावूक नव्हते.

काय आहे दक्षिणी मराठीचा इतिहास…?

दक्षिणी मराठी युट्यूब चॅनलनुसार १६७४ साली शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावूरच्या ‘अळगिरी नायक’ राजाचा पराभव करून तेथील अतिशय समृद्ध असा तंजावर प्रांत जिंकला. स्वतःला तंजावरचे राजे म्हणून घोषित केल्यानंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी म्हणून व्यंकोजीराजे भोसले यांनी मराठी भाषिक जनतेला दक्षिणेत यायचं आवाहन केलं.

त्यानंतरच्या पुढच्या काही दशकांच्या कालावधीत  महाराष्ट्रातील अठरापगड जातीजमातींची सुमारे पाच लाख मराठी भाषक कुटुंबे तंजावरमध्ये स्थलांतरित झाली आणि तिथेच स्थायिक झाली. या वास्तव्यात त्यांच्या भाषेवर संस्कृत आणि तमिळ भाषेचा प्रभाव वाढायला लागला आणि पुढच्या १०० वर्षात मराठी-तमिळ मिश्रित ‘तंजावूर मराठी’ नावाची नवीनच बोलीभाषा आकारास आली.

१८५५ साली तंजावरचं मराठी साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर येथील बहुतांश मराठी माणसं शिक्षण-नोकरी-उद्योग यांसारख्या विविध कारणांसाठी दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा इ. राज्यात स्थलांतरित झाले. स्थलांतरित होणारे लोकं त्या-त्या भागात जाताना सोबत आपली भाषा देखील घेऊन गेले.

सहाजिकच त्या त्या प्रदेशातील इतर दक्षिणी भाषेचे संस्कार देखील त्यांच्या भाषेवर झाले. ‘तंजावूर मराठी’च्या व्याकरणावर तमिळ भाषेचा मोठा प्रभाव आहे. असं असलं तरी महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूरवर असणाऱ्या दक्षिणेतील राज्यांमध्ये गेली साडेतीनशे वर्षे मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं श्रेय नक्कीच तंजावूर मराठीला दिलं पाहिजे.

काय अाहे या युट्यूब चॅनलवर..?

महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहूनही या मराठी भाषक बांधवांनी आपली संस्कृती तिथे कशी जपली..?

तमिळबहुल प्रांतात, त्यांच्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेला काय स्थान आहे..?

महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठीत फारशी, अरबी आणि उर्दू शब्दांची रेलचेल होत असताना, तंजावरच्या मराठीची  नेमकी परिस्थिती काय..?

एकविसाव्या शतकात वावरताना तंजावूर मराठीमध्ये आज देखील सोळाव्या शतकातील शब्दच कसे काय वापरले जातात..?

तिथे जाऊन त्यांची मराठी होती तशीच राहिली, की त्यात काही बदल झाले आणि जर बदल झाले असतील तर ते नेमके कोणते…?

काळानुरूप बदलत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये नवीन शब्द निर्माण करण्याची आवश्यकता उत्पन्न झाल्यावर आपले तंजावूरचे मराठी बांधव संस्कृतोद्भव शब्दच वापरतात की तमिळोद्भव..?

छत्रपतींच्या अनुयायांनी तंजावरप्रांती जाऊन तामिळ संस्कृती स्वीकारली, की मराठी संस्कृतीच तिथे वाढवली..?

तामिळनाडूच्या सांस्कृतिक क्रांतीमध्ये महाराष्ट्रीयांचे योगदान काय आहे..?

सोळाव्या शतकात स्थलांतरित झालेल्या पाच लाख कुटुंबांपैकी किती कुटुंबे आजघडीला तिथे आहेत आणि त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अवस्था काय..?

आपल्याला पडणाऱ्या या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या युट्युब चॅनलच्या माध्यमातून मिळू शकतात असे या चॅनलच्या सध्याच्या प्रारुपावरून वाटते.

फक्त दक्षिणेतच नाही तर पूर्ण देशभरात स्वराज्याच्या विस्तारासाठी अनेक मराठी कुटुंबे स्थलांतरीत झाली. जिथे जातील तिथे आपली भाषा आपली संस्कृती नेली. पिढ्यानपिढ्या ती जपली. आज अनेक वर्षांनी त्यांच्यावर तिथल्या भाषेचा थोडाफार परिणाम झाला मात्र यामुळे मराठीचं नुकसान झालं नाही तर मराठी समृद्धच झाली आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.