भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राच्या जडणघडणीचा इतिहास !

भारतासारख्या विविधतेत एकता असणाऱ्या ठराविक काळानंतर कुठले ना कुठले सणवार सुरूच असतात. विविध सणवारांच्या निमित्ताने वस्तू आणि सेवांची भरमसाठ खरेदी-विक्री होते आणि पर्यायाने अर्थव्यवस्था खेळती ठेवली जाते. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत एक मोठी बाजार पेठ म्हणून समोर आला आहे.

कोणत्याही बाजारपेठेचे मुख्यतः उत्पादनापासून ते सेवा पुरवण्यापर्यंत निरनिराळे टप्पे आखलेले असतात. होलसेल आणि रिटेल ही बाजारपेठेची दोन मूलभूत अंगे. रिटेल क्षेत्र सर्वदूर विखुरलेले असल्याने आणि सरळ ग्राहक वर्गाशी जोडला गेला असल्याने त्याची व्याप्ती थोडी जास्त.

१९९५ पासून इंटरनेट सेवा भारतात सुरु झाली आणि १९९८ सालापासून  खाजगी कंपन्यांना या मायाजालाचे दरवाजे खुले झाले. सुरवातीच्या काळात ठराविक समूहासाठी समजली जाणारी ही सुविधा आज बघता बघता तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे.

सुरवातीच्या काळात मनोरंजनासाठी आणि संपर्क माध्यम म्हणून वापरले जाणारे इंटरनेट नंतर एक बाजार पेठ म्हणून नावारूपास येत गेलं. भारताबाहेर अॅमेझॉन, अलीबाबा यांसारख्या कंपन्यांनी इंटरनेटचा वापर आभासी बाजारपेठ म्हणजेच इ-कॉमर्स म्हणून करून घेण्यास सुरवात झाली होती. साहजिकच हे वारे भारतीय बाजापेठेकडे जोमाने प्रवास करत होते.

अमेरिकेत १९९४ साली अॅमेझॉन आणि १९९५ साली  इबे या कंपन्यांची सुरुवात झाली. अल्पावधीतच या दोन्हीही कंपन्यांनी इ-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. १९९९ साली स्थापन झालेल्या चीनच्या ‘अलीबाबा’ या कंपनीने मात्र या क्षेत्रातील अमेरिकेच्या मक्तेदारीला सुरुंग लावला.  अलीबबाने वेगाने हे क्षेत्र कह्यात घ्यायला सुरुवात केली.

२००७ साली अॅमेझॉनमधून नोकरी करून आलेल्या सचिन आणि बिन्नी बन्सल या जोडगोळीने भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून  इ-कॉमर्सचं रोपट लावलं होतं. सोबतच इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या सुरु झाल्या होत्या.

दरम्यान जागतिक पातळीवरील अॅमेझॉन भारतात आली ती २०१२ साली जंगली डॉट कॉम च्या माध्यमातून. पण भारतीय लोकांचं इंटरनेटबद्दल तोकडं ज्ञान आणि ऑनलाईन पैसे देण्याची सुविधेचा अभाव या दोन गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात अॅमेझॉन काही अडचणींचा सामना करावा लागला.

फ्लिपकार्ट व्यतिरिक्त स्नॅपडील,पेटीएम, शॉपक्लूज यांसारख्या बऱ्याच भारतीय कंपन्यांनी या क्षेत्रात जम बसवला. काही वर्षातच या कंपन्यांमध्ये भरघोस अशी परदेशी गुंतवणूक सुद्धा झाली. जस जसा सर्वसामान्य माणसांमध्ये इंटरनेटचा वापर वाढत गेला आणि इंटरनेटची उपलब्धता देखील किफायतशीर होत गेली तसं ते जाळं अजून विस्तारात गेलं.

सद्यस्थितीत भारतात एकूण लोकसंख्येच्या ४०% टक्के लोक इंटरनेट वापरताहेत आणि या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होताना बघायला मिळतेय.  जगभरात  चीननंतर मोठी बाजारपेठ म्हणून अनेक कंपन्यांचं भारतावर आणि भारतातील इ-कॉमर्स क्षेत्रावर बारीक लक्ष्य आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील  जागतिक पातळीवरील  सेवा पुरवठादार म्हणून  जस भारताचं नाव होत गेलं तसं इथं त्या क्षेत्राशी निगडित रोजगार संधी वाढत गेल्या आणि शहरे परीघ वाढवत गेली. ज्या ज्या शहरांमध्ये हे सॉफ्टवेर सेवाक्षेत्राच जाळं विस्तारात गेलं तिथली लोकसंख्या बाकी शहरांच्या तुलनेत अधिक गतीने तंत्रज्ञानाच्या जवळ येत गेली आणि हेच इ कॉमर्स क्षेत्राचे मूळ ग्राहक बनले.  नोटबंदीच्या निर्णयानंतरच्या काळात अनेक सर्वसामान्य नागरिकांचा देखील  देखील ऑनलाईन व्यवहार करण्याकडे कल वाढला.

सुरुवातीच्या काळात फक्त ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून इ कॉमर्सकडे बघितलं जायचं, पण आता नजीकच्या उपाहारगृहातून जेवण ऑर्डर करण्यापासून ते महिन्याचा किराणा सामान भरण्यापर्यंत आणि कुठल्याही कामासाठी प्रशिक्षित कामगार बोलावण्यापर्यंतच्या हरेक गोष्टीपर्यंत या क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.

इ-कॉमर्समुळे ग्राहकांच्या सर्वच गरजा आणि सोयी सुविधा एका क्लिकसरशी  त्याच्या कवेत आल्या आहेत. ही एक प्रकारची तांत्रिक उत्क्रांती म्हणावी लागेल. पैश्याचे होणारे ऑनलाईन व्यवहार, त्यातून ग्राहकांना मिळणारे फायदे आणि वाचणारा वेळ, शिवाय कोणत्याही शुल्लक व्यवहाराच्या सुद्धा राखल्या जाणाऱ्या नोंदी यामुळे हे ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे.

एकूणच इंटरनेट आणि त्या सोबतीने वाढणारे हे इ कॉमर्स क्षेत्र येत्या काळात अजून झपाट्याने विस्तारत जाईल, असं साध्या तरी दिसतंय. तेव्हा या विस्तारणाऱ्या क्षेत्राचा लाभ  उठवत असतानाच या क्षेत्रातील दुष्परिणामांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. हे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न शासन दरबारातून देखील करण्यात येत आहेत, पण अजून बरचसं काम होणं देखील अपेक्षित आहे.

शंतनू शरद पोवार

 

Leave A Reply

Your email address will not be published.