दिल्लीत सुभाषबाबूंचा पुतळा ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे त्यालाही इतिहास आहे

सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम स्टॅच्यू दिल्लीतील इंडिया गेट वरील एम्प्टी कॅनोपी येथे उभा राहणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषबाबूंच्या या स्टॅच्यूचं उदघाटन करणार आहेत. 

सुरवातीला होलोग्राममध्ये असणारा हा स्टॅच्यू त्यांनंतर ग्रॅनाईटमध्ये बनवण्यात येइल. 

पण ह्यात सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे एम्प्टी कॅनोपीची. जी जागा सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासाठी निवडण्यात आली आहे त्यामागेही एक इतिहास आहे.

तर इतक्या दिवस मोकळी असणाऱ्या या छताखाली सुरवातीला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याचा पुतळा होता. 

१९३६मध्ये बनवण्यात आलेला या वास्तूमध्ये तेव्हा नुकताच निधन झालेल्या पंचम जॉर्ज याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्याचा ५० फुटांचा पुतळा या भल्यामोठ्या छताखाली उभारण्यात आला होता. 

 ३ जानेवारी १९४३ मध्ये जेव्हा चले जाव आंदोलन जोशात चालू होता तेव्हा काही कार्यकर्त्यांनी या पंचम जॉर्जच्या पुतळ्याचं नाकंच कापलं होतं. 

Canopy before after 640

पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजपथावर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या पुतळा हटवण्यासाठी अनेक आंदोलनं झाली. ब्रिटिशांनी भारताला गुलामीत ठेवल्याचं प्रतीक असलेला तो पुतळा राजपथावर कसा या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरं देताना सरकारला नाकेनऊ येत होतं. 

अखेर स्वातंत्र्याच्या दोन दशकांनंतर म्हणजे १९६८ मध्ये हा पुतळा इंडिया गेटजवळून हालवून कोरोनेशन पार्क इथं हलवण्यात  आला.  

त्यानंतर मग आता या छताखाली भारतातील कोणाचा पुतळा बसवायचा यावर अनेक चर्चा झडल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाच पुतळा या जागेवर बसवावा ही मागणी अनेक वर्ष करण्यात येत होती. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल यांच्या पुतळ्याची मागणीही लावून धरण्यात आली. 

१९८४ ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यांनतर त्यांचा स्टॅच्यूही या जागेवर बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. 

मात्र नेताजींच्या पुतळा बसवण्याचा आधी १९६८ पासून हि जागा मोकळीच होती. त्यामुळं या वास्तूला एम्प्टी कॅनोपी हे नाव पडलं होतं. हे जागा मोकळी ठेवण्यामागंही प्रतीकात्मकता असल्याचं बोललं जात होतं. ज्या ठिकाणी ब्रिटनच्या पंचम जॉर्जचा पुतळा होता ती जागा आत मोकळी आहे हे भारताच्या ब्रिटनच्या दास्यत्वातून मुक्त होणं आणि ब्रिटिशांची शेकडो वर्षांची राजवट उलथून टाकण्याचं प्रतीक असल्याचं मानलं गेलं. त्यामुळं एम्प्टी कॅनोपी मोकळी ठेवणं हेच बरोबर आहे असाही काही जणांचं म्हणणं होतं.

त्याचबरोबर भारतात आता राजेशाही नसून प्रजासत्ताक व्यवस्था असल्यानं पंचम जॉर्जच्या जागी आता कोणतीच मूर्ती नसावी असं ही काही जणांची मागणी होती.

आता मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा या जागेवर उभा राहणार आहे. इंडिया गेट आणि राजपथच्या परिसरात हा पुतळा उभा राहत असल्यानं त्याला विशेष महत्व राहणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.