भारतात शोध लागलेल्या हुक्क्याला फक्त धूर नाही, तर मोठा इतिहासही आहे…

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया…
हर फ़िक्र को धुए में उड़ाता चला गया…

कुठल्याही पान टपरीवर, जुनाट पण आपुलकी असणाऱ्या बारमध्ये फिक्स ऐकू येणारं गाणं. पण धूर असणाऱ्या एका ठिकाणी हे गाणं ऐकायला येत नाही, ते ठिकाण म्हणजे हुक्का पार्लर. पूर्वी राजवाडे, मोठाले वाडे किंवा अगदी पारावरची माणसं निवांत हुक्का ओढायची. मधल्या काळात दारु आणि सिगरेटचं मार्केट वाढलं आणि हुक्क्यांवर धूळ साचली. मात्र काही वर्षांपूर्वी हुक्का पार्लरच्या रुपानं या धुराच्या राक्षसानं कमबॅक केलं आणि कित्येक तरुणांची पावलं हुक्का पार्लरकडं आणि या व्यसनाकडं वळली.

आता आपल्या शरीराला अपाय होईल, असं काही करणंच एकदम बाद आहे. पण कोण काय खातं, पितं आणि ओढतं यावर आपण कसं काय बोलणार? त्यामुळे उपदेशाचे डोस न पाजता समस्त शौकीन लोकांसाठी आणि बाद न होता माहिती घेण्याच्या नाद जपणाऱ्या भिडूंसाठी हुक्क्याचा इतिहास घेऊन आलोय.

तर जसा शून्याचा, बॅडमिंटनचा, शॅम्पूचा, चेसचा शोध भारतात लागला. तसाच जगाला हुक्क्याचा झुरका घेण्याचा नादही भारतानंच लावला. तेही फार १५-१६ व्या शतकात.

झालं असं की, तेव्हा भारतात मुघलांचं राज्य होतं. गादीवर बसला होता बादशहा अकबर. त्याच्या दरबारात इरफान शेख नावाचा एक वैद्य होता. या कार्यकर्त्याला हुक्क्याचा शोध लावण्याचं क्रेडिट जातं. अकबराच्या दरबारात लागलेला हा शोध पर्शिया आणि नॉर्थ आफ्रिकेच्या माध्यमातून सगळ्या जगात पोहोचला. सगळ्या जगानं आपापल्या हिशोबानं हुक्क्याचा जो पॉट असतोय त्याची व्हर्जन्स बनवली.

भारतात मात्र रॉयल कारभार होता. अंहं नाद नाहीच…

आपल्या लोकांना फक्त हुक्का ओढण्याचा नाद नव्हता, तर ज्यातून हुक्का ओढायचा ते पण जगात भारी असायला हवं असा हट्ट. भारतीयांनी हुक्क्याच्या पॉटवर नक्षीच काढ, त्याला रत्नच लाव, सोन्यानीच मढव असे लई उद्योग केले. साधारणत: अठराव्या शतकात काढलेल्या चित्रांमध्ये राजे किंवा मोठ्या हुद्द्यावरची लोकं हुक्का किंवा गुडगुडी मारताना दिसायची.

पुढं जायच्या आधी… अज्ञानात सुख असलं, तरी थोडं ज्ञान वाढवू…

हे हुक्का ओढायचा कसा? भावांनो घरात वाचत असलात, तर ऍक्शन करुन बघू नका. हुक्का ओढायचा पॉट असतो चार पार्टमध्ये. खाली असतो बेस, ज्यात शक्यतो पाणी असतं (दारू किंवा दूध हे आगाऊ पोरांना सुचलेले प्रयोग). त्यानंतर वरती एक भांडं असतं, ज्यात असते तंबाखू (आता फ्लेव्हरवाली असते). त्या भांड्याच्या वरती कोळसा ठेवला जातो. या पॉटला एक पाईप जोडलेला असतो, त्याचं टोक ओठात धरुन असा कडक झुरका मारायचा आणि मग धूर आत ओढून बाहेर ओढायचा… असा हुक्का ओढणाऱ्यांचा शिरस्ता.

राजघराणी, सरदार आणि सामान्य माणसांच्या पाहुणचारात हुक्क्याचा मोठा रोल होता. हुक्का ही गोष्टच शेअर करत ओढण्याची असल्यानं, लोकांनी खास हुक्का ओढण्यासाठी बैठक तयार केली. मधोमध हुक्का, त्याच्या आजूबाजूला लोकं बसणार, त्यांच्या बुडाखाली गादी आणि पाठ सरळ रहावी म्हणून टेकायला कुशन्स असा शाही थाट हुक्क्याच्या बैठकींचा असायचा.

बैठक म्हणू नका, महत्त्वाची चर्चा म्हणू नका किंवा लग्नाची बोलणी म्हणू नका… हुक्क्याशिवाय सारं काही अपूर्ण असायचं. जितका हुक्क्याचा पॉट भारी, तितका माणूस भारी हा अलिखित नियम होता. त्यामुळं उंचे लोक, उंची पसंद म्हणत कुणी सोन्याचा बेस तयार केला, कुणी चांदीचा. कुणी तंबाखू असणाऱ्या भांड्याला रत्न लावली. ब्रिटिश आल्यावर तर आपण किती भारी, हे दाखवण्यासाठी चक्क सोन्याचा पाईप बनव, तोंडात धरायच्या पाईपला हिरेच लाव असे लई प्रकार तेव्हाच्या शौकीन लोकांनी केले.

मसूरीच्या तांबट लोकांनी या सगळ्यावर कडी केली, त्यांनी अखंड ब्रासमध्ये घडवलेला पॉट आणला.. सिंगल पिस.. विषय हार्ड. त्यावरची डिझाईनही एकदम वांड असायची.. साहजिकच हे पॉट लय हिट झाले. श्रीमंत शौकीन कार्यकर्त्यांनी, व्यापाऱ्यांनी हे पॉट सनासना विकत घेतले. हे मलबारी हुक्का हिट होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, सुरुवातीला हे पॉट नारळाच्या करवंटीपासून बनवले जात होते. टाकाऊतून टिकाऊ शेठ!

लय ग्लोरियस इतिहास असला, तरी बेकायदा हुक्का पार्लरमध्ये जाऊन धुराच्या रिंगा काढणं बेकायदेशीर आहे. पोलिसांची रेड पडली, तर फटके खाल… इतिहास सांगूनही मार पडणं काय वाचणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.