केंद्र सरकार निधी देत नव्हतं, लाईट बिलात १ पैसा वाढवून त्यांनी हे हॉस्पिटल उभं केलं..

सध्या आपण सगळेच ज्या महाभयंकर साथीच्या रोगाला तोंड देत आहोत, तेंव्हा आपल्यातल्या प्रत्येकाला देशातील आरोग्य विभागाचा आणि त्याच्या रचनेचा जवळून अभ्यास झालाय. तेंव्हा येत असलेल्या अडचणीमुळे  या आरोग्य क्षेत्राच्या रचनेचा नव्याने विस्तार करण्याची गरज असल्याचे जाणवतंय.

मंगल कार्यालयापासून प्राथमिक शाळांपर्यंत अनेक इमारतींचा हॉस्पिटल्स, कोविड सेंटर म्हणून  वापर आता या संकटात करण्याची वेळ आलीये. प्रत्येक ठिकाणी जगण्यामरण्याची लढाई सुरु आहे. प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, व्हेंटिलेटर, औषधे मिळावीत यासाठी आरोग्य प्रशासन अतिशय तडफदार पणे प्रयत्न करत आहे.

सगळ्यात गंभीर स्थिती राजधानी दिल्लीमध्ये निर्माण झाली आहे. कोरोनाच्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल अशी अवस्था असताना नव्या अत्याधुनिक हॉस्पिटल बरोबरच काही जुनी इतिहासकालीन हॉस्पिटल या लढाईमध्ये उतरून अग्रभागी उभी राहिली आहेत.    

याचे उत्तम उदाहरणं म्हणजे, एलएनजेपी, डीडीयू आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटल. हॉस्पिटलचा इतिहास पाहिला तर लक्षात येते, प्रत्येक इमारतीचा इतिहास हा संघर्षाचाआहे.

काही हॉस्पिटल्स इतिहासकालीन तुरुंग होते तर कधी स्वातंत्र्य सेनानींना शिक्षा देण्यासाठीच्या अंधार्‍या कोठ्या होत्या, तर कोणत्या इमारती जुन्या काळातील धर्मशाळा होत्या. मुघलांच्या काळातल्या काही भव्यदिव्य इमारती इंग्रजांच्या काळातही दवाखाने म्हणून वापरात आणल्या होत्या आणि आत्ता देखील कोरनाच्या लढाईत ‘कोविड 19 सेंटर’ म्हणून आपल्याला साथ देत आहेत.

सर्वात पहिला पण जाऊ दिल्लीतल्या नामवंत एलएनजेपी म्हणजेच लोकनायक जयप्रकाश नारायण दवाखान्यात.

हा दवाखाना जिथे आहे तिथे कधीकाळी मुघलांनी बांधलेल्या धर्मशाळा होत्या. असा अंदाज आहे की ही सराई म्हणजेच धर्माशाळा 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 17 व्या शतकाच्या सुरुवातीला अकबर आणि जहांगीर यांच्या काळात येथे बांधली गेली होती. या सराईमध्ये प्रवासादरम्यान आलेली लोक विश्रांती घेत असत.

पुढे ब्रिटिशांनी इथे तीस एकर क्षेत्रात पसरलेला तुरुंग बांधला. असं म्हटलं जातं की या तुरुंगात 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंग ला मारण्याची मोहीम अखणाऱ्यांना फाशी देण्याआधी याच तुरुंगात बंदी ठेवले होते. इतिहासकार सोहेल हाश्मी सांगतात की,

1942 च्या दरम्यान भारत छोडो चळवळीच्या वेळी त्यांच्या वडिलांनाही याच तुरुंगात दोन वर्षे ठेवण्यात आले होते.

10 जानेवारी 1930 रोजी येथे एक रुग्णालय बांधण्यात आले, ज्याचा पाया तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांनी घातला. त्यानंतर दिल्लीचे सेंट्रल जेल तिथून तिहारला हलवण्यात आले. आयर्विन रुग्णालयाचा वापर फक्त हॉस्पिटल म्हणून केला जाऊ लागला.

फाळणीनंतर पाकिस्तान वरून आलेल्या शरणार्थींसाठी हे 350 बेड क्षमतेचे हॉस्पिटल म्हणून उपयोगात आले होते. 

पुढे दिल्ली शहराची वाढती लोकसंख्या आणि विकास यामुळे रुग्णालयाने वैद्यकीय सुविधा, संसाधने आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या. १९७७ वेळी आणीबाणीनंतर आलेल्या जनता सरकारने तेव्हाच्या आंदोलनाची आठवण म्हणून  या हॉस्पिटलचं आयर्विन हे नाव बदलून, ‘लोकनायक जयप्रकाश नारायण’ ठेवण्यात आले.

मौलाना आझाद मेडिकल कॉलेज हे या रुग्णालयाचाच एक भाग आहे.

असा मुघलांच्या काळापासूनचा शेकडो वर्षांचा इतिहास असलेले लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल आजही कोरोनाच्या लढाईत झुंजारपणे लढताना दिसत आहे.

यानंतर येते पंडित दिनदयाळ उपाध्याय रुग्णालय. 

हरियाणा तसेच पश्चिम दिल्लीच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या इतिहासाकडून आजच्या राज्यकर्त्यांनी नक्कीच काही शिकले पाहिजे.

“अगर किसी काम में शिद्दत से लग जाओ तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में जुट जाती है।” हा डायलॉग या हॉस्पिटलला तंतोतंत लागू होतो.

त्याचं असं झालं कि, सत्तरच्या दशकात पश्चिम दिल्लीचा परिसर आरोग्याच्या सुविधेअभावी त्रस्त होता.  किरकोळ आजारांवर उपचार घेण्यासाठी लोकांना नवी दिल्लीला जावे लागत.

यामुळे लोक परेशान व्हायचे.  त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.  विजय कुमार मल्होत्रा ​​हे दिल्लीचे मुख्य कार्यकारी सल्लागार होते. मुख्य कार्यकारी समुपदेशकाकडे मुख्यमंत्र्यांइतकेच समान अधिकार असायचा. 

मल्होत्रा ​​यांचे म्हणणे आहे की, त्यांनी केंद्र सरकारकडे या भागात रुग्णालय बांधण्यासाठी बजेट मागितलं, परंतु केंद्राने त्यास नकार दिला.  त्यांच्याकडे तर पैसे नव्हते परंतु त्यांनी ठरवले होते की, केवळ हॉस्पिटलच नव्हे तर स्टेडियम आणि कॉलेजदेखील आम्ही बांधून दाखवू,

यासाठी केंद्र सरकारशी त्यांनी सतत संवाद चालू ठेवला. प्रा. मल्होत्रा ​​म्हणाले की, यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वीज बिलावर एक पैसे प्रति युनिट वाढीसह दोन किंवा तीन गोष्टींवर कर वाढविण्यात आला होता. 

त्या काळात उद्योजकांनीही याला हसत हसत स्वीकारलं आणि मग वाढीव करातून मिळालेली रक्कम 1970 मध्ये दीन दयाल उपाध्याय रुग्णालय व्यतिरिक्त दिल्लीत अजून दोन रुग्णालयांच्या बांधकामं ही सुरु केली होती. 

दीन दयाल उपाध्याय रुग्णालय उभे राहिले, दिल्लीतल्या हरीनगरमधील दिल्ली विकास प्राधिकरणाच्या जागेवर.

पहिल्यांदा हॉस्पिटल 50 बेडसह सुरू करण्यात आले. हळूहळू या भागाची लोकसंख्या वाढत गेली आणि 1987 मध्ये नवीन इमारत बांधली गेली, 50 वरून बेड ची संख्या 500 पर्यंत वाढली. तसेच इमर्जन्सी वोर्ड देखील उघडण्यात आला, परंतु तोपर्यंत या विभागाने 24 तास काम सुरू केले नव्हते. 

1998 मध्ये या रुग्णालयात 24 तास आपत्कालीन सेवा सुरू केली गेली आणि हे हॉस्पिटल दिल्लीतील महत्वाच्या हॉस्पिटल पैकी एक बनलं. हॉस्पिटलचा विस्तार येथेच थांबला नाही, तर 2008 साली नवीन ट्रॉमा सेंटरच्या निर्मितीसह बेडची संख्या वाढून 640 झाली. आज या कोरोना साथीच्या लढाईत रुग्णांची आशा अजूनही आहे कि, नेहेमीप्रमाणेचं हे हॉस्पिटल तेवढ्याच हिंमतीने साथ देईल.

आता आपण बोलू लेडी हार्डिंग हॉस्पिटल बद्दल..

1918 मध्ये बनलेलं ते एकमेव महिला मेडिकल कॉलेज होतं.  ज्यावेळेस महिला वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया घातला गेला त्या काळात महिला शिक्षणाची काय स्थिती होती याचा अंदाज आपण बांधू शकतो. पण तरीही त्याच काळात लेडी हार्डिंग हे देशातील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय ठरले. 

प्रशिक्षणार्थी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची परिस्थिती यापूर्वी थोडी त्रासदायक होती.  सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दुसर्‍या महाविद्यालयात जावे लागायचे.  या महाविद्यालयाच्या परीक्षा किंग एडवर्ड मेडिकल कॉलेजमध्ये होत असत जे आता लाहोरमध्ये आहे. त्या काळात हे महाविद्यालय पंजाब विद्यापीठाचा भाग होते. 

फाळणी होण्यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लाहोरला जावे लागत असायचे. फाळणीनंतर त्या कॉलेजला दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत करून घेतले.

इतिहासकार सोहेल यांच्या म्हणण्यानुसार, 1912 मध्ये ते जेव्हा राजधानी दिल्लीत स्थलांतरित झाले होते, तेव्हा दिल्लीतील उच्चभ्रू वर्गाच्या महिलांनी तक्रार केली कि, आम्हाला पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास तितके सुरक्षित वाटत नाही. शासनाच्या सर्व जनजागृती मोहिमेनंतरही उच्च व मध्यम वर्गाच्या महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात गेल्याच नाहीत.  त्यांना ते अपमानास्पद वाटायचं. त्यावेळी प्रसूतीसाठी गावात सुईन असायची, त्यांच्याच मदतीने प्रसूती व्हायच्या.

लेखक आणि भारतीय इतिहासकार समीक्षा यांनी लिखित ‘कॉलोनियल मेडिकल केअर इन नॉर्थ इंडिया – जेंडर,स्टेट अँड सोसायटी’ या पुस्तकात असे लिहिले आहे की ‘जनाना’ आणि ‘परदा’ वर्गाच्या स्त्रिया त्या काळात रुग्णालयात जायच्याच नाहीत. केवळ अत्यंत दुर्बल घटकांतील महिलाच रुग्णालयात उपचारासाठी जात असत.

महिला उपचारांसाठी आणि प्रसूतीसाठी रुग्णालयात जाव्यात, अशी सरकारची इच्छा होती, पण पुरुष डॉक्टर आणि कर्मचार्‍यांकडून आम्ही उपचार किंवा तपासणी करून घेणार नाही, असा त्या महिलांचा आक्षेप होता. 

अखेर येथे एक दवाखाना आणि एक प्रशिक्षण संस्था उघडण्याचा मार्ग ब्रिटिश सरकारतर्फे काढला गेला, जेथे घरोघरी जाणाऱ्या सुईणींना युरोपियन सुईणीप्रमाणे प्रशिक्षण दिले जावे असे ठरले.  त्यावेळी, व्हॉईसरॉय डफरीन यांची पत्नी लेडी डफरीन यांच्या प्रयत्नाने एक राष्ट्रीय संघटना स्थापन केली गेली ज्या अंतर्गत लेडी डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.

मात्र सर्व प्रयत्न करूनही आणि प्रशिक्षण देण्याची तयारी असूनही, डफरीन फंड महिलांनी वैद्यकीय क्षेत्रात जावे यासाठी प्रोत्साहित करण्यामध्ये, तसेच त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अयशस्वी ठरल्या. 

समीक्षा सहरावत यांच्या पुस्तकात या बाबत आढावा घेतला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की भारतीय पितृसत्तेच्या प्रभावाखाली उचभ्रू वर्गाच्या महिलांनी वैद्यकीय व्यवसाय नाकारला होता, कारण त्यावेळी या क्षेत्रातील महिलांना जे शिक्षण दिले गेले होते ते संपूर्ण वैद्यकीय प्रशिक्षण नव्हे तर किरकोळ शिक्षण दिले जायचे. त्यांना केवळ सहाय्यक इत्यादी म्हणून प्रशिक्षण दिले गेले ज्यानंतर महिलांना पुरुष चिकित्सकांच्या सहाय्यक म्हणून काम करावे लागायचे. यामुळे महिलांना हा व्यवसाय मान्य नव्हता.

पुढे  महिला चिकित्सकांच्या टीमने ‘असोसिएशन फॉर मेडिकल वुमन इन इंडिया (एएमडब्ल्यूआय) ची स्थापना केली, ज्यात सुरुवातीला ब्रिटीश चिकित्सकांचाच समावेश होता.  १९११ मध्ये ही संघटना सक्रिय झाली आणि स्वतंत्र महिला वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली.  या संघटनेच्या नेतृत्व करणाऱ्या महिलांनी लेडी हार्डिंगला पत्र देखील लिहिले. 

नंतर, लेडी हार्डगने ते गांभीर्याने घेतले आणि तिच्या प्रयत्नांनी 17 मार्च 1914 रोजी एक स्वतंत्र महिला वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी झाली. त्यानंतर काहीच महिन्यांनंतर, लेडी हार्डिंग यांचे निधन झाले आणि कॉलेजसाठी तिचे योगदान म्हणून तिचे नाव कॉलेजला देण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.