गड किल्ले बांधण्यास कधीपासून सुरवात झाली..?

आपल्या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर ते म्हणजे गड-किल्ले. याच गडांच्या तटबंदी, दरवाजे, बुरुज, या इतिहासाचे साक्षीदार आहेत.

या गडकिल्ल्यांच्या प्रत्येक भागावरून उठलेल्या घोड्यांच्या टापांनी आपल्याला जाज्वल्य असा इतिहास दिला आहे. त्यात महाराष्ट्र आणि गड किल्ल्याचं वेगळ असं नात आहे, आपल्यासाठी गड किल्ले ही फक्त वास्तू नसून ती आपली अस्मिता आहे. याच गड किल्यांवर घुमलेली हर हर महादेव ही गर्जना प्रत्येकाच्या मनात आज तशीच आहे. ह्याच गडांच्या साक्षीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले.

पण या गडांचे खरे मूळ काय? पहिला गड कुणी बांधला? नेमकी गडांच्या रचनेची संकल्पना कुणाची? गडांचे एकूण प्रकार किती? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेच असतील असेच प्रश्न आमचे वाचक इंद्रजीत मोहिते यांनी आम्हाला विचारला.

या त्यांच्या प्रश्नानंतर आम्ही गडकिल्ल्यांच्या अस्तित्वाच्या इतिहासाचा शोध घेऊन तो तुम्हाला सांगत आहोत.

किल्ले बांधण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शत्रूपासून संरक्षण करणे आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे. किल्ला किंवा गड असे आपण जरी म्हणत असलो तरी मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला असे अनेक पर्यायी शब्द आहेत.

किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून होत आला आहे. शत्रूचा हल्ला आल्यास लोकांना लगेच संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोपे जावे म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच होती. नगराप्रमाणे कधी देशाच्या सीमेवरही तटबंदी असायची. किल्ला सुरक्षित रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक किल्ल्यात असायचे.

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किल्ल्यांचे तीनच प्रकार आहेत, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा. किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून

“अमिलापितार्थ चिंतामणी” ह्या ग्रंथाचे लेखक सोमेश्वर यांनी किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत,

ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत.

किल्ल्यांची बांधणी जगात प्रथम केव्हा सुरू झाली, ह्याचा इतिहास अजुन तरी आपणास ज्ञात नाही. इसवी सनपूर्व ३५०० ते ६०० दरम्यान ईजिप्शियन संस्कृतीच्या काळात राजवाडे तटबंदीने, बुरूजांनी व त्या भोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले होते. इसवी सनपूर्व २०००- १७७६ दरम्यान म्हणजेच बाराव्या राजवंशाच्या वेळी “सेम्ना” हा किल्ला बांधण्यात आला आहे. तीच परंपरा पुढे चालू राहिली.

रोमन काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले व राजवाडे म्हणजे लहानमोठे भुईकोट किल्लेच तयार होऊ लागले. युरोपमधील बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीत ग्रीको-रोमन तसेच गॉथिक वास्तुशैली आढळत असल्याचे मत इतिहास तज्ञांनी व्यक्त केले आहे. यूरोपात १००० ते १५०० या कालखंडात किल्ल्यांचे प्रमाण वाढले ते नॉर्मनांच्याच प्रोत्साहनामुळे झाले तसेच याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरंजामशाही व धर्मयुद्धे.

भारतीय इतिहास पाहता किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात आढळतो. 

ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे  ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्व याबाबत केलेलं लिखाण दिसून येत.

प्राचीन भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात हडप्पा ह्या शहरास तटबंदी होती व शहराच्या मध्यभागी बालेकिल्ला बांधला होता, असे तेथील अवशेषांवरून दिसते. पुढे वेदकाळात शहरांभोवती तटबंदी उभारून सभोवती खंदकांची योजना केली जात असल्याचेही उपलब्ध महितीनुसार दिसून येते. ऋग्वेदात ह्याचा ‘पुर’ ह्या शब्दाने उल्लेख केलेला आढळतो.

ऐतरेय ब्राह्मणात अनेक किल्ल्यांचा उल्लेख असून तीन अग्नी हे तीन किल्ले असून ते असुरांपासून यज्ञाचे संरक्षण करीत आहेत, असे लिहल्याचे आढळते.

मौर्यकाळात कौटिलीय अर्थशास्त्रातील किल्ल्यांच्या वर्णनावरून असे दिसते, की किल्ल्यांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात येत होती. पाटलिपुत्र शहराच्या अवशेषांवरून हे लक्षात येईल कि त्याभोवती खंदक होता आणि त्याची तटबंदी भक्कम असावी. गुप्त, वाकाटक, राष्ट्रकुट ह्यांच्या काळात किल्ल्यांस विशेष महत्त्व आलेले नसले, तरी त्यांचे राजवाडे व शहरे तटबंदीने युक्तच होते. मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार, यादव ह्या वंशांच्या वेळी गिरिदुर्गांना खूप महत्त्व प्राप्त झाले. एकूण किल्ल्यांपैकी ह्या काळात बांधलेले किल्ले-त्यांचे मूळ स्वरूप आज दिसत नसले तरी-संख्येने सर्वाधिक असतील.

देवगिरी (दौलताबाद), साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, त्रिंबक, रांगणा, पावनगड, पन्हाळा, विशाळगड हे सर्वच मुस्लीम पुर्वकाळातील किल्ले आहेत. पुढे मुघल साम्राज्याच्या काळात अनेक किल्ले बांधण्यात आले.

पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले, बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी केली. मात्र ह्यावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते. त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधले. ह्या काळात गोवळकोंडा, त्रिचनापल्ली, पेनुगोंडे, चंद्रगिरी येथील किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झाले होते.

भारतातील किल्ल्यांच्या बांधणीत सॅरसेनिक वास्तुशैलीची छाप आढळते व तीच पुढे महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पडलेली दिसते.

विसाव्या शतकात शस्त्रास्त्रांच्या व वाहनांच्या आधुनिकीकरणाबरोबर किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात १९३८ मध्ये जर्मनीने सिगफ्रीड लाइन व फ्रान्सने मॅझिनो लाइन ह्यांसारख्या अवाढव्य तटबंदी बांधण्यात आल्य़ा.

किल्ले फक्त वस्तूशिल्पाचे प्रतिक नसून त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. याच गडांनी आपल्याला अभिमानाचे असंख्य क्षण दिले आहेत. पण आज काळाच्या ओघात या किल्यांची दुरवस्था होताना दिसते आहे. किल्ल्यांची निगा राखणे आपली जबाबदारी आहे, कारण आपण ज्यांना महाराष्ट्राचे प्रेरणास्थान मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा, पुरंदर, राजगड, रायगड अशा अनेक किल्ल्यांनी साथ दिली, म्हणूनच स्वराज्याचं स्वप्न साकार झालं,

त्यामुळेच या किल्ल्यांना जपणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

हे ही वाचा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.