हनी सिंगला मिळवायचा होता तो ग्रॅमी अवॉर्ड इतका मानाचा का आहे?

आपल्या पिढीला शनिवारी रात्री चॅनेलवर लागणारे अवॉर्ड्स शोज जरी आवडत नसले तरी, हनी सिंगनं आपल्याला एका अवॉर्ड शो बद्दल गुगलवर सर्च करायला लावलं होतं. त्या अवॉर्डचं नाव आहे ग्रॅमी.

जो भी मै बोला वो मै करके दिखाऊंगा, मेरे लिए दुआ करो मै ग्रॅमी ले आऊंगा…

कसम बजरंग बली की, देसी घी की बुंदी की बुंदी से शक्करपारे बटवाऊंगा|

असं हनी सिंग त्याच्या गाण्यात बोलला आणि आपण हे ग्रॅमी काय असतं ते शोधायला लागलो. या ग्रॅमी बद्दल एकटा हनी सिंगच बोललाय असं नाहीये. ग्रॅमी अवॉर्ड मिळवणं हे म्युझिक इंडस्ट्रीतल्या जवळपास प्रत्येकाचच  स्वप्न असतं असं बोललं जातं.

या ग्रॅमी बद्दल इतकं का लिहीतोय तर, आज भारतातले म्युझिक कंपोझर रिकी केज यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय.

हा ग्रॅमी अवॉर्ड इतका महत्त्वाचा का असतो? तो मिळवणं इतकी मानाची गोष्ट का आहे? आजवर कोणकोणत्या भारतीयांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय ते बघुया.

ग्रॅमी अवॉर्डचा इतिहास काय आहे ते आधी थोडक्यात बघुया.

१९५० च्या दशकात परिस्थिती अशी होती की, चित्रपट क्षेत्रात आणि टेलिव्हीजन क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ऑस्कर, एमी असे अवॉर्ड्स होते. पण, संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांचं कौतूक करायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला असा कोणता डेडिकेटेड अवॉर्ड नव्हता. त्यावेळी मग १९५८ साली अमेरिकेत या अवॉर्डची सुरूवात करण्यात आली.

अमेरिकेच्या द रेकॉर्डिंग अकॅडमीने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिडूंसाठी मग या अवॉर्डची सुरूवात केली.

असं म्हटलं जातं की, संगीत क्षेत्रातल्या भिडूंसाठीचा हा सर्वात आधी सुरू झालेला अवॉर्ड  म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड आहे. त्यामुळे, आपोआपच ग्रॅमीचं महत्त्व वाढतं आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला हा अवॉर्ड मिळावा असं वाटत राहतं.

ग्रॅमी अवॉर्ड्सचं स्वरूप नेमकं कसं असतं?

ग्रॅमी अवॉर्ड्स हा सध्या वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी दिला जातो. रॅप, पॉप, रॉक, इलेक्ट्रॉनिक, जॅझ, क्लासिकल यासारख्या एकून ८४ कॅटेगरीजसाठी ग्रॅमी अवॉर्ड दिला जातो. आता या ८४ अवॉर्ड्स शिवाय सगळ्या कॅटेगरीजमधून निवडून एका सर्वोत्तम कलाकाराला ग्रॅमी दिला जातो. त्यात ४ वेगवेगळे अवॉर्ड्स असतात.

सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार, वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम, वर्षातील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड.

हे चारही अवॉर्ड्स मिळवण्यात आजवर फक्त दोनच कलाकार यशस्वी झालेत. क्रिस्टोफर क्रॉस आणि अ‍ॅडेले अशी या दोघांची नावं आहेत.

आता बघुया आजवर कोणत्या भारतीयांनी हा अवॉर्ड मिळवलाय?

रवी शंकर

रवी शंकर हे भारतीय म्युझिक कंपोझर यांना आजवर तब्बल ५ वेळा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. पहिल्यांदा १९६८ मध्ये तर आगदी २०१४ मध्येही त्यांनी ग्रॅमी अवॉर्डवर आपलं नाव कोरलंय.डिवाईन टाईड्स

झाकीर हुसेन

झाकीर हुसेन यांनाही त्यांच्या संगीतासाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय.चार वेळा नॉमिनेशन मिळालेलं असताना त्यांना अवॉर्ड मिळाला तो २००८ साली. त्यांच्या ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी त्यांना बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम या कॅटेगरीतून अवॉर्ड मिळालाय. १९९१ सालीही त्यांना याच कॅटेगरीतून टी. एच. विनयकारन यांच्यासोबत ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय.

ए आर रेहमान

ए आर रेहमाननेही ग्रॅमी अवॉर्ड पटकावलाय. त्याला २००८ मध्ये ऑस्कर विजेत्या चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी ‘सर्वोत्कृष्ट संकलन साउंडट्रॅक अल्बम’ आणि ‘व्हिज्युअल मीडियासाठी लिहिलेले सर्वोत्कृष्ट गाणं’ या दोन कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड मिळालाय. ‘व्हिज्युअल मीडियासाठी लिहिलेले सर्वोत्कृष्ट गाणं’ या अवॉर्डमध्ये गुलझार आणि तन्वी शाह यांचाही समावेश होता. तर ‘सर्वोत्कृष्ट संकलन साउंडट्रॅक अल्बम’ या अवॉर्डमध्ये एच. श्रीधर आणि पी. ए. दीपक यांचा समावेश होता.

जुबिन मेहता

जुबिन मेहता यांनाही आजवर ५ वेळा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. जवळपास २० वेळा त्यांना ग्रॅमीसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. त्यापैकी, १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा तर, १९९० मध्ये शेवटचा ग्रॅमी अवॉर्ड मिळवलाय.

सोनू निगम

२०१७ साली सोनू निगमला त्याच्या मुबारका या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्डवर आपलं नाव कोरलंय.

रिकी केज

सोबतच रिकी केज यांनी आज तिसऱ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड मिळवलाय. २०१५ साली विंड्स ऑफ समसारा या त्यांच्या कामासाठी त्यांना पहिल्यांदा ग्रॅमी मिळाला, त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे २०२२ साली त्यांना त्यांच्या डिवाईन टाईड्स या अल्बमसाठी स्टिवर्ट कोपलँड यांच्यासह अवॉर्ड मिळाला. आता २०२३ मध्ये त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या डिवाईन टाईड्स या अल्बमसाठीच ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.